विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागल्याचे वृ्त्त जोरकसपणे फेटाळून लावले. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले आहेत, असे ते म्हणालेत. महायुतीच्या जागावाटपात आता केवळ 30- 35 जागांवर तिढा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महायुतीच्या जागावाटपाच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. ते म्हणाले, महायुतीच्या जागावाटपावर अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली. आमची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुढील 1-2 दिवसांत यासंबंधीचा निर्णय होऊन तशी घोषणा होण्याची शक्यता आहे.
2 दिवसांत उमेदवारांच्या नावांची घोषणा
पत्रकारांनी यावेळी त्यांना महायुतीच्या जागावाटपाचा तिढा यापुढे दिल्लीत सुटेल की मुंबईत? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता महायुतीत कोणताही तिढा राहिला नसल्याचे जोर देऊन सांगितले. ते म्हणाले, महायुतीत आता तिढा एवढा जास्त राहिला नाही. काही गरज भासली तर अमित शहांशी चर्चा होईल आणि तो तिढा सोडवला जाईल. आता हार्डली 30 ते 35 जागांवर तिढा राहिला आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. यासंबंधी काळजी करण्याचे कारण नाही. ही चर्चा 2 दिवसांत संपेल. त्यानंतर लगेचच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल.
Navya Haridas : वायनाडमध्ये प्रियांका गांधींविरोधात भाजपच्या नाव्या हरिदास रिंगणात
लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्नच नाही
एकनाथ शिंदे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवल्याच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले आहेत. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे दिले. हे सरकार अॅडव्हान्स देणारे आहे घेणारे नाही. त्यामुळे आमची नियत साफ आहे. आमची वृत्ती देण्याची आहे.
मुळात आम्ही हा निर्णय निवडणूक डोळ्यापुढे ठेवून घेतलाच नाही. आमच्या लाडक्या बहिणींना हे पैसे पर्मनंट मिळावेत ही भावना मनात ठेवून आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिले. महायुतीतील सर्वच घटकपक्ष आता एक टीम म्हणून काम करत आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमचेच सरकार येईल याची आम्हाला खात्री आहे.
जनता कामाची पोचपावती नक्की देईल
मागच्या सव्वा दोन वर्षांत आमच्या सरकारने पायाभूत सुविधांचा विकास केला. उद्योगदधंदे उभारले. तसेच कल्याणकारी योजनाही राबवल्या. आम्ही कधी नव्हे एवढे ठोस निर्णय घेतले. त्यामुळे जनता या कामाची पोचपावती आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेसाठोी अनेक निर्णय घेतलेत. त्यामुळे या प्रकरणी रद्द झालेल्या निर्णयांकडे पाहण्याची गरजच नाही, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, निवडणुकीपूर्वी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेण्याचा मानस असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. मला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केले आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला नक्की कामाख्या देवीचे दर्शन घेण्यास आवडेल, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App