हिंदुत्वासाठी काम करणारे, महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या कामाशी जोडून घेणारे संभाजी भिडे गुरुजी, भिडेंचे समर्थक आणि भिडे यांचे विरोधक यांची डोकी ठिकाणावर आहेत का??, असे विचारायची वेळ आली आहे. लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?? असा बोचरा सवाल केसरीच्या अग्रलेखातून विचारला होता. त्यातून देशभर जनजागृती होऊन इंग्रज सरकार हादरले होते. Are Sambhaji Bhide, his supporters and detractors in the right place?
पण आता ना इंग्रज आहेत, ना कोणती परकीय गुलामगिरी, तरी देखील आपल्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांची डोकी ठिकाणावर आहेत का??, असे विचारायची वेळ त्यांच्याच कृतीतून आली आहे.
संभाजी भिडे गुरुजी हिंदुत्वाचे काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांच्या कामाशी महाराष्ट्रातल्या तरुणांना जोडून घेतात. गड किल्ल्यांच्या मोहिमा आखतात. त्यांची काही मते वेगळी आणि वादग्रस्त आहेत. पण जोपर्यंत ही मते ते लोकशाहीच्या चौकटीत राहून सभ्य भाषेत व्यक्त करतात, तोपर्यंत त्या गोष्टीला कोणाची हरकत असायचे कारण नाही. पण भिडे गुरुजी जेव्हा महात्मा गांधींच्या वडिलांविषयी ते मुसलमान असल्याचा “जावई शोध” लावतात किंवा महात्मा फुले यांच्या बदनामीची वक्तव्ये करतात, तेव्हा मात्र कायद्याच्या कसोटीवर ती विधाने नुसतीच चूक ठरतात असे नाही, तर खुद्द त्यांच्या हिंदुत्ववादी कामाला देखील घातक ठरतात!!
नेमका हाच मुद्दा आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. भिडे गुरुजी हिंदुत्ववादाचे चांगले काम करत असले तरी महापुरुषांची बदनामी करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?? त्यांना तो अधिकार अजिबात नाही, असे सांगून त्यांच्यावर कारवाई करण्याचे समर्थन केले आणि ते योग्यच आहे.
भिडेंच्या फोटोला दुधाचा अभिषेक
पण त्या पलीकडे जाऊन भिडे गुरुजींच्या समर्थकांनी सांगलीत त्यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घातला. हे कोणत्या प्रकारचे समर्थन आहे?? भिडे गुरुजी हे त्यांच्या समर्थकांसाठी मोठी व्यक्ती असतीलही, त्यात गैर मानण्याचेही कारण नाही. पण म्हणून दुधाचा अभिषेक ही कसली अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे?? कोणत्या हिंदुत्वाच्या कक्षेत असल्या अंधश्रद्धा बसतात??, याचा विचार 21व्या शतकातल्या हिंदूंनी करायला नको का?? हिंदूंच्या खांद्यांवर त्यांचीच डोकी आहेत, हे हिंदूंनीच सिद्ध करायला नको का?? हे कळीचा सवाल आहेत!!
भिडे विरोधकांचा अतिरेक
जे संभाजी भिडेंचे किंवा संभाजी भिडेंच्या समर्थकांचे, तेच संभाजी भिडे यांच्या विरोधकांचेही झाले आहे. संभाजी भिडे यांचे विरोधक हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. तो संविधानानुसार चालतो, असा धोशा लावत असतात. महाराष्ट्र संविधानानुसार चालतो आणि तो शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हे सांगायला संभाजी भिडे यांचे विरोधक असावे लागत नाही. हा महाराष्ट्र स्वयंसिद्ध आहे. तो ना भिडे समर्थकांच्या मेहरबानी वर चालतो, ना भिडे विरोधकांच्या मेहरबानी वर चालतो!!
पण भिडे विरोधक त्या पलीकडे जाऊन जेव्हा कायदा हातात घेऊन भिडेंची मिशी कापावी, भिडेंचे हातपाय तोडावे हे म्हणतात आणि तशी घटनाबाह्य – कायदेबाह्य कृती करणाऱ्याला 1 लाख, 2 लाखांची बक्षिसे जाहीर करतात, तेव्हा या भिडे विरोधकांची तरी डोकी ठिकाणावर आहेत का?? असा सवाल विचारला तर त्यात गैर काय??
भिडेंच्या खुनाची माजी मंत्र्याची धमकी
बरं भिडे विरोधक त्यांची मिशी कापणे, हातपाय तोडणे असल्या धमक्या देण्यापर्यंत थांबलेले नाहीत. त्या पलीकडे जाऊन काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी तर, थेट भिडेंच्या खुनाची धमकी देऊन टाकली आहे. हे सुबोध सावजी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींची बदनामी केली म्हणून काँग्रेस त्यांच्या विरोधात आहे, पण त्याच महात्मा गांधींनी आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत अहिंसा तत्व पाळले, हे त्यांच्याच काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी विसरले आणि आपले विरोधक म्हणून संभाजी भिडेंना खुनाची धमकी देऊन मोकळे झाले. हे कोणत्या गांधी तत्वात, राज्यघटनेत अथवा कायद्यात बसते??, भिडे विरोधकांना काही समजतेय का?? संभाजी भिडे विरोधकांची डोकी ठिकाणावर असल्याचे हे लक्षण आहे का??*
पृथ्वीराज चव्हाण यांचे सवाल
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत संभाजी भिडेंवर काही प्रश्न उपस्थित केले. ते युवकांची माथी भडकवतात, सोने गोळा करतात, त्यांचे नाव भिडे आहे का?? त्यांच्याविषयी काही पुरावा आहे का??, असे सवाल केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सवाल सभ्य भाषेत केले, यात शंका नाही. पण असे सवाल करणे निराळे आणि संभाजी भिडे यांच्या खुनाची धमकी देणे निराळे. मग पृथ्वीराज चव्हाण आपल्याच काँग्रेसच्या माजी राज्यमंत्र्याला काही समज देणार आहेत का??, हा सवालही महत्त्वाचा आहे.
टिळक स्मारक ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला म्हणून रोहित टिळकांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जाब विचारला. आता असाच जाब संभाजी भिडेंना थेट खुनाची धमकी देणाऱ्या सुबोध सावजींना काँग्रेस विचारणार आहे का?? त्यांच्यावर काही कारवाई करणार आहे का??, हा सवालाही विचारलाच पाहिजे.
– शिंदे – फडणवीस सरकारची कठोर भूमिका
या सर्व प्रकारात शिंदे – फडणवीस सरकारने समन्वयाची पण कठोर भूमिका घेतली हे योग्यच झाले. महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांची बदनामी सरकार सहन करणार नाही. संभाजी भिडेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार हे जाहीर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या “शिदोरी” मासिकात आलेल्या बदनामीकारक मजकुराबद्दल देखील तीव्र आक्षेप नोंदवत “शिदोरी”वर कारवाईचेही इशारा दिला, हेही तितकेच महत्त्वाचे आहे!! अन्यथा राज्यकर्ते म्हणून शिंदे – फडणवीस सरकार कमी पडले असते. तसे त्यांनी बिलकुल कमी पडू नये. कोणत्याही महापुरुषाची बदनामी महाराष्ट्र शासनाने सहन करू नये. त्यात भेदभाव ठेवू नये. हे तत्व शासनाने पाळले, तर ते न्यायोचित होईल. हेच शिंदे – फडणवीस सरकारने करावे, हीच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राची त्यांच्याकडून अपेक्षा आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App