प्रतिनिधी
मुंबई : स्टिंग ऑपरेशन बाबत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कितीही वेगळे नॅरेटिव्हर तयार करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांचा एक वेगळाच घोटाळा मी व्हेरिफिकेशन नंतर बाहेर काढेन, असा खळबळजनक खुलासा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. BHR Fraud govt advocate pravin chavan
ज्या बीएचआर घोटाळ्यात प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील आहेत, त्या बीएचआर घोटाळ्यातील रायसोनी म्हणून संशयिताना अटक केल्यानंतर प्रवीण चव्हाण हेच रायसोनी यांच्या वतीने हायकोर्टात वकील म्हणून उभे राहिल्याची माझ्याकडे तक्रार आली आहे. त्या तक्रारीचे व्हेरिफिकेशन मी करतो आहे. व्हेरिफिकेशन मध्ये ही तक्रार आणि माहिती जर सत्य साबित झाली तर हा सर्वात मोठा गंभीर गुन्हा ठरेल, असा खळबळजनक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
याचा अर्थ एकाच वेळी प्रवीण चव्हाण यांनी सरकारी वकील म्हणून आणि आरोपींचे वकील म्हणून बीएचआर केसमध्ये कार्य बजावले का??, असे बजावले असल्यास तो सर्वात गंभीर गुन्हा ठरेल, असे फडणवीस म्हणाले.
– स्टिंग ऑपरेशन चा फॉरेन्सिक रिपोर्ट तयार
देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर 4 दिवस “गायब” झालेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आज “अचानक” प्रकट होऊन संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये मॅनिप्युलेशन झाले असल्याचा दावा केला आहे.
मात्र या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर देत संबंधित रेकॉर्डिंगचे फॉरेन्सिक ऑडिट माझ्याकडे तयार आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवीण चव्हाण यांच्या दाव्यातली एक प्रकारे हवाच फडणविसांनी पहिल्याच झटक्यात काढून घेतली आहे.
पेन ड्राइव्हबॉम्ब फोडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे 125 तासांचे व्हिडीओ फुटेज आणि रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला होता. त्यातले 2 तास 36 मिनिटांचे रेकॉर्डिंग महाराष्ट्र भाजपने जारी केले होते. त्याच मुद्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार घमासान सुरू आहे. मंगळवारी 8 मार्च रोजी फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे किरकोळ प्रतिक्रिया व्यक्त करून “गायब” झाले होते.
त्यानंतर चार दिवसांनी ते आज “अचानक” एबीपी माझा समोर “प्रकट” झाले आणि त्यांनी संबंधित व्हिडिओ रेकॉर्डिंग तेजस मोरे नावाच्या एका गुन्हेगाराने केल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर उत्तर दिले.
– रेकॉर्डिंग व्यतिरिक्तही मोठे पुरावे
फडणवीस म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारने आणि सरकारी वकिलांनी कोणतेही नॅरेटिव्ह तयार केले तरी माझ्याकडे 125 तासांचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्याचे फॉरेन्सिक ऑडिट मी केले आहे. त्याचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. योग्य वेळ येताच ते 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग – ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याखेरीज अन्य पुरावे मी सीबीआयकडे देणार आहे. राज्य सरकारने संबंधित केस सीबीआयकडे सोपवावी. कारण राज्यातले काही पोलिस अधिकारी यात गुंतले आहेत. त्यामुळे राज्य सरकार यांची चौकशी करू शकत नाही आणि तरीही राज्य सरकारने ही चौकशी सीबीआयकडे सोपविले नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टातून सीबीआयकडे ही चौकशी सोपवायला लावू. 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग – ऑडिओ रेकॉर्डिंग आणि बाकीचे सर्व पुरावे आम्ही कोर्टात सादर करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
– पवारांच्या वक्तव्याला चव्हाणांचा छेद
125 तासांचे रेकॉर्डिंग केंद्रीय यंत्रणांच्या हस्तक्षेपा शिवाय शक्य नाही. ते जर खरे असेल आणि केले असेल तर मी त्यांचे कौतुक करतो, असे खोचक उद्गार शरद पवार यांनी काढले होते. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या आजच्या वक्तव्यातून शरद पवार यांच्याच वक्तव्याला छेद गेला आहे. कारण संबंधित रेकॉर्डिंग हे आपल्याच कार्यालयातील भिंतीवरच्या घड्याळातल्या छुप्या कॅमेऱ्यातून करण्यात आल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे आणि तो छुपा कॅमेरा तेजस मोरे नावाच्या व्यक्तीने बसवला असल्याचेही प्रवीण चव्हाण यांनी म्हटले आहे. हा तेजस मोरे गुन्हेगार आहे आणि प्रवीण चव्हाण यांचा अशील आहे. त्याला इतर गुन्हेगारांनी देखील मदत केली आहे, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे संबंधित व्हिडिओ रेकॉर्डचे संपूर्ण फॉरेन्सिक ऑडिट तयार आहे असे स्पष्ट केल्याने या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागल्याचे दिसून येत आहे.
– “गायब” प्रवीण चव्हाण 4 दिवसांनी एबीपी माझा समोर “प्रकट”
पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत मंगळवारी 8 मार्च रोजी “पेन ड्राईव्ह बॉम्ब” फोडल्यानंतर त्याच रात्री केवळ एक प्रतिक्रिया देऊन “गायब” झालेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण आज चार दिवसांनंतर हे एबीपी माझा समोर “प्रकट” झाले आणि त्यांनी संबंधित स्टिंग ऑपरेशन एका आरोपीने केल्याचा तसेच त्या स्टिंग ऑपरेशन मधले रेकॉर्डिंग मॅनिप्युलेटेड असल्याचा दावा केला आहे.
प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी 8 मार्च रोजी केला होता. आता त्यावर आज शनिवारी 12 मार्च रोजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझा समोर एक्स्लूझिव्हली त्यांची बाजू मांडली आहे.
– स्टिंग ऑपरेशनचे जळगाव कनेक्शन
देवेंद्र फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे. मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला होता. त्याने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होते आहे, असा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.
– भिंतीवरच्या घड्याळातील छुप्या कॅमेरातून शूट
गिरीश महाजन प्रकरणात पुरावे आहेत म्हणून कारवाई होते आहे. माझे रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करुन वापरण्यात आले आहे. व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत. वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला होता, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.
– प्रकरणाच्या चौकशीची मागणी
तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामिन मिळवण्यासाठी आपल्याकडे येत होता. तेजस मोरे हा मूळचा जळगावचा आहे आणि जळगावमधूनच हे सर्व करण्यात आले आहे. तेजस मोरेला अनेकांची साथ आहे. मी चालवत असलेल्या केसेसमधे जे आरोपी तुरुंगात आहेत. त्यांचीही त्याला साथ आहे. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App