पवार दक्षिण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या प्रभावाखालच्या लोकसभेच्या जागा काँग्रेस – शिवसेनेसाठी का सोडून देत आहेत??, त्यांचा हेतू नेमका काय??


लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी फक्त 5 उमेदवार जाहीर केले. मात्र, याच कालावधीत शरद पवारांनी स्वतःचा प्रभाव असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्रातल्या किमान 3 जागा काँग्रेस आणि शिवसेनेसाठी सोडल्याची बातमी समोर येत आहे. यापैकी कोल्हापूरची हक्काची जागा, तर पवारांनी शाहू महाराजांसाठी आधीच सोडली. त्यांची काँग्रेस मधून हाताचा पंजा या चिन्हावर उमेदवारी देखील जाहीर झाली, सांगलीची जागा त्यांनी काँग्रेस कडून परस्पर काढून घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सोपवली आणि तिथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाली. Why sharad pawar is leaving southern maharashtra loksabha seats to Congress and shivsena UBT??

पण आता पवार माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यासाठी नेमकी कोणाची वाट पाहत आहेत??, त्या पाठोपाठ सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा देखील ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी सोडून देणार असल्याची बातमी समोर आली आहे. पण या बातम्या आत्ताच समोर येण्यामागचे खरे “गौडबंगाल” काय आहे?? खरंच पवार काँग्रेससाठी दक्षिण महाराष्ट्रातल्या आपल्या प्रभावाखालच्या लोकसभेच्या जागा सोडून देत आहेत का?? आणि देत असतील, तर ते का देत असतील??, हे कळीचे सवाल आहेत.

कारण आत्तापर्यंत शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्र असो अथवा दक्षिण महाराष्ट्र असो, तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे भरण पोषण काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या बळावर म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांनाच आपल्याकडे खेचून घेऊन केले आहे. पवारांनी स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांची फळी उभी करून स्वतःचा पक्ष वाढविल्याचे उदाहरण मिळणे दुरापास्त आहे. बाकी “स्वाभिमान”, “दिल्ली पुढे झुकायचे नाही”, वगैरे शब्द सोशल मीडियावर लिहिण्यापुरते मर्यादित आहेत. पण तरीदेखील पवार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा, सांगली, माढा, कोल्हापूर हे लोकसभेचे आपल्या प्रभावाखालचे मतदारसंघ अन्य पक्षांसाठी का सोडत आहेत?? हा निश्चित कळीचा सवाल आहे.साताऱ्यात उदयनराजे यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना लढावे यासाठी पवार त्यांना “कन्व्हिन्स” करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांशी तशी चर्चा केल्याची बातमी आहे. कारण पवारांचे बिनीचे शिलेदार श्रीनिवास पाटील हे त्यांच्याच इतक्या वयाचे असल्यामुळे वयाचे कारण देऊन निवडणुकीतून माघार घेते झाले आहेत. अशा स्थितीत पवारांकडे उदयनराजे छत्रपती विरुद्ध साताऱ्यात तेवढा “तगडा” उमेदवार शिल्लक नाही. त्यामुळे तिथे शशिकांत शिंदे किंवा अन्य कोणी अगदी सुनील माने यांच्यासारखे उमेदवार देखील उदयनराजे यांना कितपत टक्कर देऊ शकतील??, याविषयी शंका आहे. त्यामुळे पवार सातारा लोकसभा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांचा सारख्या “तगड्या” उमेदवाराला “आंदण” देणार का??, हा खरा प्रश्न आहे.

