विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉनफरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनाला येत्या 100 दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे यावर सविस्तर चर्चा केली आहे. तसेच या बैठकीत दिलेल्या सूचनांवर पुढे काय झाले यावर 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थल सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत, असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी सुधारणा करा
पुढे अधिकाऱ्यांना सूचना देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकतील असे प्रश्न, समस्या या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. पण हे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. तसेच हे टाळण्यासाठी लोकशाही दिन सारखे उपकतरं प्रभावीपणे राबवले जावेत. राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलीही आणि कोणाकडूनची त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
उद्योजकांना कसलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App