विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे महिमा मंडन होईल. क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमा मंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शिवक्षेत्र मराडे पाडा, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे शिवक्रांती प्रतिष्ठानद्वारे निर्मित, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरा’चे (शक्तिपीठ) लोकार्पण केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवजन्मोत्सवाच्या (तिथीप्रमाणे) शुभेच्छा देत संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ मंदिराच्या निर्मितीसाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत म्हणाले की, आपण आपल्या इष्ट देवतांचे दर्शन घेऊ शकतो, याचे एकमेव कारण छत्रपती शिवराय आहेत. जसे बजरंगबलीच्या दर्शनाशिवाय प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन अपूर्ण आहे, तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय, इतर देवतांचे दर्शन अपूर्ण आहे, याठिकाणी महाराजांसमवेत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याही प्रतिमा आहेत, खऱ्या अर्थाने हे मंदिर राष्ट्रमंदिर आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
प्रभू श्रीरामचंद्राच्या आदर्शावर चालत छत्रपती शिवरायांनी समाजातील सामान्य व्यक्तींचे पौरुष जागृत केले. आज आपण हिंदू म्ह्णून अभिमानाने जगत आहोत, हे केवळ महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्याग व शौर्यामुळेच शक्य झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे मंदिर अनेक अर्थांनी प्रेरणा देणारे आहे, याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील सर्व प्रसंग अतिशय जिवंत असे साकारण्यात आले आहेत, सोबतच राज्य शासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची वेगवेगळ्या ठिकाणची स्मारके, किल्ले व इतर संबंधित विकासकामांचा विस्तृत आढावा, याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
या शक्तिपीठ मंदिराला तत्काळ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात महिमामंडन होईल, तर ते छत्रपती शिवरायांचेच होईल, राज्यात क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमामंडन अथवा उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून, ते विचार तिथेच संपवले जातील, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, तुंगारेश्वर देवस्थानचे परम पूज्य बालयोगी सदानंद महाराज, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आ. किसन कथोरे, आ. निरंजन डावखरे, आ. महेश चौघुले, आ. दौलत दरोडा, शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App