2022 मुंबई महापालिका निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा शिवसेनेचा मनसुबा Aditya Thackeray to lead 2022 BMC elections
प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1997 मध्ये केलेला प्रयोग 2022 मध्ये करण्याचा मनसुबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आखत असल्याचे दिसून येत आहे.
अर्थात याचा निकाल अर्थात याचा निकाल “1997” प्रमाणेच लागेल याची काही खात्री देता येत नाही. काय होता 1997 चा बाळासाहेब ठाकरे यांचा प्रयोग…?? कशासाठी केला होता त्यांनी तो प्रयोग…?? तो प्रयोग होता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आपला वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा.
1997 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष संघटनेत लक्ष घालून महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप केले होते. त्या निवडणुकीत चेहरा अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचा होता. परंतु सगळी शिवसेनेची व्यूहरचना उद्धव ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय प्रयोगाला त्यावेळी चांगले यश मिळाले होते. आता हाच प्रयोग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या बाबत करण्याचा मनसूबा आखत आहेत.
मुंबई महानगरपालिकेची 2022 ची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपवून लढविण्यात येतील, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. याचा अर्थ मुंबई महापालिकेची तिकिटे जास्तीत जास्त आदित्य ठाकरे यांच्या मर्जीने वाटपाचे हे धोरण आहे. उद्धव ठाकरे यांनी 1997 च्या निवडणुकीत शिवसेनेची व्यूहरचना करताना 45 विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापली होती. तसा प्रयोग आदित्य ठाकरे करतील काय किंवा आदित्य ठाकरे यांना तेवढे स्वातंत्र्य की जे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते ते उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांना देतील काय?, या सवालाचे उत्तर अद्याप शिवसेनेतून कोणी दिलेले नाही.
तरीही आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व शिवसेनेत बळकट करण्यासाठी या निवडणुकीचा वापर करून घेण्याचा इरादा उद्धव ठाकरे पक्का करत आहेत. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरची तिसरी पिढी मुंबईत शिवसेनेचे आघाडीवर राहून नेतृत्व करणार आहे. त्याच वेळी ठाकरे घराण्यातील दुसरे युवा नेतृत्व राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत आहेत. एका अर्थाने दोन ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीची ही समोरासमोर उभे ठाकून लढाई होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. 2017 ची सार्वत्रिक निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा शिवसेनेचा विचार होता. परंतु भाजपशी फारकत घेतल्याने तसेच राजकारणातील कमी अनुभव लक्षात घेता शिवसेनेने तेव्हा एक पाऊल मागे घेतले. परंतु आता आदित्य ठाकरे यांनी मुंबईवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून, उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असल्याने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून त्यांचे नेतृत्व पक्षाला दिले जाणार आहे. त्यामुळे पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात येणार आहे.
– नेतृत्व सिध्द करण्याची संधी
मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेत आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर संकटांचा सामना करत राज्याचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे करत आहेत. परंतु राज्याच्या कारभारात व्यस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांना आता पक्षाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे सूत्रे आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात येणार आहेत. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत आदित्य ठाकरे हे आता राजकीय परिपक्व झालेले आहेत. राज्याचे मंत्रीपद भूषवत त्यांनी राज्याच्या कारभारातही लक्ष घातले आहे. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवून त्यांना गुणवत्ता सिध्द करण्याची संधी दिली जाणार आहे.
इच्छुकांची खेचाखेची सुरू
बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून उध्दव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी घेत, 1997 ची महापालिका आपल्या नेतृत्वाखाली निवडून शिवसेनेचे 110 नगरसेवक निवडून आणले होते. महापालिकेतील आजवरच्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. यामधून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व उदयास आले. त्याचप्रमाणे २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व उदयास आणण्याचा विचार आहे. यासाठी भाजपसह इतर पक्षांमधील निवडून येणाऱ्या नगरसेवकांना तसेच इच्छुक उमेदवारांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोबत घेऊन पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विजयश्री खेचून आणत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धारही पक्षाने केला आहे.
आदित्य करत आहेत जीवाची मुंबई
उध्दव ठाकरे यांना त्यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि विद्यमान शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मदत केली होती. तर आदित्य ठाकरे यांच्या सोबतीला पक्षाचे सचिव व त्यांचे सहाय्यक सुरज चव्हाण आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आहेत. त्यामुळे या दोघांसह आदित्य ठाकरे यांनी आतापासून मुंबई पिंजून काढण्यास सुरुवात केली असून, वरळीसह मुंबईतील महापालिकेच्यावतीने तसेच पक्षाच्यावतीने रावबल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांना ते आवर्जुन हजेरी लावत आहेत. तसेच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निर्देश देत मुंबईतील विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदित्य ठाकरेंच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यावरही आयुक्तांनी अधिक भर दिला असून, त्यासाठी ते संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करायला भागही पाडत आहेत.
…तर मोठी जबाबदारी मिळणार
एका बाजूला आदित्य ठाकरे हे राज्याचे मंत्री असले तरी ते मुंबईतच कायम असल्याने, त्यांनी आपले मनसुबेही जाहीर केले आहेत. त्यामुळे आता बाबांप्रमाणेच आदित्य ठाकरे मुंबईत नगरसेवकांचा आकडा 110 हून अधिक निवडून आणत आपले पक्षातील नेतृत्व सिध्द करतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. जर 2022 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठे यश मिळवल्यास लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली जाणार असून, पक्षाचे एक नेतृत्व राज्याला दिले जाणार आहे. पक्षाचे नेता ते राजकीय नेता अशी त्यांची वेगळी ओळख यामधून निर्माण केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App