मायावतींच्या “चाणक्यां”चे नवीन सोशल इंजिनिअरिंग की ब्राह्मणांवरचा सूड?


उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाजाला लुभावण्यासाठी मायावतींचे “चाणक्य” सतीशचंद्र मिश्रा हे वाहावत गेले आहेत. योगींच्या गुंडगिरीविरोधातील कारवाईला त्यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. २००७ मध्ये मायावती ज्या सोशल इंजिनिअरिंगच्या बळावर बहुमताने निवडून आल्या त्यालाच सतीशचंद्र मिश्रा हे छेद देण्याचाच प्रकार गुंड प्रवृत्तींच्या पाठराखणीतून करीत आहेत.will mayavati and satishchandra mishra succeed in gaining support of brahmins in UP? by supporting gunda elements?


बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती २००७ चा निवडणूक फॉर्म्युला परत उत्तर प्रदेशात राबवू पाहात आहेत. वेगवेगळ्या जातींच्या समाजघटकांची निवडणूकीपुरती राजकीय जोडणी हा त्यांचा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला आहे.

तो २००७ मध्ये यशस्वी झाला पण त्यानंतरच्या एकाही निवडणूकीत यशस्वी झालेला नाही. तरीही मायावतींना तोच प्रयोग पुन्हा करून पाहायची इच्छा आहे. हरकत नाही. लोकशाहीत त्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे.पण तरीही एक प्रश्न पडतो, २००७ सालच्या प्रयोगातल्या ब्राह्मण या यशस्वी समाज घटकाशी त्या राजकारणातले सोशल इंजिनिअरिंग करू पाहाताहेत की त्या घटकावर त्या राजकीय सूड उगवू इच्छित आहेत…?? कारण उघड आहे, मायावतींचे नंबर दोनचे नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी केलेली घोषणा. उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारच्या काळात ब्राह्मण समाजातल्या नेत्यांचे एन्काउंटर झाले,

त्याचा सूड बहुजन समाज पक्षाच्या बहनजींचे अर्थात मायावतींचे सरकार आल्यावर घेऊ, ही घोषणा सतीशचंद्र मिश्रा यांनी करून टाकून ब्राह्मण समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मूळात सतीशचंद्र मिश्रा यांचे राजकीय तर्कटच चूकीच्या राजकीय गृहीतकावर आधारित आहे. ते स्वतः जरी ब्राह्मण असले आणि मायावतींचे चाणक्य असले, तरी उत्तर प्रदेशातला सगळा ब्राह्मण समाज त्यांच्याच सारखा विचार करतो किंवा ज्या ब्राह्मण गुंडांना योगी सरकारने एन्काउंटरमध्ये मारले ते सगळे गुंड उत्तर प्रदेशातल्या सगळ्या ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करीत होते हे मानणे सर्वस्वी चूक आहे.

जे मारले गेले किंवा जेलमध्ये गेले ते गुंड म्हणून गेले. ब्राह्मण म्हणून नाही. हा महत्त्वाचा मुद्दा सतीशचंद्र मिश्रा विसरले आहेत. किंबहुना त्यांनी हा मुद्दा मुददामहून नजरेआड केला आहे.

आणि उत्तर प्रदेशातील गुंडांच्या बाबतीत सतीशचंद्र मिश्रा यांचेच जातीय निकष लावायचे तर मुख्तार अन्सारी, अतिक अहमद यांच्यासारख्या गुंडांना योगी सरकारने जेलची हवा खायला लावून त्यांच्या कोट्यवधी रूपयांच्या मालमत्ता जप्त केल्या किंवा बुलडोझर लावून पाडल्या आहेत,

त्या काही ते गुंड मुसलमान होते म्हणून नव्हे, तर ते फक्त गुंड आहेत म्हणून त्यांच्यावर कोर्टाच्या आदेशांनुसार कठोर कायदेशीर कारवाया केल्या आहेत. हे इथे विसरून चालणार नाही.

म्हणजे कोणत्या विकास दुबे नावाच्या माणसाने गुंडगिरी केली, तर उत्तर प्रदेशातले सगळे ब्राह्मण गुंड ठरत नाहीत तसेच त्या विकास दुबेचा एन्काउंटर केला तर तो काही सगळ्या ब्राह्मणांविरोधातील गुन्हा ठरत नाही. तसेच कोणा मुख्तार अन्सारी किंवा अतिक अहमद यांची आणि त्यांनी पोसलेल्या गुंडांची मालमत्ता बुलडोझर लावून पाडली तर ती सगळ्या मुसलमानांविरोधातली कारवाई ठरत नाही.

त्यामुळे सतीशचंद्र मिश्रा यांनी ब्राह्मणांच्या बाजूने केलेली हाकाटी चूकीचीच आहे. उत्तर प्रदेशातल्या सगळ्या ब्राह्मणांनी मिळून विकास दुबेच्या एन्काउंटरचा बदला घेण्याची मागणी केलेली नाही. पण हा आभास जो सतीशचंद्र मिश्रा यांनी तयार केला आहे त्यामागचे त्यांचे राजकीय तर्कट तकलुपी तर आहेच पण २००७ मध्ये ज्या सोशल इंजिनिअरिंगच्या बळावर मायावतींना बहुमत मिळाले होते, त्या सोशल इंजिनिअरिंगच्या मूळ संकल्पनेविरोधात देखील जाणारे आहे.

२००७ मध्ये मायावतींसारख्या दलित नेतृत्वाने ब्राह्मण समाजाला हाक देणे ही एक राजकीय अप्रूप असलेली घटना होती. कारण तोपर्यंत मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची जडणघडण पूर्णपणे वेगळ्या धर्तीची होती. त्यांनी त्यावेळी ब्राह्मण समाजाला मैत्रीचा हात देणे याला विशिष्ट राजकीय अर्थ होता आणि त्यामागची पार्श्वभूमी समाजवादी पक्षाच्या तद्दन जातीय राजवटीची होती.

तेव्हा दलित – ब्राह्मण जातीय राजकीय एकजूट चालून गेली. पण तोच प्रयोग नंतरच्या कुठल्याही निवडणूकीत फारसा यशस्वी ठरला नाही, हा उत्तर प्रदेशातला नजीकचा राजकीय इतिहास आहे.

आणि त्यातही गुंडगिरीला जातीय रंग देऊन तर तो जूनाच प्रयोग नव्याने यशस्वी होण्याची शक्यता देखील फारच कमी आहे… मग भले तो मायावतींच्या “चाणक्यां”नी कितीही राजकीय हुषारीने करायचा ठरवला असला तरी…!! कारण गंगा, शरयूमधून आता बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात नव्या पिढीचा उदय झाला आहे. मायावतींच्या चाणक्यांकडे नव्या पिढीचे कोणी प्रतिनिधी नसल्याने ते जूनेच फॉर्म्युले उगाळत आहेत. म्हणूनच त्यांचा गुंडगिरीच्या जातीय सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे.

will mayavati and satishchandra mishra succeed in gaining support of brahmins in UP? by supporting gunda elements?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती