महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ मानले जातात. देशावर चीनी व्हायरसचे संकट आले असताना आणि महाराष्ट्रावर ते आणखीनच गडद असताना पवार राज्य सरकारला युक्तीच्या चार गोष्टी का सांगत नाहीत, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. ‘फेसबुक लाईव्ह’मधून सरकारचे कौतुक करण्यापलीकडे पवारांनी काही केलेले नाही.
निलेश वाबळे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ मानले जातात. देशावर चीनी व्हायरसचे संकट आले असताना आणि महाराष्ट्रावर ते आणखीनच गडद असताना पवार राज्य सरकारला युक्तीच्या चार गोष्टी का सांगत नाहीत, याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत आहेत.
आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ म्हणून शरद पवार यांची नेहमीच प्रसिध्दी होते. किल्लारीतील भूकंपावेळी त्यांंनी केलेल्या कामाचा दाखला अजूनही दिला जातो. ऐवढेच नव्हे तर भुज येथे भूकंप झाला त्यावेळीही तत्कालिन भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उमदेपणा दाखवत पवारांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून पाचारण केले होते. याबाबतच्या अनेक कहाण्या सांगताना पवारसमर्थकांच्या तोंडाला फेस आलेला अनेकांनी पाहिला आहे.
३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूरमधील किल्लारी येथे भूकंप झाला. त्यावेळी पवार मुख्यमंत्री होते. रेडिओवर बातमी येण्याआधीच शरद पवार हे लातूरात दाखल झाले होते. पवार या घटनेचा उल्लेख करताना सांगतात की त्या रात्री अनंत चतुर्दशी होती. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचा तणाव प्रशासनावर होता. स्वत: गृहमंत्री असल्यामुळे मी रात्रभर मिरवणुकांचा आढावा घेत होतो. रात्री तीन साडेतीन वाजता मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर मी निर्धास्तपणे झोपण्यासाठी गेलो. झोपलो तोच काही मिनिटांत जमिनीला हादरे जाणवू लागले. वर्षा निवासस्थानाच्या काचा हलू लागल्या इतका तीव्र धक्का होता. तात्काळ मी कोयनानगराच्या भूकंप मापन केंद्राला फोन लावला. महाराष्ट्रात भूकंपाचे केंद्र हे कोयनेच्या आसपासच असायचे. तेव्हा मला अधिकार्यांनी सांगितले की भूकंपाचे केंद्र हे लातूर जवळ आहे. मी लगेच सकाळी ७ वाजता विमान पकडले आणि ७.४० ला भूकंपाचे केंद्र असलेल्या किल्लारी गावात दाखल झालेही. गावात प्रचंड भीषण परिस्थिती होती, स्वत: काही मृतदेह बाहेर काढले. संकटामुळे गावकरी आणि अधिकार्यांचे मनोबल खचले होते. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पवार यांनी त्यांचे मित्र मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते मोहन आगाशे यांची मदत घेतली. इतकेच नव्हे तर शेतकर्यांसाठी पवारांनी त्याकाळी कोट्यवधी रुपये अवघ्या काही दिवसांत जमवले.
त्यांच्या या कामाची दखल विरोधी पक्षातील नेत्यांनीही घेतली. म्हणूनच अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००१ रोजी स्थापन केलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार यांना केले होते. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली, सातार्यातील गेल्या वर्षीच्या महापुराच्या वेळीही पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि अर्ध्या तासात दीड कोटींची मदत जमा केली. सत्ता हातात नाही, प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तरीही पवारांनी पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागाचा दौरा केला होता. खचलेल्या लोकांना धीर दिला होता, असे सांगत तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारपेक्षा पवार अधिक सक्रीय असल्याच्या बातम्याही पेरण्यात आल्या.
मग आता प्रश्न उपस्थित होतो की चीनी व्हायरसमुळे आलेल्या या संकटावेळी पवार काय करत आहेत? राज्यातील महाआघाडीचे सरकार हे पवारांचेच अपत्य असल्याचे म्हटले जाते. त्यांनीच उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी गळ घातली. त्यांचा राज्याभिषेक केला. मग आता प्रशासनाचा अनुभव नसलेल्या उध्दव ठाकरे यांच्या पाठीमागे आपला गेल्या पन्नास वर्षांचा अनुभव पवार का उभा करत नाहीत?
