परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी अमेरिकेत पीएच.डी. मिळविण्यासाठी रजेची परवानगी मागितल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी उपस्थित केला आहे.Disley Guruji’s study leave application for PhD in USA; question raised by education officer, what about school, suggest alternatives
प्रतिनिधी
सोलापूर : परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी अमेरिकेत पीएच.डी. मिळविण्यासाठी रजेची परवानगी मागितल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, त्यांनी डिसेंबर २१ मध्ये दिलेला अर्ज गेल्या दीड महिन्यांपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहे. रणजित डिसले हे गुरुवारी जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची त्यांनी भेट घेऊन परदेशात डॉक्टरेट करण्यासाठी अध्ययन रजेची परवानगी मागितली. त्यावर स्वामी यांनी त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांना भेटण्याचा सल्ला दिला.
डिसले यांनी लोहार यांची भेट घेऊन रजेसाठी विनंती अर्ज दिला. त्यावर डॉ. लोहार यांनी डॉक्टरकीसाठीचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही परदेशात गेल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल उपस्थित केला. इतके दिवस रजा शक्य नाही. त्यामुळे अर्जासोबत यासाठी पर्याय तुम्हीच सुचवा, अशी सूचना केली आहे.
त्यामुळे डिसले यांना अर्ज भरून आणण्यासाठी गावी परतावे लागले आहे. डिसले गुरुजी बाहेर पडल्यानंतर डॉ. लोहार पत्रकारांसमोर म्हणाले की, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचाविण्यासाठी डिसले यांनी नेमके काय केले? गेल्या तीन वर्षांत त्यांनी शाळेसाठी नेमके काय केले, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यास सांगितले आहे.
डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब अभिमानास्पद आहे; पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला, हे तपासावे लागणार आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणारे नाही.
दरम्यान, डिसले गुरुजी म्हणतात की, शासनाच्या ‘डाएट’ योजनेंतर्गत मी दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर विशेष शिक्षक म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ‘आयटी’ विषय शिकवत होतो. शिक्षणातील नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी मी सहा महिने अमेरिकेत चाललो आहे. दीड महिन्यांपूर्वी रजेचा अर्ज दिला आहे. त्याला आजपर्यंत का मंजुरी मिळाली नाही, हे मला माहीत नाही. परंतु शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले की, डिसले गुरुजी डाएटवर होते असे म्हणतात, पण ते तेथे सातत्याने अनुपस्थित होते. त्यांनी तेथे काय शिकवले? यामुळे ते जे माध्यमांजवळ स्टेटमेंट करत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more