मेळघाट उजळविणारा समर्पित वनवासी..! 


आदिवासींना शाश्वत व त्यांच्या स्वभावाला अनुरूप रोजगार देण्यासाठी मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्र स्थापन करून कौशल्य निर्मिती केंद्र उभारणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले. आदिवासींसाठी समर्पित भावनेने करत असलेल्या त्यांच्या कार्याचा वेध घेणारा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तरलपणे वेध घेणारा लेख… Obituary of melghat bamboo hero Sunil Deshpande


प्रिय सुनीलजी,
आज अकरा दिवस झाले…
“कुठे हरवला आहात ?” हा प्रश्न तुमच्यासाठी गैरलागू होता.
“कशात हरवला आहात ?” हा योग्य प्रश्न असायचा.
तुमचा माग काढत रहाण्यात  नेहमीच आनंद मिळायचा. तुमचा माग घेत रहावासा वाटला याला अनेक कारण…तुमची आचारसरणी. एकरेषीय नसलेला तुमचा सामाजिक प्रवास .त्या विविधतेमधून तुमच्यापाशी आलेला अनुभवाचा खजिना. सर्वात महत्वाचं, समाज आणि समाजव्यवस्थेबद्दलची सतत आणि  प्रयत्नपूर्वक विस्तारलेली तुमची दृष्टी !

साधारण दीडवर्षापूर्वीची गोष्ट ! सकाळीच तुमचा फोन…”हुनर खोज यात्रेचे सगळं मटेरियल तुझ्याकडे देणार आहे, त्यातून एक video presentation करून दे. मुग्धाला भेटायला मी किंवा निरुपमा येणार आहे, तेव्हा सगळं बाड घेऊन येतो तुझ्याकडे…”ठरल्याप्रमाणे लवादा ते पुणे अशी ५५० किलोमीटरची दडदड करत तुम्ही आलात. . “जोरदार काम झालंय.” असं म्हणत पाच-सहा पेनड्राईव्ह, कागदपत्र समोर ठेवली.देशभरातले सगळे प्रांत धुंडाळून तिथल्या पारंपारिक कारागीरांचे घेतलेले video-photo त्यात होते. लाकडी खेळणी बनवणारे, सूत कातणारे,मातीची भांडी करणारे, बांगड्या बनवणारे…. “अरे यांच्याकडे कोणाचं लक्षच नाही. यांचा थोडा का होईना अर्थव्यवस्थेतही वाटा आहे. यांची कुटुंब चालतात यावर…भरपूर माहिती, आकडेवारी जमा झाली आहे. चांगलं presentation करूया. केंद्र सरकारला स्वतंत्र कारागीर मंत्रालयच स्थापायला लावूया…..”मी तुम्ही आणलेले video पहात होतो. कारागीरांच्या कुशलतेबाबत शंका नव्हती, पण स्टार्टअप आणि ऑनलाईनच्या जमान्यात हे सारे जागतिक स्पर्धेला, बाजारपेठेला कसे पेलणार ? हे तरंग माझ्या मनात उमटत होते. पण तुम्ही हरवून गेला होता. ‘डिझाइनर आणि इनोव्हेटर हे फक्त मोठ्या, नावाजलेल्या संस्थात घडत नाहीत, ते खेडोपाडी देखील जन्म घेतात’ हे विनू काळेंच वाक्य आळवत होता. “अरे यांना कच्चा माल हवा तसा, हव्या त्या प्रमाणात आणि हवा तिथे मिळायला हवा. यांच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था उभी राहिली कि बस्स !”या तुमच्या हवेतल्या गप्पा नव्हत्या. तुमच्याकडे मेळघाटातला सिद्धहस्त अनुभव होता. कारागीर, कौशल्यविकास , व्यवसाय आणि त्या व्यवसायावर आधारित समाजव्यवस्था या चार ठिपक्यांना जोडून तुम्ही मेळघाटात रांगोळी रेखाटली होती, त्यातून हा आत्मविश्वास आला होता. त्या रांगोळीची आवृत्ती तुम्ही साऱ्या भारतभर काढू पहात होता. फरक इतकाच कि आता बांबूसोबत माती, धातू, कापड अशी संसाधन तुम्ही वापरणार होता.
तुमच्या या आत्मविश्वासाची चुणूक आपल्या पहिल्या भेटीत मला अनुभवायला मिळाली होती. बांबू प्रोसेसिंगवरची फिल्म करायला तुमच्याकडे आलो होतो. पुण्याहून बसने बुऱ्हाणपूर तिथून धारणी आणि धारणीहून लवादा. लवाद्याच्या अलीकडे तीन-चार किलोमीटर बस फेल झाली. तुम्हाला निरोप पाठवला. तुमचा कार्यकर्ता सायकलवर आला. शुटिंगचं जड सामान सायकलवर लादून पदयात्रा करत लवादा गाठलं. तुमच्या उत्साही स्वागतान आणि तिथल्या वातावरणानं प्रवासाचा सगळा शिणवटा गेला. बांबूची कौलारू घर, सारवलेली जमीन आणि गर्द झाडी…संपूर्ण बांबू केंद्राच्या भोवतालचा रम्य परिसर. आदिवासींच्या टुमदार झोपड्या.केंद्राच्यामागचा मोठा तलाव. सकाळ-संध्याकाळी धूळ उडवत जाणार गोधन….पहिल्यां झटक्यात लक्ष वेधलं ते तुमच्या सौंदर्यदृष्टीन  ! अत्यन्त कलात्मकतेने तुम्ही केंद्राचा परिसर सजवला होता. तीन दिवस तुमचा सगळा पट ऐकला. “अरे हे काम मला नागपुरात राहून ही करता आलं असत, पण मी नुसता सल्लागार राहिलो असतो. तुमचं स्वतःच केंद्र वा कामाच ठिकाण आहे का ? या प्रश्नाला उत्तर देऊ शकलो नसतो. बांबूवर बोलण्याचा अधिकारही गमावला असता” तो अधिकार कमावण्यासाठी तुम्ही मोठे कष्ट घेतले होते.  MSW ची पदवी घेतल्यावर नागपुरातील विख्यात आर्किटेकट विनू काळे आणि नंतर महेश शर्मा यांच्यासोबत तुम्ही बिहारमध्ये अक्षरशः रानोमाळ भटकलात. नंतर नानाजी देशमुखांसोबत चित्रकुटला आलात. तिथल्या विद्यापीठात बांबू विभागाचे प्रमुख झालात. बांबूचं प्रशिक्षण देणार पहिलं केंद्र उभारलं. तुम्हाला माणसाला त्याच्या पायावर उभं करणार शिक्षण देण्यात रस होता तर विद्यापीठाला पदवी वाटण्यात ! त्या विद्यापीठाचं सरकारीकरण होऊ लागलं तस नानाजींनी ते विद्यापीठ सोडलं, त्यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन तुम्हीही !  बांबूवर काम करायचं हे निश्चित होत. तुम्ही मेळघाटात लवाद्याला आलात. इथल्या कोरकूंना बांबू शिकवायला सुरुवात केली.

