सोनियांसाठी “नवे डॉ. मनमोहन सिंग” बनण्याचा ममतांचा प्रयत्न…??

सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न अधिक गंभीर आहे. राहुल गांधींचे नेतृत्व सर्वसंमत होत नसल्याने ममता बॅनर्जी या सोनिया गांधी यांच्यासाठी political compromise candidate ठरू शकतात. त्यांचा मोदीविरोध पक्का आहे. शिवाय त्यांचे political track record काँग्रेस नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे नाही. ममतांची राजकीय विश्वासार्हता “खंजीरी राजकारणापेक्षा” निश्चित अधिक आहे.


पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 साल हे फार politically seriously घेतलेले दिसते आहे. 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे खऱ्या अर्थाने तगडे राजकीय आव्हान निर्माण करण्याचे त्यांच्या डोक्यात आहे. त्यादृष्टीने खरंच पूर्वतयारी म्हणून तीन वर्षे आधी त्यांची पावले गांभीर्याने पडताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय आक्रस्ताळ्या स्वभावाच्या विरोधात ही बाब आहे. परंतु त्यांनी हेतूतः आपला राजकीय आक्रस्ताळा स्वभाव बाजूला ठेवलेला दिसतो आहे. Mamata Banerjee may emerge as compromise candidate for Sonia Gandhi and Congress as there is no consensus on rahul Gandhi’s leadership

ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्याचा आणि त्यामधील भेटीगाठींचा नीट विचार केला तर ही बाब ठळकपणे लक्षात येते. No stone untouched अर्थात प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याला भेटणे अशा अर्थाची political strategy ममता बॅनर्जी यांनी अवलंबलेली दिसते. विरोधी पक्षांच्या जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या नेत्यांना त्या व्यक्तिगत जाऊन भेटत आहेत. यामध्ये त्यांचा गंभीर प्रयत्न दिसतो आहे.

विरोधी पक्षांनी एकत्र येताना काँग्रेसला बाजूला टाकण्याची काही विरोधी पक्षांची प्रवृत्ती दिसते. ही राजकीय प्रवृत्ती पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी अमलात आणली असली तरी दिल्लीत मात्र ती त्यांनी बाजूला ठेवली आहे.

दिल्लीत आजच्या भेटीत त्यांची सर्वात महत्वाची भेट सोनिया गांधी यांच्याशी ठरलेली आहे. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करताना त्या कदाचित एका विशिष्ट राजकीय फॉर्म्युल्यावर चर्चा करू शकतात, तो म्हणजे 2024 मध्ये काँग्रेससाठी आणि विशेषत: सोनिया गांधींसाठी त्या राजकीयदृष्ट्या डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या compromise candidate म्हणून पुढे येऊ शकतात. सोनिया गांधी यांच्यासाठी सुद्धा हा राजकीय सुवर्णमध्य ठरू शकतो. एक तर काँग्रेसमध्ये सध्या “डॉ. मनमोहन सिंग” बनू शकतील, असे नेतृत्व नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व भरपूर प्रयत्न करूनही सर्वसंमत ठरू शकलेले नाही. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उत्तर प्रदेशाची हद्द ओलांडू शकलेले नाही. अशा स्थितीत सोनिया गांधी यांच्यापुढे political practicality म्हणून ममता बॅनर्जी यांचे नाव डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे पुढे येऊ शकते. (इथे ममता बॅनर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्व क्षमतेच्या तुलनेचा प्रश्न नाही. फक्त political compromise candidate एवढ्यापुरताच हा संदर्भ मर्यादित आहे.)

शिवाय ममता बॅनर्जी यांचे सोनिया गांधी यांच्याशी स्पर्धा करू शकेल असे राजकीय वैर अजिबात नाही. पश्चिम बंगालमध्ये त्यांना हवे तसे स्वातंत्र्य काँग्रेसने दिले असते तर कदाचित ममता बॅनर्जी काँग्रेसच्या बाहेरही पडल्या नसत्या. शिवाय ममता बॅनर्जी यांचे political track record हे शरद पवार यांच्यासारखे राजकीय बेभरवशाचे किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे नाही.