शरद पवार सध्या मुंबईतील ‘सिल्हवर ओक’ या निवासस्थानी आहेत. नाही म्हणायला त्यांनी दोन वेळा फेसबुक लाईव्ह केले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सवरून चर्चा केली त्यावेळी तेही सहभागी झाले होते. त्यावेळी केंद्राकडे त्यांनी काही मागण्याही केल्या. शेतीवर अवलंबून असलेल्या घटकांना तातडीने दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलवावीत. राज्य सरकारचे उत्पन्न कसे वाढले याकडे लक्ष द्यावे. जीएसटीचा राज्यांचा वाटा अद्याप मिळाला नाही तो राज्यांकडे वर्ग करावा, अशी मागणी केली. राज्यापालांकडून थेट कार्यकारी वर्गाला सूचना दिल्या जात असल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. या झाल्या केंद्र सरकारकडे त्यांनी केलेल्या मागण्या. परंतु, राज्यातील सरकारमध्ये त्यांचा पक्ष सहभागी आहे. या संकटाच्या काळात राज्यातील यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी त्यांंनी अनुभवाचे बोल सांगितल्याचे ऐकिवात नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळी शरद पवार यांनी स्वत: राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सक्रीय केले होते. मोठ्या प्रमाणावर मदत गोळा केली होती. आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत नाहीत, हे पवारांना दिसत नाही का? सत्ता नसूनही देवेंद्र फडणवीस शेकडो कार्यकर्ते, राज्यातले महत्वाचे लोक, अधिकारी वर्ग यांच्याशी रोज संपर्क साधत आहेत. सोळा-सतरा तास काम करत आहेत. ऐंशीच्या घरात असलेल्या पवारांनी ही धडाडी दाखवणे अपेक्षित नाही;पण ते सरकार आणि ‘राष्ट्रवादी’लाही या संकट काळात ‘चार्ज’ करु शकलेले नाहीत.
उध्दव ठाकरे सातत्याने फेसबुकवरून संवाद साधत आहेत. भावनिक आवाहन करत आहेत. लोकांना त्यांचे नम्र बोलणे आवडतही आहे. मात्र, संकटात राज्याचा गाडा चालविताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. प्रशासकीय यंत्रणा ही बशा बैल असते. शेपटी पिरगळूनच तीला चालायला लावावे लागते हे ते उध्दव ठाकरे यांना का सांगत नाहीत? हा देखील प्रश्न आहे. उध्दव ठाकरे मुंबईत आहेत. त्यांचे अनेक मंत्री हे आपापल्या मतदारसंघात आहेत. वेगवेगळ्या निर्णयांचे व्हिडीओ करून टाकत आहेत. पण या कठीण प्रसंगी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती प्रशासन आपल्यासाठी काम करते आहे याचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण व्हायला हवा. आपल्या पाठीशी सरकार आहे, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंपासून कशाचीही कमतरता भासणार नाही, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला तर लॉकडाऊन तोडून लोक बाहेर पडणार नाहीत. त्यामध्ये नेमके सरकार अपयशी ठरत आहे. अगदी भाज्यांचे उदाहरण घेऊ. राज्यातील कोणत्याही गावात आणि शहरात सर्वात जास्त गर्दी ही भाज्यांसाठी होते. तब्बल दहा वर्षे केंद्रात कृषि मंत्री राहिलेले आणि सहकारी चळवळीचे महाराष्ट्रातील प्रमुख म्हणविल्या जाणार्या पवारांनी ठरविले तर भाजीपाला पोहोचविण्याची साखळी संपूर्ण राज्यभर उभी राहू शकते. त्यासाठी पवारांनी या वयात स्वत: मैदानात उतरण्याचीही गरज नाही. फक्त यंत्रणा कार्यान्वित करायची आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप हे का झाले नाही हे गुलदस्त्यातच आहे.
उध्दव ठाकरे यांच्या भाषाशैलीवर फिदा झालेला एक मोठा वर्ग महाराष्ट्रात तयार झाला आहे. भाजपविरोधात असलेल्या काही पुरोगाम्यांचेही उध्दव आता ‘ब्ल्यू आईड बॉय’ झाले आहेत. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांच्यासारख्या कडव्या मोदीविरोधकाने उध्दव यांची सातत्याने स्तुती सुरू केली आहे. ती करण्यातही हरकत नाही. पण सुबुध्द नागरिकांना मात्र आता केवळ शब्दांचा दिलासा आणि फुलोरा पुरेसा वाटेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील रस्त्यावर काठ्या घेऊन फिरणार्या पोलीसांपेक्षा मानवतावादी सरकार दिसावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, ते दिसत नाही.
अत्यंत कार्यक्षम म्हणविणारे उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प आहेत. शरद पवार लोकांना लॉकडाऊनच्या काळात काय वाचावे याचा उपदेश करत आहेत. हे गौडबंगाल तरी काय आहे? उध्दव यांच्या अनुभवशुन्यतेमुळे परिस्थिती अधिकाधिक बिघडत गेल्यावर संकटमोचक म्हणून पवारांना पुढे तर यायचे नाही ना?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App