नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातल्या आणि शिवसेना उबाठा पक्षातल्या अनेक नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा असली, तरी आता पक्षाने त्या इच्छेला फिल्टर लावला आहे. ताटातले वाटीत करून अजित पवारांना देखील आता शरद पवारांच्या पक्षातल्या आमदारांना भाजपच्या परवानगीशिवाय सहजपणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच एकनाथ शिंदेंनाही उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना आपल्याला हवा तसा आपल्या शिवसेनेत प्रवेश देता येणार नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत यांनी या संदर्भात सविस्तर भूमिका मांडली. महायुतीतल्या सर्वांत मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने थेट भूमिका मांडल्यामुळे एकनाथ शिंदे आणि विशेषतः अजित पवार यांच्या पक्षांची गोची झाली.
विरोधी पक्षांपैकी ज्या बड्या नेत्यांनी महायुतीच्या विजयात अडथळे आणले आणि महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात भडक भाषा वापरून टीका केली, तसेच ज्यांना महायुतीतल्या कुठल्याही पक्षात प्रवेश दिल्यामुळे भविष्यात राजकीय अडचणी उद्भवू शकतात, अशा कुठल्याही नेत्यांना परस्पर महायुती मधल्या कुठल्याही पक्षात प्रवेश देता येणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतल्याचे बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांकडेही इन्कमिंग साठी मोठ्या नेत्यांच्या याद्या तयार आहेत. परंतु, अंतिम निर्णय हे तिघे नेते एकमेकांशी चर्चा करून घेतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक तालुका, जिल्हा किंवा गाव पातळीवरच्या पक्षप्रवेशांना कुठलाही विरोध होणार नाही. मात्र बड्या नेत्यांच्या बाबतीत फिल्टर लावावा लागेल हेच बावनकुळे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
Uday Samant : दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 6 हजार कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांची माहिती
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून 20 पैकी बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यायला उत्सुक असल्याचा दावा शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केला. त्याचबरोबर शरद पवारांच्या 10 आमदारांपैकी आणि 8 खासदारांपैकी अनेकजण अजित पवारांच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या. त्यात जयंत पाटलांचे नाव आघाडीवर राहिले.
पण संभाव्य पक्षप्रवेशांच्या या पार्श्वभूमीवर भाजपने चलाख चाल खेळत ठाकरे आणि पवारांच्या पक्षांमधल्या बड्या नेत्यांच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याला फिल्टर लावला. यातून भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची आमदार संख्या भाजपला डोईजड होणार नाही हेच सूनिश्चित करून घेतले. अन्यथा भविष्यात दोन्ही शिवसेनांची एकत्रित मिळून 77 आमदार संख्या आणि दोन्ही राष्ट्रवादींची 51 आमदार संख्या भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकली असती.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आमदार आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. या सगळ्यांची एकत्रित मिळून बेरीज 128 भरते. ही संख्या भाजपासाठी भविष्यात राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरू शकते. यातून महायुतीची ताकद वाढल्याचे वरवर दिसेल, पण प्रत्यक्षात 128 आमदार संख्येने शिंदे आणि अजितदादांची बार्गेनिंग पॉवर वाढेल, याचा अंदाज येताच भाजपने विरोधी पक्षांमधल्या बड्या नेत्यांच्या महायुतीमध्ये घुसण्याच्या संभाव्य धोक्याला फिल्टर लावून टाकला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App