विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळीच्या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी शिंदेंनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. सूर्यकुमार यादव याने घेतलेला कॅचचा उल्लेख करत हा कॅच टर्निंग पॉईंट ठरला असे शिंदे म्हणाले. CM Shinde lashes out in Assembly on fifth day of monsoon session
सरकार पाडण्यासाठी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले
सरकार पाडण्यासाठी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. मात्र सरकार पडले नाही. 30 जूनला सरकारला दोन वर्षे पूर्ण झाले. तर विरोधकांचेही चेहरे पांढरे पडले. फेक नॅरेटिव्ह तयार करून एकदाच फसवणूक केली जाते असा टोला शिंदेंनी लगावला. आम्ही उठाव केला आणि जनतेच्या मनातील महायुतीचे सरकार आम्ही आणले. सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद आणणे हाच आमच्या सरकारचा ध्यास आहे असे शिंदे म्हणाले.
कार्यकर्ता घरात नव्हे लोकांच्या दारात शोभून दिसतो
पुढे शिंदे म्हणाले, ”दोन वर्षांत आम्ही कमी पडलो नाही. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आम्ही अहोरात्र काम केले. अनेक जण यामध्ये आडवे आले. मात्र आम्ही विकासाचा विक्रम गाठला. कार्यकर्ता घरात नव्हे लोकांच्या दारात शोभून दिसतो. आम्ही घरी बसून नव्हे जनतेत जात काम केले. विरोधकांना आपल्या जबाबदारीचे भान आहे की नाही माहित नाही. सभागृहाबाहेर विरोधक आमच्यावर आरोप करत असतात. मात्र आता सभागृहात देखील शिवीगाळ केली जात आहे. हे दुर्दैव आहे. असे कधीही घडले नव्हते. मात्र संयम राखून विरोधकांमध्ये काम करण्याची सवय ठेवा असे म्हणत शिंदेंनी वडेट्टीवार यांना टोला लगावला.
ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचे कसे होणार?
महिलांचा सन्मान करणे ही राज्याची संस्कृती आहे. विजय राव तुम्ही योजनेवर टीका केली. मात्र महिलांनी मला राखी बांधली असे शिंदे वडेट्टीवार यांना उद्देशून म्हणाले. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही शिंदेंनी टोला लगावला आहे. काही जण म्हणाले लाडक्या बहीण आणि भावांचे काय? पण ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचे कसे होणार? असे शिंदे म्हणाले.
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले
शिंदे म्हणाले, महाराष्ट्र आमचे कुटुंब आहे. हे सरकार पळणारे नाही शब्द पाळणारे सरकार आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडल्याची टीका झाली. मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले.
शिंदेंनी विरोधकांना जोरदार टोले लगावले आहेत. उद्योग पळाले ही बोंब तुम्ही रोज उठून विरोधक करतात. कोणाच्या काळात किती उद्योग आणि गुंतवणूक आली हे तपासून घ्यावे. अडीच वर्षांच्या काळात किती उद्योग येऊ शकले नाहीत हे देखील जनतेला कळू दे. त्यामुळे हवेत विमाने उडवणे बंद करा. विरोधकांनी आपल्याच राज्यात बदनामी थांबवली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक मिळूनच राज्य सांभाळत असतात. त्यामुळे जे चांगले आहे त्याला चांगले म्हणायला पाहिजे, असे शिंदे म्हणाले. विरोधकांना माझी विनंती आहे. ”उघडा डोळे, बघा नीट आणि वागा नीट” असे शिंदे म्हणाले. शिंदेंनी सभागृहात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या खटाखट विधानाचा उल्लेख केला. यानंतर विरोधकांनी गदारोळ केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App