विशेष प्रतिनिधी
नाशिक : Sharad Pawar : नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि त्यांच्या समस्या जनतेसमोर मांडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारचे दुर्लक्ष
नाशिक येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान शरद पवार यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. “महाराष्ट्राच्या काळ्या आईचे इमान राखण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. शेतकरी अस्वस्थ आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटातून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे. मात्र, आजचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करत आहेत,” असे पवार यांनी सांगितले.
“देवा भाऊ, बळीराजाकडे लक्ष द्या!”
शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “देवा भाऊ” म्हणत निनावी जाहिरातींचा उल्लेख करत जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “देवा भाऊ, तुम्ही महाराष्ट्रात पोस्टर लावले, शिवाजी महाराजांचा आदर्श घेत असल्याचे दाखवले. पण शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही! शेतकऱ्यांचा संसार अडचणीत आला आहे. तुम्ही येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखी उग्र स्वरूप धारण करेल. आजूबाजूच्या देशांमध्ये काय घडत आहे, हे पाहा. यापेक्षा जास्त मी बोलणार नाही.”
यूपीए सरकारच्या कामाचा दाखला
यावेळी शरद पवार यांनी यूपीए सरकारच्या काळातील कामगिरीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मी कृषिमंत्री असताना एकदा वाचनात आले की यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुसऱ्याच दिवशी मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे, यासाठी आपल्याला तिथे जाऊन परिस्थिती पाहणे गरजेचे आहे. आम्ही यवतमाळला गेलो, तिथल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत आम्ही देशभरात 70 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली.”
“आताच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येकडे ढकलले जात आहेत”
पवार यांनी सध्याच्या सरकारच्या धोरणांवर टीका करताना सांगितले की, “आजच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.” या मोर्चाद्वारे शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत सरकारला इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत, तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App