उलट ममता बॅनर्जी राजकीय आक्रस्ताळ्या स्वभावामुळे कायम आपल्या विरोधकांवर समोरुन वार करतात. आणि त्यांच्यावर तुटून पडताना दिसतात. राजकीय यश आणि अपयश या दोनही घटनांमध्ये ममतांचा विरोधकांची समोरून सामना करण्याचा स्वभाव बदललेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांची खऱ्या अर्थाने मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नात गांभीर्य आणि सातत्य टिकून राहू शकते जे काँग्रेसला आणि सोनिया गांधींना अपेक्षित आहे.

ममतांचा मोदी विरोध हा शरद पवारांच्या मोदी विरोधासारखा तकलुपी नाही किंवा पवारांसारखे मधूनच मोदींना भेटून येण्याचे त्यांचे राजकारणही नाही. त्यामुळे सोनिया गांधी या ममतांवर राजकीयदृष्ट्या भरोसा ठेवू शकतात. जसा त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास टाकला तसा त्या ममतांवर  टाकू शकतात. ही राजकीय अपरिहार्यता आहे याची जाणीव सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांनाही असू शकते.काँग्रेसला टाळून किंवा वगळून विरोधकांचे सरकार केंद्रात येऊ शकत नाही. कारण काँग्रेस कितीही कमकुवत झाली तरी काँग्रेस खासदारांची संख्या ही इतर कोणत्याही विरोधी पक्षांपेक्षा नक्कीच जास्त राहणार आहे. हे राजकीय वास्तव ममतांना निश्चित कळते. त्यामुळे त्या सोनिया गांधी यांच्याशी राजकीय दृष्ट्या जुळवून घेऊ इच्छित असतील तर त्यात त्यांचा राजकीय शहाणपणाच ठळकपणे दिसून येतो.

ममतांचे राजकीय वैर डाव्या पक्षांची आहे. त्यांच्या नेत्यांना त्या भेटणार नाहीत. परंतु डाव्या पक्षांची सध्याची राजकीय ताकद एवढी नगण्य आहे की त्यांना ममताच काय पण बाकीचे कोणतेही विरोधी पक्ष खिजगणतीत धरत नाहीत. त्यामुळे ममता डाव्या पक्षांच्या नेत्यांना भेटणार नसतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

पण काँग्रेसचे मात्र तसे नाही. काँग्रेसच्या कमलनाथ, आनंद शर्मा यांच्यापासून ते खुद्द सोनिया गांधी यांच्यापर्यंत ममता बॅनर्जी सगळ्या नेत्यांना आस्थेने भेटत आहेत. हा त्यांच्या प्रयत्नातला गांभीर्याचा भाग आहे. 2024 अजून तीन वर्ष लांब आहे. गंगा, यमुना, सतलज, गोदावरी, नर्मदा, कावेरी या नद्यांमधून भरपूर “राजकीय पाणी” वाहून जायचे आहे. याचा अर्थ 2022 मधल्या नऊ राज्यांच्या निवडणुका पार पडायच्या आहेत.

असे असले तरी ममतांच्या राजकीय विरोधकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांचे गांभीर्य कमी होत नाही. त्या व्यवस्थित home work करून विरोधकांची मोट बांधत असतील तर त्याला “6 जनपथ” मधल्या राष्ट्र मंचाच्या बैठकीपेक्षा कितीतरी व्यापक अर्थ आहे हे मान्य केले पाहिजे.

ममतांच्या दिल्लीस्वारीच्या परिणामाविषयी त्याच विषयी आत्ताच चर्चा करण्यात मतलब नाही. कारण त्याचा परिणाम दिसणे हे 2024 मध्ये अपेक्षित आहे.

पण ममतांच्या ५ दिवसांच्या दिल्ली स्वारीने एक गोष्ट अधोरेखित केली आहे, ती म्हणजे त्या खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींसमोर राष्ट्रीय तगडा राष्ट्रीय नेता म्हणून उभे राहण्याची क्षमता राखून आहेत. आणि त्यांचे प्रयत्न देखील तितकेच गंभीर आहेत. केवळ प्रादेशिक भाषांमधील पेपरांमध्ये आपल्या पंतप्रधानपदाच्या आणि न मिळणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या बातम्या छापून आणण्याएवढे ममतांचे प्रयत्न उथळ नाहीत. हे देखील या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

Mamata Banerjee may emerge as compromise candidate for Sonia Gandhi and Congress as there is no consensus on rahul Gandhi’s leadership

महत्त्वाच्या बातम्या