नाशिक : महाविकास आघाडी सरकारने काल आमदारांना मुंबईत मोफत घरे बांधून देण्याची घोषणा केली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षां मधल्या सर्व आमदारांनी बाके वाजवून घेतली पण आज जेव्हा सोशल मीडियातून जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्या. जनतेच्या संतापाचा अंदाज आला त्यावेळी अनेकांनी मोफत घरांच्या योजनेकडे तोंडे फिरवलेली दिसली…!!
वास्तविक पाहता काल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडातर्फे 300 आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा केली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला. तेव्हाच आमदारांनी विधानसभेत विरोध करायला हवा होता. पण तेव्हा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले. ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये आली आणि त्यानंतर सोशल मीडिया मधून आमदारांना मोफत घरे देण्याच्या योजनेवर जोरदार प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी आमदारांचे अक्षरशः वाभाडे काढले.
आमदारांचे पगार किती? त्यांना भत्ते किती? गाडी – प्रवास मोफत…!! असे सवाल करत जनता वीज पाणी शिक्षण रेशन यासाठी त्रासलेली असताना आमदारांवर पैशाची आणि घरांची उधळपट्टी का?, असा सवाल केला आहे. अनेक योजना निधीअभावी बंद पडतात पडतात. त्याला पैसा नाही आणि आमदारांना फुकट घरे द्यायला मात्र पैसा आहे अशा स्वरूपाचे टीकास्त्र सोशल मिडियाच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वरून विकास आघाडी सरकारवर सुटले आहे. आता सगळी कडून जेव्हा शरसंधान साधले जात आहे तेव्हा सुरवातीला विरोध पक्षाच्या आमदारांना जाग आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे आमदार आहेत त्यांनी मोफत घरे देण्याच्या योजनेवर आज टीका केली आहे. ते काल काहीच बोलले नव्हते. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मोफत घर आज नाकारले आहे. त्यांनी देखील ही घोषणा होत असताना कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नागपुरात मोफत घरे देण्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. माझा भाऊ आमदार आहे. पण आम्हाला मोफत घराची जरूरत नाही, असे ते म्हणाले आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की काल मोफत घरे मिळणार म्हणून खूश झालेले आमदार विधानसभेत बाके वाजवत होते आणि आज जनतेचा संताप बघून त्यांनी या योजनेकडे तोंड फिरवल्याचे दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App