“मी यांच्यासाठी नाही तर यांच्यासोबत काम करायला आलो आहे” हा तुमच्यालेखी डॉयलॉग नव्हता. ती तुमची मनोभूमिका होती. त्या मनोभूमिकेचं बीज घेऊन तुम्ही स्वतःला लवाद्यात रुजवलंत. तुम्ही मनानं, संस्कृतीन, व्यवहारानं, सर्वार्थाने लवाद्याचे ग्रामस्थ झालात. कोरकू, गोंड आदिवासी संस्कृतीचे कितीतरी बारकावे तुम्ही सहज उलगडायचा. दरवर्षी दिवाळी आणि होळीच तुमचं निमंत्रण ठरलेलं असायचं.”आमचे आदिवासी जेव्हा नाचतात तेव्हा तुम्ही यायला हवं. तुम्ही याल तेव्हा ते नाचणार नाहीत.” कुपोषित मेळघाटाच चित्र रंगवण्यापेक्षा तिथल्या बलस्थानांना उजळ करण्यास तुम्ही अग्रक्रम दिला व तसे प्रयत्नही केले. इथल्या कोरकूंकडे पारंपारिक ज्ञान आहे, तो पर्यावरण जगतो, त्याला मदतीची नाही तर सन्मानाची गरज आहे. अशा कितीतरी बाबी तुम्ही सोदाहरण स्पष्ट करायचा. संपूर्ण बांबू केंद्राला २० वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही  संस्थेचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS ) कडून social audit करून घेतलं होत. काय साधलं ? काय निसटलं ? याचा लेखाजोखा मांडून पाहिलात. या केंद्रातून आजवर ६००० पेक्षा अधिक आदिवासिंनि बांबूचं शिक्षण घेतलं, १५० हुन अधिक बांबूच्या वस्तूची डिझाईन तयार झाली, या केंद्राच्या धर्तीवर देशभरात २० केंद्र स्थापन झाली, जवळपास ४५० कुटुंबाची गुजराण बांबूच्या व्यवसायावर होते,  त्या ऑडिटमधल्या या बाबी तुमचा आत्मविश्वास दुणावणाऱ्या होत्या.  ‘ग्रामग्यानपीठ’ हे तुमचं नवं स्वप्न होत ! तीन-चार वर्षांपूर्वी तेही पाहण्याचा योग आला. बांबू आणि माती यातून साकारलेला तिथला परिसर वेड लावणारा आहे. “गुरुजी (रवींद्र शर्मा) म्हणतात, भारतीय संस्कृतीचं बीज एकत्रित करायला हवी. नाहीतर पुढे काहीच गवसणार नाही. म्हणून मला इथे ग्रामीण, आदिवासी संस्कृतीचं documentation करायचं आहे. त्यांचे खेळ, त्यांचे उत्सव, रिती-भाती, गोष्टी, पीक, खान-पान सगळं document करायचं आहे. तसेच भारतातील पारंपारिक कारागीरांचं देखील !” तुम्ही भान हरखून सांगत होता. तुमच्या मनातली कल्पना साकारायला प्रचंड साधनांची आवश्यकता होती. ती जमवताना तुमची दमछाक होत होती, पण तुम्ही ठाम होता.

