राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच ‘हर्बल तंबाखू’ नावाच्या नव्या वनस्पतीचा शोध लावला. शेती तज्ञ म्हणून पवारांची ओळख करून दिली जाते. या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या सर्वच शेतकऱ्यांना ‘हर्बल तंबाखू’ लागवडीची परवानगी पवारांनी ठाकरे-पवार सरकारकडून मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. Firebrand Farmer leader seeks permission from Sharad Pawar for plantation of ‘Herbel Tobacco’ newly discovered plant by Pawar himself.
प्रतिनिधी
पुणे : “राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाआघाडी सरकारमधील वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. हे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत.तरी आपणास नम्र विनंती आहे की या हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी,” अशी मागणी माजी मंत्री आणि शेतकरी नेते आमदार सदभाऊ खोत यांनी केली आहे.
खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. या पत्रात ते म्हणतात की, महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होण्यासाठी त्यांनाही हर्बल तंबाखू लागवड करू द्यावी.
शरद पवार यांच्या पक्षाचे नवाब मलिक उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमध्ये मंत्री आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाल्यानंतर मलिक यांनी सातत्याने कारवाई करणाऱ्या तपास यंत्रणेवर आरोप सुरू केले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही मलिक यांचे समर्थन चालू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पवार यांच्या या भूमिकेवर उपहासपूर्ण टीका करताना खोत पवारांना उद्देशून म्हणतात, “आपल्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे. कोरोना काळात कसाबसा टिकून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर अशा अस्मानी संकटात सापडून मरणप्राय वेदना भोगत आहे. आपल्या सारखे शेतीतील ‘जाणते गुरु’ असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याने अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत. शेती अक्षरशः परवडेनाशी झाली आहे.”
सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजा सारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे, असे खोत यांनी पवारांना म्हटले आहे. “गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती (हर्बल) आहे. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील श्री अनिल बाबाजी पाटील या शेतकऱ्यांने आपल्या शेतात या मौल्यवान हर्बलची (वनस्पतीची) लागण करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची (वनस्पती) शेती करायची आहे. पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहजासहजी मिळत नाही,” असे खोत यांनी पवारांना लिहिले आहे.
याच पत्रात खोत पवारांना म्हणतात, “पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाआघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की या हर्बल तंबाखूच्या लागवडी साठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App