नाशिक : नुसतं “ओरिजिनल” बोलून कोणीही ब्रँड होत नसतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडल वरून सुनील तटकरेंना डिवचले असले, तरी प्रत्यक्षात पवार नावाच्या ब्रँडला आणि ठाकरे नावाच्या ब्रँडला महाविकास आघाडीच्या जागा वाटपातून धक्का देण्याचा निर्णय अर्थातच कुठल्या महायुतीतल्या घटक पक्षाने नव्हे, तर काँग्रेस पक्षाने घेतला आहे. Congress has upper hand in seats sharing in maharashtra, push back to pawar + thackeray brands
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स ठाकरे आणि पवार यांच्या पक्षांपेक्षा खूपच उंचावल्याने काँग्रेसच्या बाहूंमध्ये जबरदस्त बळ संचारले आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वरचष्मा राखायचे ठरवून काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचे नाव कटाप करण्याची अट ठाकरे आणि पवारांसमोर ठेवली आहे. ज्याच्या जागा जास्त निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री होईल, अशी अट घालून काँग्रेसने ठाकरे आणि पवार ब्रँडला महाविकास आघाडीतूनच कोलदंडा घालण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नावाला पुढे करून त्यांच्याविषयीचा सहानुभूतीचा लाभ महाविकास आघाडीला घेण्याचा इरादा शरद पवारांनी व्यक्त केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. परंतु, आता पवारांच्या त्या इराद्यालाच काँग्रेस मधून सुरुंग लावण्याचे घाटत असल्याची बातमी राजधानीच्या राजकीय वर्तुळातून समोर आली आहे. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सचा या बातमीला मोठा आधार मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या. उद्धव ठाकरेंच्या 21 पैकी 9 जागा निवडून आल्या, पण काँग्रेसच्या 17 पैकी 14 जागा निवडून आल्याने काँग्रेस महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनला. त्यामुळे काँग्रेसच्या वाटाघाटींमध्ये ठाकरे आणि पवार यांच्यापेक्षा जास्त दम आला. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार हे दोन्ही ब्रँड मोठे असल्याचे “डेकोरेशन” शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले. ते काही अंशीच यशस्वी ठरले, पण ठाकरे आणि पवार या दोन्ही ब्रँडची “दादागिरी” त्यांच्याच पक्षांमधून फुटून निघालेल्या दोन गटांवरच चालली. ती भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर चालू शकली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप जुलै अखेरपर्यंत पूर्ण करावे, पण कुठलाही चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी समोर करू नये, असा इरादा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीत सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. त्यामध्ये लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी सामील झाले.
एरवी काँग्रेस हायकमांड मधले कुठलेही नेते जागा वाटपाच्या वाटाघाटींमध्ये निर्णायक क्षणी सहभागी होत असतात. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून “रस” घ्यायला लागले आहेत. ही महायुतीतल्या घटक पक्षांपेक्षा पवार आणि ठाकरे या ब्रँड साठी खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा आहे. कारण आता प्रोटोकॉल नुसार उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यापेक्षा राहुल गांधी हे वरिष्ठ नेते बनले आहेत. ते लोकसभेतले विरोधी पक्षनेते याचा अर्थ शॅडो कॅबिनेटचे पंतप्रधान बनले आहेत. अर्थातच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात (ते तसे होणार असेलच तर) काँग्रेसचाच वरचष्मा असणार आहे. त्यात महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील वगैरे बळकट नेते असतील, पण त्याहीपेक्षा राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्निथला यांच्यासारखे केंद्रीय नेते पण निर्णायक क्षणी आपला हातचा राखून ठेवतील. (हा जागावाटपातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असेल.)
लोकसभा निवडणुकीचे निकाल एकूणच असे लागले आहेत, की ठाकरे आणि पवार ब्रँडला महाराष्ट्रात मर्यादित यश मिळाले, पण काँग्रेस नावाच्या ब्रँडला आणि त्यातही राहुल गांधी नावाच्या ब्रँडला 99 जागांचे यश मिळाल्याने त्यांचा वरचष्मा केंद्रापासून राज्यापर्यंत निश्चित स्वरूपात निर्माण झाला आहे. यात सोनिया गांधी कॅप्टन म्हणून सध्या तरी “नॉन प्लेईंग” असल्या तरी त्या निर्णयक क्षणी “ऍक्टिव्ह” होऊन ठाकरे आणि पवार ब्रँड एका झटक्यात “नलिफाय” करू शकतील!! म्हणूनच महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांनी ठाकरे आणि पवार या दोन्ही ब्रँडचे कितीही “डेकोरेशन” केले, तरी प्रत्यक्षात निर्णय काँग्रेसच बाजी मारून जाते याचा अनुभव लोकसभेच्या आकड्यांनी दिला आहे. तो जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये परावर्तित होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App