नाशिक : शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची दिल्लीतल्या “6 जनपथ” या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या पार्श्वभूमी मराठी माध्यमांनी पवारांच्या वाढदिवसाची फार मोठी बातमी चालवली. त्यावर वेगवेगळी मखलाशी केली. या मखलाशी मध्ये अजितदादांनी भाजप नेतृत्वाला आपले सगळे ऑप्शन खुले असल्याचा राजकीय संदेश दिला, असा दावा मराठी माध्यमांनी केला.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन आठवडा उलटून गेल्यानंतर अजित पवारांसाठी नवा ऑप्शन खुला झाल्याचा दावा यात होता.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर देखील एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा आठवडाभर राजकीय हवेत राहिली होती. एकीकडे त्यांची नाराजी आणि दुसरीकडे अजित पवारांचा जास्त मंत्री पदासाठी दबाव यामध्ये भाजपची कोंडी होत असल्याचा दावा कित्येक दिवस मराठी माध्यमे करत होती.
या दरम्यान फडणवीस + शिंदे आणि अजितदादा यांचा एक दिल्ली दौरा झाला. नंतर फडणवीस आणि अजितदादा यांचा दुसरा दिल्ली दौरा झाला. यामध्ये अजितदादांना भाजपच्या नेत्यांनी अद्याप भेट दिली नसल्याचा दावाही मराठी माध्यमांनी केला. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ रचनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्याबरोबर चर्चा केल्याच्या बातम्या समोर आल्या, पण अजित पवार मात्र आज अमित शाह यांच्या भेटीला गेल्याच्या बातम्या समोर आल्या. किंबहुना आपण अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटीनंतर सांगितले.
शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे राजकीय श्लेष मराठी माध्यमांनी काढले. दोन्ही पवारांच्या भेटीतून भाजपच्या नेतृत्वाला “राजकीय संदेश” देण्याचा प्रयत्न झाला. भाजपने आपल्या ज्यादा मंत्रीपदाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आपण वेगळा मार्ग चोखाळू शकतो, असा राजकीय संदेश म्हणे, अजितदादांनी शरद पवारांच्या भेटीतून भाजपच्या नेतृत्वाला दिला. तसा दावा मराठी माध्यमांनी केला.
पण शरद पवार यांच्या भेटीतून अजित पवार आपणास स्वतःचे सगळे ऑप्शन खुले करून घेत असताना भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच हातात वर हात ठेऊन बसतील का??, भाजप आणि शिंदे एकत्र येऊन नेमके काय करू शकतील??, किंबहुना काय करतील??, यावर मात्र मराठी माध्यमांनी कुठला खुलासा केला नाही.
शिवाय अजितदादांचे सगळे ऑप्शन खुले असल्याचा दावा जरी मराठी माध्यमांनी केला असला, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातील आमदारांची आकडेवारी मात्र त्याला कुठलीही पुष्टी देत नाही. मूळात भाजप 132 आमदारांसह अत्यंत मजबूत स्थितीत असताना आणि त्या पक्षाला बहुमतासाठी फक्त 14 आमदारांची गरज असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व अजित पवार यांच्या दबावापुढे किंवा एकनाथ शिंदे यांच्या नाराजीपुढे झुकेल अशी कुठलीही सुताराम शक्यता नाही. त्यामुळे शरद पवारांची भेट घेऊन अजित पवारांनी भाजपच्या नेतृत्वाला कुठला “राजकीय संदेश” देणे आणि तो “राजकीय संदेश” जसाच्या तसा भाजपच्या नेतृत्वाने स्वीकारणे, हे संभवतच नाही.
अजितदादांची नुकतीच साधारण 1000 कोटींची मालमत्ता ट्रायब्यूनल कोर्टामार्फत सुटली. पण राज्य सहकारी बँक घोटाळ्यातल्या त्यांच्यावरच्या ईडी केसेस अजून पूर्ण मिटलेल्या नाहीत. अशा स्थितीत अजितदादांचा ऑप्शन खुला असलाच, तर तो फारतर आर्थर रोडचा मार्ग खुला असू शकतो. यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग अजितदादांसाठी खुला नाही. त्यांच्याबरोबरच प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचाही तोच मार्ग भाजप पुन्हा खुला करू शकतो, हा मुद्दा लक्षात घ्यायला “पवार बुद्धी”ची मराठी माध्यमे विसरली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App