प्रतिनिधी
मुंबई : भांडणे आणि राडा दोन सेनांमध्ये झाला, पण फटका मात्र भाजप सह सगळ्या पक्षांना बसला. प्रशासनाने मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सीलबंद केली. All party offices sealed as two Shivsena factions fight for single office in BMC
मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा बाळासाहेबांच्या शिवसेनेने घेतल्यानंतर आणि दोन्ही गटांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या ठिकाणी पुन्हा दोन्ही गटांकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कार्यालयांना तुर्तास तरी टाळे ठोकून सील करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार, प्रत्येक पक्षांना कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने त्यांना जास्त क्षेत्रफळाच्या जागेचे कार्यालय देण्यात आले होते. परंतु ७ मार्च २०२२ मध्ये या सर्व नगरसेवकांची मुदत संपुष्टात येऊन महापालिका बरखास्त झाली आणि पुढील महापालिका अस्तित्वात येईपर्यंत राज्य सरकार नियुक्त प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेचे कामकाज हे आता पूर्णपणे प्रशासकांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.
परंतु सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी नगरसेवकांना महापालिकेत आल्यानंतर बसण्यास जागा उपलब्ध व्हावी, या करता पक्ष कार्यालय ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये आज सुरू आहेत. दरम्यान शिवसेना पक्षातून फुटून काही खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची स्थापना केली. त्यामुळे शिवसेना पक्षाचे दोन तुकडे झाले असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष निर्माण झाले आहेत.
दरम्यान, बुधवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे, माजी आमदार अशोक पाटील, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, माजी नगरसेवक गिरीश धानुरकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या कार्यालयात प्रवेश करत या कार्यालयाचा ताबा घेतला आणि येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर तेथे उद्धव ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि माजी नगरसेवक हजर झाले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोशल इंजिनिअरिंग परवडेल?; धर्मनिरपेक्ष मतांमध्ये वाटा तरी किती मिळेल?
यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडून त्याचे पर्यावसान जोरदार घोषणाबाजीत झाले. यामुळे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस उपायुक्त आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही गटांना कार्यालयातून बाहेर हुसकावून लावले. या कार्यालयात आमचे नगरसेवक पहिल्यापासून बसत असून हे आजच आले असे सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला. पण दोन्ही शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक पुन्हा एकत्र आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी नगरसेवकांना मुख्यालयात आपली कामे करण्यास आल्यानंतर त्यांना बसता यावे यासाठी ही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. इतर कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा कोणताही वाद नाही, परंतु शिवसेना पक्ष कार्यलयाबाबत दोन्ही शिवसेना पक्षात वाद निर्माण झाल्याने या कार्यालयाला सील ठोकण्याचा विचार केला जाऊ शकतो. महापालिका आयुक्त याबाबत आपली भूमिका जाहीर करतील.
परंतु वस्तुस्थिती पाहता महापालिका आयुक्त या वादाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय सुरू ठेवण्यास तयार नसतील. त्यामुळे शिवसेना पक्ष कार्यालयाला टाळे ठोकून ते पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्यापलीकडे कोणताही मार्ग महापालिकेपुढे नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. परंतु गुरुवारी महापलिका आयुक्त व पोलीस यांच्या चर्चेनंतर शिवसेनेसह सर्व पक्ष कार्यालयांना सील ठोकण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App