वृत्तसंस्था
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj )आमचं आराध्य दैवत आहे अन् त्यांचा पुतळा आमची अस्मिता आहे. सिंधुदुर्ग येथील पुतळा कोसळल्याच्या घटनेने वाईट वाटलं. पण त्याच ठिकाणी पुन्हा पुतळा उभारणीचे काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट, शिवसेनेचा ठाकरे गट व काँग्रेस यावरून आक्रमक झाली आहे.
विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचं कारण सांगितलं. तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असे सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचे डिझाईन देखील नौदलानेच तयार केलं होतं. हा पुतळा कोसळल्याचं वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात 45 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा राहील
मुख्यमंत्री म्हणाले, मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की उद्या तिथे (घटनास्थळी) नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांना काही सूचना केल्या आहेत. उद्या नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील. उद्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App