मुंबई, दि. २४ – विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’ला लोकचळवळीचे स्वरूप आले असून लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.Chief Minister Eknath Shinde will implement the ‘Mumbai pattern’ of cleanliness in all the cities of the state
मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते नायर रुग्णालयांतर्गत नव्याने सुरू झालेल्या मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन (ईआयआरसीसी) केंद्राचे रविवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार रईस शेख, आमदार श्रीमती यामिनी जाधव, आमदार कालिदास कोळंबकर, ॲड.मनीषा कायंदे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, यशवंत जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, डॉ.सुधाकर शिंदे, उपायुक्त रमाकांत बिरादार आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’अंतर्गत आज वरळी येथील डॉ.हेडगेवार चौक, आचार्य अत्रे चौक, माता रमाई आंबेडकर चौक, नायगाव येथील महाराणा प्रताप चौक, तसेच नायगाव बीडीडी चाळ परिसरातील गांधी चौक येथे स्वच्छतेच्या सुरू असलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून त्यात स्वतः सहभाग घेतला.
प्रारंभिक उपचार केंद्र सुरू केल्याचे वेगळे समाधान
मुलांसाठी प्रारंभिक उपचार केंद्राच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री म्हणाले, हे केंद्र खाजगी उपचार केंद्रापेक्षा चांगले असून महानगरपालिका किती चांगले काम करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेष मुलांच्या गरजाही विशेष असतात, त्यांची पालकांना काळजी असते. तथापि या केंद्राच्या माध्यमातून अशा मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार असून अशी दोन केंद्रे मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात तर एक केंद्र ठाण्यामध्येही सुरू करण्यात येईल. प्रारंभिक उपचार केंद्र सुरू केल्याचे वेगळे समाधान असल्याचे सांगून येथे मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आता दर आठवड्याला विविध प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) स्वच्छता केली जात आहे. मुख्यमंत्री स्वत: या मोहिमेत सहभागी होत आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. यामुळे मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीम ही आता लोकचळवळ बनली असून स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था यात सक्रीय सहभाग घेत आहेत. या माध्यमातून आजुबाजूच्या प्रशासकीय विभागांतील मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन, एअर प्युरिफायर, मिस्ट मशीन अशा आधुनिक साधनसामग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाई, रत्यांवरील माती काढणे, पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई करणे, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करणे ही कामे केली जात आहेत. यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेमुळे नियमित सफाईची कामे करणे सोयीचे होत असून याचे दृश्य परिणाम येत्या काळात दिसून येणार आहेत. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत असून सुशोभिकरणाची कामे वेगाने होत आहेत. प्रत्येक चौकात झाडे लावणे, अर्बन फॉरेस्टच्या माध्यमातून हरीत क्षेत्र वाढविणे ही कामे केली जात आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषण मुक्त करण्यात येत आहे. स्वच्छता हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे, त्यामुळे जगात सर्वांना अपेक्षित अशी स्वच्छ आणि सुंदर मुंबई करण्यावर भर दिला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. बस थांबे स्वच्छ ठेवावेत, दुभाजकांमधील झाडे व्यवस्थित लावावीत, रस्ते एक दिवसाआड धुतले जावेत, धूळ उडू नये यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकल्या जाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून ते या मोहिमेचे खरे हिरो आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यांच्या इतर अडचणी देखील दूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नायगाव येथील बीडीडी चाळ परिसरातील नायगाव नवरात्रौत्सव मंडळाच्या भवानी माता मंदिराला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी भेट दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, पोलिसांच्या निवासस्थानाबाबत तसेच बीडीडी चाळीसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रकल्प शासनाच्या वतीने पूर्ण करण्यात येतील. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणू, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App