तोंडी पहिलवान – वस्तादाची भाषा पण पुण्यात काँग्रेस ओलांडेल का अडीच – तीन लाखांच्या टप्पा??, असे विचारायची वेळ पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्यातून वक्तव्यामुळे आली आहे. रवींद्र धंगेकरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या आशीर्वाद घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी समोर मोहोळ पहिलवान असेल, तर आमच्याकडे वस्ताद आहे, अशी भाषा केली. आता निवडणुकीत अशी चमकदार भाषा खपून जाते. किंबहुना निवडणुकीत अशा चमकदार भाषेत बोलून मतदारांना आकर्षित करायचेच असते, पण मूळ प्रश्न हा आहे की, केवळ अशा चमकदार भाषेतून पुण्यामध्ये धंगेकर ज्या काँग्रेसचे उमेदवार आहेत, ती काँग्रेस आपल्या मतांचा अडीच तीन लाखांचा टप्पा ओलांडणार का?? कारण तो टप्पा ओलांडल्याशिवाय वस्ताद आपल्या बाजूला असूनही धंगेकर विजयाचे मैदान मारू शकणार नाहीत.Will Congress able to cross 2.5 – 3 lakhs votes range in pune loksabha constituency
हे केवळ काही लिहायचे किंवा बोलायचे म्हणून नाही, तर खरंच पुण्यात काँग्रेस आजही अडीच – तीन लाखांच्या मतांच्या टप्प्यातच अडकली आहे, हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. त्या उलट भाजप मात्र 5 – 6 लाखांच्या मतांच्या टप्प्यांच्या रेंजमध्ये पोहोचला आहे. पुण्यात भाजपला हरवायचे म्हणजे अडीच – तीन लाखांच्या मतांचा टप्पा ओलांडून तो किमान पाच लाखांच्या टप्प्यांच्या रेंजमध्ये नेऊन ठेवणे होय… आणि आज पुण्यातली काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेतली तर ती अशक्यप्राय गोष्ट वाटते.
पुण्यात आज रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने शरद पवार नावाचे वस्ताद जरूर आहेत. या वस्तादांनी एकेकाळी पुण्यात एकाच दिवशी सहा सभा घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणले होते अथवा पाडले देखील होते. पण तो काळ खूप जुना होता. किंबहुना तो 2000 पूर्वीचा काळ होता. आता 2024 आहे त्यामुळे पैलवानाची ताकद किती आहे. यापेक्षा वस्तादाची ताकद घटली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यातल्या मोहोळ नावाच्या पैलवानाची ताकद ही त्याची वैयक्तिक ताकद असण्यापेक्षा भाजप संघटनेची ताकद आहे. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपने अशाप्रकारे संघटना मजबूत केली आहे की, त्यांची मतांची रेंज 5 लाखांच्या खाली येणे फार कठीण आहे. आणि ज्या अर्थी भाजपची मतांची रेंज 5 लाखांच्या खाली येणार नाही. त्या अर्थी भाजपचा पराभव करणे वस्तादाला कठीण आहे.
रवींद्र धंगेकरांनी जशी पैलवान वस्तादाची चमकदार भाषा वापरली तशी माध्यमांनी पुण्यात “कसबा” होणार अशी चमकदार भाषा वापरली, पण एका विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणुकीत पुण्यात “कसबा” होणे निराळे आणि लोकसभा निवडणुकीत अख्ख्या पुण्याचा “कसबा” होणे हे निराळे. पुण्यात धंगेकरांच्या रूपाने एकदा “कसबा” झाला, पण त्यामागे (कै.) गिरीश बापटांचा “आशीर्वाद” होता, ही बाब आता पुणेकरांपासून लपून राहिलेली नाही. पण रवींद्र धंगेकरांना एकदा आमदार करायचे एवढ्या पुरतेच ते मर्यादित होते. त्यापलीकडे धंगेकरांच्या प्रत्येक निवडणुकीत जशीच्या तशी कोणाची “मदत” होईल, ही शक्यताच दुरापास्त आहे.
इतकेच नाही तर पुण्यात काँग्रेसलाही धंगेकर यांच्या खेरीज दुसरा उमेदवार न मिळणे यातच काँग्रेसच्या प्रयोगाची मर्यादा लक्षात येते. साधारण वर्षभरापूर्वीच कसबा पोटनिवडणूक झाली, तेव्हा रवींद्र धंगेकर उमेदवार आणि वर्षभरानंतर लोकसभेसाठी तेच उमेदवार हे पुण्यात काँग्रेसकडे उमेदवारीसाठी नेत्यांचा दुष्काळ असल्याचे चिन्ह आहे. एकेकाळी पुण्यात काँग्रेस एवढी बळकट होती की, उमेदवारीसाठी पक्षाकडे रांगा लागायच्या. आजही तशा रांगा लागतात, पण तेवढ्या त्या तेवढ्या “तगड्या” उमेदवारांच्या रांगा असतात का??, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण पुण्यात काँग्रेसकडे तसे “तगडे” उमेदवार असते, तर रवींद्र धंगेकरांसारख्या आयात उमेदवाराला आधी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आणि वर्षभरानंतर लोकसभेची उमेदवारी देणे काँग्रेसला भागच पडले नसते!!
पण ते काहीही असले, तरी काँग्रेसने रवींद्र धंगेकरांवर डाव खेळला आहे. रवींद्र धंगेकरांनी देखील पहिलवान – वस्ताद अशी भाषा वापरत चमकदार भाषा वापरून पुण्याच्या लढतीत जान आणली आहे. पण प्रश्न फक्त हाच आहे. त्या चमकदार भाषेच्या पलीकडे जाऊन पुण्यातली काँग्रेस आपल्या मतांचा अडीच – तीन लाखांचा टप्पा ओलांडणा का??, या प्रश्नाच्या उत्तरात वस्तादाच्या ताकदीचे खरे रहस्य दडले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App