अर्थसंकल्पावरून रोहित पवारांनी काढली शिंदे – फडणवीसांची दिल्लीतली “लायकी”, पण त्यांच्या आजोबांची दिल्लीतली “लायकी” नेमकी किती??

 

केंद्रातल्या मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीचा धडा घेऊन मांडलेल्या अर्थसंकल्पात युवकांच्या हाताला रोजगार, शेती क्षेत्र, महिला आणि गरीब यांच्यासाठी भरघोस तरतुदींच्या योजना जाहीर केल्या. याच अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहार आणि आंध्र प्रदेश यांच्यासाठी एकत्रित 75000 कोटी रुपयांची विकासाची तरतूद केली. मात्र महाराष्ट्राचे नाव घेऊन कोणतीही घोषणा केली नाही. याचे निमित्त साधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतली “लायकी” काढली. केंद्राच्या या बजेटने महाराष्ट्रातल्या सत्ताधारी नेत्यांची दिल्लीत किती लायकी आहे, हे सिद्ध झाले, असा टोमणा रोहित पवारांनी शिंदे आणि फडणवीस यांना मारला.

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला या केंद्रीय अर्थसंकल्पातून नेमके काय मिळणार??, याची यादीच वाचून दाखवली. मात्र रोहित पवारांनी लहान तोंडी मोठा घास घेऊन शिंदे आणि फडणवीस यांच्या बाबतीत जो “लायकी” शब्द वापरला तोच “लायकी” शब्द वापरून त्यांच्या आजोबांचे नेमकी दिल्लीत राजकीय स्थान किती आणि कोणते??, हा सवाल बोचरा असला तरी विचारता येऊ शकतो!!

मध्यंतरी स्वतः शरद पवारांनी आपले दिल्लीत काही नाणे चालते, असे वक्तव्य केले होते. पण ते नाणी फक्त “इंडी” आघाडीतल्या विशिष्ट बैठकांपुरते चालते हे मात्र त्यांनी चलाखीने लपवले होते. बाकी गेल्या 10 वर्षात केंद्रातल्या मोदी सरकारच्या मोदी सरकारच्या कुठल्याही धोरणामध्ये किंवा महत्त्वपूर्ण निर्णय यामध्ये शरद पवारांचे कुठलेच नाणे चालले नसल्याचे दिसले. अगदी काश्मीर मधून 370 कलम हटवणे असो अथवा पाकिस्तान वरचा सर्जिकल स्ट्राइक असो पवारांचे खरे अथवा कोठे नाणे तिथे चालण्याची शक्यताच नव्हती, ते तिथे चाललेही नाही. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जो काही पत्रव्यवहार केला, तो फक्त महाराष्ट्रातले साखर कारखाने आणि पुण्या मुंबईतले बिल्डर यांच्या पुरता मर्यादित होता.

पण त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचताना रोहित पवारांनी जो “लायकी” शब्द वापरला, तोच “लायकी” शब्द वापरून पवारांचे दिल्लीतले स्थान नेमके काय??, हे विचारता येऊ शकते.

शरद पवार दिल्लीत 1991 मध्ये गेले, ते पंतप्रधान पदाला गवसणी घालण्याचे आव्हान देऊन, पण प्रत्यक्षात ते नरसिंह राव यांच्याकडून हरले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याकडून पराभूत झाले. सोनिया गांधींचा परकीयत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष काढावा लागला आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसच्या सत्तेच्या वळचळणीला जाऊन बसावे लागले.

महाराष्ट्रात काँग्रेसचा राजकीय परफॉर्मन्स कितीही कमी जास्त झाला, तरी काँग्रेसने संधी येताच मुख्यमंत्रीपद प्रत्येक वेळी पटकावले. पण राष्ट्रवादी काँग्रेसला कधीच मुख्यमंत्रीपद मिळू दिले नाही. किंबहुना शरद पवारांना ते काँग्रेसकडून कधीच खेचून घेता आले नाही.

पवार 1991 मध्ये नरसिंहराव यांच्याकडून पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत हरले असले तरी त्यांना नरसिंह राव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून केंद्रात संरक्षण मंत्री पदावर नेले होते. पण दोनच वर्षात मुंबई दंग्यांची संधी मिळताच नरसिंह राव यांनी पवारांना संरक्षण मंत्री पदावरून काढून दिल्लीतून मुंबईत मुख्यमंत्री पदावर पाठवून दिले होते. पवारांना 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस प्रणित यूपीए सरकार मध्ये नवव्या क्रमांकाचे कृषी मंत्रीपद स्वीकारावे लागले होते. 72000 कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी याचे क्रेडिट पवार स्वतःकडे घेतात, पण ती कर्जमाफी सोनिया गांधी यांनी मान्यता दिल्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने केली होती, ही वस्तुस्थिती विसरता येत नाही.

त्यामुळे रोहित पवारांनी शिंदेंची दिल्लीतली काय “लायकी” आहे??, असा सवाल केला असला तरी प्रत्यक्षात तोच “लायकी” शब्द वापरून पवारांचे नेमके दिल्लीतले राजकीय स्थान काय आहे??, याचे वर फक्त मासले म्हणजे उदाहरणे दिली आहेत.

त्या पलीकडे जाऊन शिंदे किंवा फडणवीस हे मूळातच दिल्लीतल्या नेतृत्वाला आव्हान द्यायला गेलेच नाहीत. त्यांना त्यांच्या राजकीय मर्यादा निश्चित माहिती आहेत. त्या राजकीय मर्यादा केव्हा आणि कशा ओलांडायच्या??, हे त्यांच्या भविष्यातल्या कारकिर्दी मधले सवाल आहेत. पण आत्तापर्यंत तरी त्यांनी आपापले राजकीय वकूब ओळखूनच राजकारण केल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतली त्यांची “लायकी” काय??, हे विचारून डिवचण्यापेक्षा रोहित पवारांनी आपल्या आजोबांचे दिल्लीतल्या राजकारणातले नेमके आणि खरे स्थान काय??, हे ओळखले पाहिजे, मग ते इतरांची “लायकी” काढू शकण्याच्या स्थितीतही उरणार नाहीत!!

Rohit pawar targets eknath shinde and devendra fadnavis over their “status” in Delhi, but what is real “status” of his own grandfather in Delhi??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात