नाशिक : दोन राष्ट्रवादींच्या घमासानात सगळ्याच पवारांचा एकछत्री अंमल धोक्यात!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. एकीकडे शरद पवारांची खासदारकी महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्या कचाट्यात अडकली असताना दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर होऊन सुद्धा त्यांचे त्या पक्षावर नियंत्रण नसल्याचा दावा रोहित पवारांनी करून सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अन्य दोन नेत्यांवर आगपाखड केली. पण त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींच्या गमासानात सगळ्याच पवारांचे नेतृत्व धोक्यात आल्याची चिन्हे सगळ्या महाराष्ट्राला दिसली.
जुने समीकरण संपुष्टात
एरवी कुठलेही पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार हे समीकरण महाराष्ट्राने पाहिले होते. पण आता स्वतःच निर्माण केलेल्या राष्ट्रवादीवर शरद पवारांचे नियंत्रण उरले नाही आणि अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याच व्यक्तीचे त्यांच्या राष्ट्रवादीवर पूर्ण नियंत्रण शक्य नाही.
पाण्याविना मासा तडफडतोय
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तर अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे म्हणून तर रोहित पवार रोज उठून अजित पवारांच्या अपघाताला घातपात ठरवायच्या नादी लागून माध्यमांमध्ये राहायचा खेळ करत आहेत या खेळाचा एक भाग म्हणून त्यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या, तरी मूळ मुद्दा अजित पवारांच्या विमान अपघाताचा घातपात ठरविणे हाच होता. पण पवारांचा राजकीय दराराच आता एवढा उरलेला नाही की रोहित पवारांना हवा असलेला एफ आय आर महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलीस ठाण्यात नोंदविला जाईल. त्यामुळे रोहित पवारांची फक्त आदळआपट मीडियातून दिसते. त्यांनी सुनेत्रा पवार सोडून इतर नेत्यांवर केलेली टीका ठळक अधोरेखित होते, पण त्यापलीकडे कुठलेही खरे राजकारण रोहित पवारांकडून साधले जात नाही. त्यांना हव्या असलेला सत्तेचा तुकडा काही मिळत नाही. कारण त्यांच्या आजोबांचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर जुना प्रभाव उरलेला नाही.
शारदाबाईंचे नाव घेतले, शरद पवारांचे नाही
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी काम केलेल्या भाषणात आपल्याला शारदाबाई पवारांचा वारसा पुढे न्यायचा आहे. अजितदादांचा विचार पुढे न्यायचा आहे, असे सांगितले. त्यांनी तिथे शरद पवारांचे नाव सुद्धा घेतले नाही. त्यांनी राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख केला, पण पवारांचे नावही घेतले नाही, यातून सुनेत्रा पवार “न सांगता” “भरपूर काही बोलून” गेल्या.
सुनेत्रा पवारांचे नियंत्रण नाही
रोहित पवारांनीच म्हटल्याप्रमाणे, अजून तरी सुनेत्रा पवारांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर पूर्ण नियंत्रण आलेले नाही. भाजपने त्यांना जरी उपमुख्यमंत्री केले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा प्रभाव कमी होऊ दिलेला नाही. उलट कालच ज्यादिवशी सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाली त्याच दिवशी त्याच वेळी प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष पदावर फेरनिवड झाली आणि महाराष्ट्रातील पक्षाची सूत्रे सुद्धा सुनील तटकरे यांच्याच हातात राहिली. रोहित पवारांनी नेहमीप्रमाणे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या चौघांवर आगपाखड केली. अजितदादांवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. पण सुनेत्रा काकींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केला तरी त्यांना यश येणार नाही, अशी दमबाजी रोहित पवारांनी केली, याचाच अर्थ रोहित पवारांनी बाहेरून आलेल्या पवारांचे राष्ट्रवादीवर नियंत्रण नसल्याचीच कबुली दिली.
सुप्रिया सुळेंचे नेतृत्व प्रस्थापनेपूर्वीच अस्तंगत
या सगळ्या घडामोडींपासून सुप्रिया सुळे एवढ्या दूर आहेत किंबहुना त्यांना इतके दूर ठेवले गेले आहे, की त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित होईल, की शरद पवारांच्या नंतर सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित होण्यापूर्वीच अस्तंगत होईल, अशी शंका यावी. कारण कुठलेही नेतृत्व प्रस्थापित करायला खऱ्या अर्थाने राजकारण करावे लागते आणि ते राजकारण करण्यात अपयश आले, तर नेतृत्व प्रस्थापित होत नाही. नेमके तसेच सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत सध्या घडताना दिसत आहे. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर आता विलीनीकरण होत नाही, हे लक्षात आल्याबरोबर रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय हातात घेऊन त्यावर महाराष्ट्रात गदारोळ केला. त्यातून त्यांनी स्वतःचे नेतृत्व शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रस्थापित करायचाच “डाव” खेळला. रोहित पवार मीडियात राहिले, पण त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व जास्त झाकोळले गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना किंवा सुनेत्रा पवारांना त्याचा काही फरक पडला नाही.
इतर नेत्यांची चलती
या सगळ्याचा निष्कर्ष हाच की, आता राष्ट्रवादी म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण एकमेवाद्वितीय असे उरलेले नाही. राष्ट्रवादीत इतर नेत्यांची सुद्धा चलती सुरू झाली आहे आणि ती तशीच कायम राहण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण कुठलेच पवार आता तेवढे प्रभावी उरलेले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App