महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दम तुटायला लागलेला दिसतोय, म्हणूनच संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्याशी वाद घातला. नाना ज्या बैठकीला असतील, त्या बैठकीला शिवसेनेचे नेते जाणार नाहीत, असे जाहीर करून टाकले. त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना तुटेपर्यंत ताणू नका, अशी इशारेवजा दमबाजी केली. त्यामुळे कालचा दिवस, किंबहुना संध्याकाळ उद्धव ठाकरे यांनी गाजवली, अशा चर्चा मराठी माध्यमांनी रंगविल्या.
पण अशा चर्चांना आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांना बधणारा काँग्रेस पक्ष आहे का??, हा खरा सवाल आहे. आणि त्याचे उत्तर “अजिबात नाही”, या दोनच शब्दांमध्ये देण्यासारखे आहे. कारण काँग्रेस पक्ष अशा जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये इतर कुठल्याही पक्षांवर “भारी” ठरणारा पक्ष आहे. जागावाटप किंवा सत्तेचे वाटप करण्याचे काँग्रेसचे “राजकीय कल्चरच” वेगळे आहे. जे शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाशी बिलकुल जुळत नाही. शिवसेनेत ठाकरेंचा शब्द अंतिम चालतो. ठाकरे त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊन मोकळा होतात. त्याचे फायदे – तोटे ते नंतर बघतात. फायदा झाला तर उत्तम, तोटा झाला, तर तो अनुयायांचा, हा ठाकरेंचा बाळासाहेबांपासून चालत आलेला खाक्या आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरेंच्या “टर्म्स अँड कंडिशन्स” नुसार वाटाघाटी करायला बघते. काँग्रेससाठी ते मर्यादित अर्थाने बरोबर आहे, पण एकदा सीमा ओलांडली की काँग्रेस नेते कोणाचे ऐकायच्या मनःस्थितीत राहात नाहीत.
काँग्रेसमध्ये जरी गांधी घराण्याच्या मर्जीने सगळे निर्णय होत असले, तरी काँग्रेसची मूलभूत राजकीय प्रवृत्तीच दृष्ट्या “थंडा कर के खाओ” अशी आहे. कुठलाही निर्णय घेताना घाई गर्दी करायची नाही. समोरच्याला आपल्या मनातली खळबळ चेहऱ्यावर दिसू द्यायची नाही. समोरच्याने आपले सगळे पत्ते उघड केल्याशिवाय आपल्या हातातले छातीजवळ धरलेले पत्ते अजिबात उघड करायचे नाहीत आणि हुकमाचा एक्का किंवा पत्ता कोणत्याही परिस्थितीत आपल्याच हातात ठेवायचा, हे काँग्रेसचे “निगोसिएशन कल्चर” आहे. ज्याची थोडीफार सवय आणि “अनुभव” शरद पवारांना आहे, पण तो उद्धव ठाकरेंना बिलकुल नाही. सत्तेच्या वाटाघाटींमध्ये नरसिंह राव, सीताराम केसरी, सोनिया गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्या सारख्या दिग्गजांपुढे पवारांना मान तुकवावी लागली. आपण काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना “खेळवू” शकतो, पण केंद्रीय नेत्यांना “खेळवू” शकत नाही, हे पवारांना माहिती आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात “आवाज” टाकतात, पण दिल्लीत “आवाज” टाकायचा फंदात ते पडत नाहीत. दिल्लीत निमूटपणे काँग्रेस हायकमांडसमोर मान तुकवून मोकळे होतात.
Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियावर EDची पकड, HPZ ॲप घोटाळ्यात चौकशी सुरू
ठाकरे परिवाराला सवयच नाही
पण ठाकरे परिवाराला असल्या गोष्टीची सवय नाही. बाळासाहेब असोत की उद्धव असो, आत्तापर्यंत त्यांना फक्त भाजपशी “डील” करायचे माहिती होते. त्यातही बाळासाहेब स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर भाजपला हवे तसे वागवायचे. त्यामुळे भाजपशी जागावाटप किंवा सत्तेचे वाटप याविषयीच्या वाटाघाटी एकतर्फीच चालत असत. उद्धव ठाकरेंच्या वेळेला भाजपने थोडी “बरोबरी” करायला सुरुवात केली. 2014 नंतर तर भाजपने पूर्ण ग्रीप घेऊन ठाकरेंवर कुरघोडीच केली, पण ठाकरेंनी भाजपशी युती तोडली आणि त्यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू केली. त्यामुळे वाटाघाटींच्या बैठकीत बसण्याचा दरम्यानच्या काळात त्यांना कधी प्रश्नच आला नाही. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपशी जागावाटप करताना थोडीफार “दादागिरी” करून पाहिली, पण ती फारशी पचली नाही. सत्तेच्या वाटपात मात्र त्यांनी काँग्रेस आणि शरद पवारांकडून मुख्यमंत्रीपद मिळवले. 5 वर्षानंतर आज उद्धव ठाकरे 2019 च्या राजकीय धुंदीतच काँग्रेसशी वाटाघाटी करू पाहत आहेत, जे काँग्रेस नेते खपवून घ्यायला तयार नाहीत.
वाटाघाटींच्या बैठकीत समोरच्याची दमछाक करणे, छोट्या – छोट्या मुद्द्यांचा किस पाडणे, यात काँग्रेसचे नेते सगळ्या प्रादेशिक नेत्यांचे “बारसे” जेवले आहेत. काँग्रेसचे प्रदेश पातळीवरचे नेते ठाकरे किंवा पवारांपुढे निष्प्रभ झाल्याचे भासतात, पण ते निष्प्रभ होत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण आणि पूर्वीचे अशोक चव्हाण ही त्याची उदाहरणे आहेत. नाना पटोले कदाचित त्या रांगेत येऊन बसायची शक्यता आहे. कारण त्यांनी जागावाटपाच्या बैठकांमध्ये संजय राऊत यांना “कॉर्नर” केले म्हणून राऊत उचकले. वास्तविक कुठल्याही वाटाघाटींमध्ये उथळपणे उचकायचे नसते. “थंड” राहून समोरच्याच्या गळी आपला मुद्दा उतरवायचा असतो. समोरच्या गड्याला दमवून आपला मुद्दा मान्य करायला लावायचा असतो. यामध्ये काँग्रेसचे नेते माहीर आहेत. काँग्रेस हायकमांड तर सगळ्यांचे “आजे – पणजे” आहेत. हे पवारांना पक्के माहिती आहे. ठाकरेंना अजून काँग्रेसशी “डील” करणे “शिकायचे” आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App