कारण पृथ्वीराज चव्हाण आणि पवार यांचे नाते अहि – नकुलाचे आहे म्हणजे साप – मुंगसाचे आहे. याच पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांच्या हाताला लकवा भरलाय का??, असा असभ्य सवाल पवारांनी जाहीररीत्या केला होता. कारण सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या चौकशा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाल्या नसून, त्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरू झाल्या होत्या. त्या चौकशांचा फास पवारांच्या राष्ट्रवादीभोवती आवळत चालला होता. त्यामुळे पवारांना पृथ्वीराज चव्हाण विषयी प्रचंड राग आहे. मग आपल्याकडे तगडा उमेदवार नसताना ते सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा “राजकीय बळी” देऊ इच्छित आहेत का??, हा कळीचा सवाल आहे. पण पृथ्वीराज चव्हाण एवढे निश्चित मुरब्बी आहेत की, पवारांचा डाव ते इतर कोणाही पेक्षा जास्त चांगला ओळखून आहेत. त्यामुळे पवारांच्या म्हणण्यावर भरीस पडून पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा निवडणुकीत स्वतः उतरतील का??, हा ही तितकाच महत्त्वाचा सवाल आहे.

सगळे चाललेय बारामती वाचविण्यासाठी

पवारांनी सांगलीची उमेदवारी शिवसेनेच्या गळ्यात घालून काँग्रेसला डिवचले, तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना निवडणुकीत उतरण्यासाठी “कन्व्हिन्स” करून त्यांची उमेदवारी काँग्रेसच्या गळ्यात घातली. या सगळ्याचा नेमका राजकीय अर्थ काय??, असा नीट विचार केला, तर पवारांनी बारामती “वाचविण्यासाठी” आपल्या प्रभावाखालचे इतर मतदारसंघ महायुतीच्या उमेदवारांना अनुकूल ठरावे म्हणून काँग्रेसच्या गळ्यात मारलेत का??, हा अत्यंत महत्त्वाचा सवाल आहे आणि याचे उत्तर पवारांचे एकूण राजकारण पाहता सकारात्मकच द्यावे लागणार आहे. कारण शरद पवार हे आपली माणसे निवडून आणण्यापेक्षा समोरची माणसे पाडण्यात जास्त माहीर आहेत, हा त्यांचा खरा राजकीय इतिहास आहे.

रामराजेंची “नाराजी” भाजप सहन करेल??

कोल्हापूर, सांगली इथले उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत. माढ्यात भाजपचे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव देखील आधीच जाहीर झाले आहे. ते देवेंद्र फडणवीस यांचे “फेव्हरिट” आहेत, तिथे मोहिते पाटलांच्या घराण्याकडे पवार डोळे लावून बसले आहेत, पण मोहिते पाटील हे निंबाळकरांना पुरून उरतील का?? आणि रामराजे नाईक निंबाळकर खरंच नाराज राहून आपले आणि आपल्या मुलाचे भवितव्य राजकीय भवितव्य अडचणीत आणून ठेवतील का??, हे देखील महत्त्वाचे सवाल आहेत. कारण रामराजे “नाराज” राहिले आणि त्याचा परिणाम रणजीत सिंह नाईक निंबाळकरांच्या यशावर झाला, तर ते देवेंद्र फडणवीस सहन करतील का??, ते देवेंद्र फडणवीस यांनी सहन केले, तर वरती मोदी – शाह तसले प्रकार खपवून घेतील का??, या सवालांचे उत्तर रामराजे यांच्यापेक्षा अजित पवारांना द्यावे लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर चारच महिन्यांनी विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस जशी काँग्रेसशी “राजकीय मस्ती” करत होती, तसली “मस्ती” भाजप पुढे चालणार नाही. मोदी – शाहांचा भाजप असली “मस्ती” सहन करणार नाही, हे रामराजे आणि अजितदादांना निश्चित माहिती आहे.

पण ते काही असले तरी पवार स्वतःची बारामती “वाचविण्यासाठी” आपल्या प्रभावाखालच्या दक्षिण महाराष्ट्रातल्या इतर सर्व मतदारसंघांवर पाणी सोडायला तयार झालेत, किंबहुना त्यांना तयार व्हावे लागले, हा दक्षिण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात फार मोठा चर्चेचा विषय ठरला आहे… पण एवढे करूनही पवार बारामती “वाचवू” शकतील का??, हा सर्वाधिक कळीचा सवाल आहे!!

Why sharad pawar is leaving southern maharashtra loksabha seats to Congress and shivsena UBT??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात