विशेष प्रतिनिधी
बीड : Ajit Pawar : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले आहे. अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत 2,091 कोटी 23 लाख रुपये उपलब्ध करून दिले गेले आहेत. आता यात आणखी 150 कोटी रुपयांची भर पडली आहे.
बीड हा दुष्काळी भाग असून, येथील चेहरामोहरा बदलून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि क्षेत्राचा विकास साधला जावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठवाड्याचा, विशेषत: बीडचा विकास साधण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. 251 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी 4,805 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या सहभागातून निर्माण होत आहे. यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी 50% खर्च राज्य शासन करणार आहे. आतापर्यंत राज्य शासनाने 2,091 कोटी 23 लाख रुपये वितरित केले होते. आता 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीडकरांना भेट म्हणून आणखी 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीमुळे रेल्वे मार्गाच्या कामाला अधिक गती येणार आहे.
बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे स्थलांतरित मजुरांची संख्या मोठी आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. नवीन उद्योग जिल्ह्यात स्थापन व्हावेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच, रेल्वे, रस्ते आणि विमानतळ यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गुंतवणूक होत आहे. आगामी काळात ‘स्थलांतरित कामगारांचा जिल्हा’ ही बीडची ओळख पुसून ‘विकसित बीड’ अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करत आहे.
“अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्ग म्हणजे बीड, अहमदनगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगार निर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतिमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकास प्रवास सुरू होईल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App