सुनीलजी, तुम्ही सामाजिक कामाकडे कर्तव्य भावनेतून नव्हे तर संवेदनशीलतेतून वळला होता. संवेदनक्षम वयात तुमचा विनू काळेंशी संपर्क आला. वर्ध्यातला आदिवासी मुंबईच्या पुलाखाली हलाखीचं जीवन जगतो हे तुम्ही त्यांच्यसोबत पाहिलं. त्या आदिवासीला त्याच्या गावी, त्याच्याच परिसरात मिळणारा बांबू रोजगार देऊ शकतो, हे विनू काळेंनी दाखवून दिल. आदिवासीना त्यांच्या परंपरागत ज्ञानाचा आणि बांबूचा परिचय करून देत रहाणं हे तुमचं जीवितकार्य बनलं. छोट्या तंत्रज्ञानावर आधारित समाजव्यवस्थेची मूळ तुम्ही अधिक घट्ट करू पहात होता. त्या समाजव्यवस्थेशी तुम्ही तुमची नाळ जोडलेली होती. तुमच्या विचारात आणि जीवनशैलीत त्याच प्रतिबिंब दिसायचं. तुम्ही India चे नाही तर भारताचे रहिवासी होता. म्हणूनच कि काय देशभरात कितीही आडवा-तिडवा प्रवास करून तुम्ही लवाद्याला पोहोचायचा.

जिथे तुमचा निरुपमाताई, मुग्धा यांच्यासह बांबू केंद्राचा विशाल परिवार आहे. सुनीलजी, तुम्ही दोन बाबतीत खूपच भाग्यवान ठरला. पहिली बाब म्हणजे निरुपमाताईं तुमच्या आयुष्यात आल्या. सखी, गृहिणी आणि सचिव या तीनही भूमिका त्यांनी निभावल्या. तुमच्या लौकिक संसाराची गंगाजळी भरून काढण्यास एक पाऊल लवाद्याबाहेर टाकण्यास सदैव सज्ज राहिल्या. दुसरी बाब म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कमालीचे गुरु लाभले. त्या प्रत्येकाने तुम्हाला एक स्वप्न दिले. विनू काळे यांनी बांबूचं, नानाजी देशमुखांनी शिक्षणाचं, महेश शर्मा यांनी परंपरागत कारागीरीच आणि गुरुजी (रवींद्र शर्मा) यांनी परंपरागत कारागीरांवर आधारित समाजव्यवस्थेच ! तुम्हीदेखील सर्वोत्तम शिष्य ठरलात. ते प्रत्येक स्वप्न तुम्ही जगला , ते सत्यात उतरवण्यासाठी कशाचीही तमा न बाळगता झटला, झगडला. तुमची स्वप्न आत्ता आत्ता कुठे लोकांना कळू लागली होती. मुंबई-पुण्याकडची माणसं आता लवाद्याला भेट देत होती. पर्यावरणपूरक राखीच्या माध्यमातून तुम्ही मेळघाटाशी त्यांचे बंध जुळवू पहात होता. तुम्ही रेखाटलेल्या रांगोळीत रंग भरत चालले होते.
सुनीलजीं, आता तुमचा माग काढणं शक्य नाही. आता फक्त तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत, काही उमललेली तर काही उमलण्याच्या मार्गावरची….त्या स्वप्नांच्या प्रेमात पडलेले माझ्यासारखे अनेक जण महाराष्ट्रातच काय उभ्या भारतात आहेत.

साधरणतः एखादा माणूस जातो तेव्हा त्याचे आप्तेष्ट त्याला आवडणारी गोष्ट वर्षभरासाठी वा कायमस्वरूपी सोडतात, त्याची आठवण रहावी म्हणून ! तुमच्याबाबतीत ही शक्यता नाही कारण तुम्हाला विसरणं शक्य नाही…

भावपूर्ण श्रद्धांजली !
तुमचा,
मिलिंद भणगे

Obituary of melghat bamboo hero Sunil Deshpande

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण