नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांना नव्या उमेदीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या सह आपल्या पक्षाची बांधणी करण्याची संधी आली असताना आणि त्यातही पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरून पवारांसाठी पक्ष बांधणी करण्याची गरज असताना प्रत्यक्षात पवारांच्या पक्षामध्ये नव्या चेहऱ्यांचा मेळ बसेनासा झाला आहे. पवारांना नवीन नेते आणि नवीन कार्यकर्ते मिळायलाच तयार नाहीत, अशी त्यांच्यावर वेळ आली आहे. Sharad pawar has to perform old political experiment as no new faces comes in his NCP
वास्तविक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातून पवारांना मनुष्यबळाचे इंधन पुरवठा व्हायला काहीच हरकत नव्हती. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडताना दिसले नाही. त्यामुळे पवारांना माढा सारख्या मतदारसंघात त्यांचा 2004 चा जुनाच प्रयोग 2024 मध्ये राबविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पवारांना माढा मतदारसंघ भाजपकडून खेचून घेण्यासाठी 2004 चाच पवार + मोहिते + शिंदे या एकत्रीकरणाचा प्रयोग करावा लागत आहे. शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे हे तीन वृद्ध नेते आज माळशिरस मध्ये एकत्र येत असून ते विजयसिंह मोहिते पाटलांच्या “शिवरत्न” बंगल्यावर जेवण घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊन पवार त्यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार आहेत. इथे पवार, मोहिते पाटील किंवा सुशीलकुमार यांची ज्येष्ठता नाकारायचा मुद्दा नाही, पण पवारांना माढा मतदारसंघात प्रस्थापित मराठा नेतृत्वाशिवाय दुसरा उमेदवारच मिळायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
खरं म्हणजे अजित पवार पवारांचा अख्खा पक्ष घेऊन गेल्यानंतर पवारांना नव्या दमाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आपल्या पक्षात भरती करून पूर्णपणे पक्षाची नवी बांधणी करता आली असती, पण पवारांकडे तेवढे नवे, ताज्या दमाचे नेते आणि कार्यकर्ते आलेच नाहीत. त्यामुळेच पवारांवर आपल्या जुन्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरातले काका – पुतणे, मुलगा – मुलगी धुंडाळून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याची वेळ आली आहे.
– पवार प्रयोगाच्या मर्यादा
आपल्या वाट्याला आलेल्या 10 लोकसभेच्या जागांमध्ये पवारांना नवा राजकीय प्रयोग करायला फारसा वाव देखील नाही. कारण त्यांच्या पक्ष संघटनेचे नैसर्गिक स्वरूप देखील तसे नाही. प्रस्थापित किंवा सरंजामी मराठा नेतृत्व हे पवारांच्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाकडे उमेदवार आयात करत असले तरी, ती खेळी इतकी मर्यादित ठरते, की त्यामध्ये नवे तरुण + महिला + दलित + आदिवासी + ओबीसी हे समाज घटक पवारांच्या वाट्याला येत देखील नाहीत… आणि हे तेच समाज घटक आहेत, जे आजच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्णपणे निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या मतदानाच्या मोठ्या टक्केवारीतूनच ते प्रस्थापित कुठल्याही बड्या उमेदवाराला फार मोठ्या फरकाने पाडू शकण्याची क्षमता राखून आहेत.
पण पवारांकडे उपरोक्त समाज घटकांच्या प्रतिनिधींचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना “ताटातून वाटीत आणि वाटीतून ताटात” अशाच प्रकारे घेतल्याशिवाय पवारांपुढे पर्याय उरत नाही. म्हणूनच माढा मतदारसंघात मोहिते पाटलांच्या घरातल्या धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेची उमेदवारी देणे भाग पडले आहे.
आता धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यावर “पवारांनी डाव टाकलाच”, “चाणक्य खेळी केली”, वगैरे बातम्या येणारच आहेत, पण तरी देखील धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीमुळे माळशिरस पासून माढा पर्यंतचे वेगवेगळ्या मतदारसंघांमधले मोहिते पाटील विरोधक उचल खाणार हे निश्चित आहे. कारण मोहिते पाटलांची राजकीय मर्यादा माळशिरस तालुक्याच्या पुढे गेल्याची चिन्हे दिसत नाहीत आणि विशिष्ट मर्यादेपलिकडे जाऊन मोहिते पाटील देवेंद्र फडणवीसांशी “खरा” राजकीय पंगा घेण्याच्या स्थितीत नाहीत…!!… हे प्रत्यक्षात निवडणुकीनंतर लक्षात येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App