“धुंद मधुमती” या स्वर्गीय स्वरांतून लतादीदी अजरामर!!; मास्टर कृष्णरावांची अनमोल आठवण


प्रिया फुलंब्रीकर


अखेर भारतवर्षातील “लतापर्व” संपले असले तरी अवकाशातील अगणित तारकांप्रमाणे लतादीदींचे स्वरचांदणे सर्वदूर पसरलेले आहे आणि दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेल्या अलौकिक स्वरांतून त्या अजरामर झालेल्या आहेत. Latadidi Ajramar from the heavenly voice “Dhund Madhumati” !!; Precious memories of Master Krishnarao

ही गोष्ट आहे अनेक वर्षांपूर्वीची जेव्हा लता मंगेशकर यांच्या गौरव ग्रंथ काढण्याचे योजिले होते तेव्हाची!! त्यावेळी मास्तर कृष्णराव यांना लतादीदींच्या गायनाबद्दल अभिप्राय देण्याची विनंती करण्यात आली आणि त्वरित मास्तरांनी एक गौरवपर परिच्छेद लिहून दिला. लतादीदी यांनी मास्तरांच्या संगीत दिगदर्शनाखाली एकाच चित्रपटासाठी गाणी गायली. ज्याची मराठी आणि हिंदी चित्रपट आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. तो चित्रपट म्हणजे माणिक चित्र संस्थेचा “कीचकवध”. हा चित्रपट पुणे येथे प्रभात स्टुडियोमध्ये चित्रित झाला. या १९५९ साली प्रकाशित झालेल्या आणि भारतात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाचे दिगदर्शक होते पुणे येथील यशवंत पेटकर. मराठी चित्रपटाचे गीतकार होते कविवर्य ग. दि. माडगूळकर तर पार्श्वगायक होते लता मंगेशकर आणि सुधीर फडके. याच्या हिंदी चित्रपट आवृत्तीचे गीतकार होते भरत व्यास तर पार्श्वगायक होते लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. म्हणजे मराठी आणि हिंदी आवृत्तीत एकच पार्श्वगायिका होती अन् ती म्हणजे लता मंगेशकर!! आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी व हिंदी अशा दोन्ही आवृत्तींमधील गीतांवर एकाच संगीतकाराने स्वरसाज चढवला होता अन् ते होते प्रतिभाशाली शास्त्रीय गायक आणि संगीतकार मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर (उर्फ मास्टर कृष्णराव)

या चित्रपटामधील सर्वच गाणी कमालीची लोकप्रिय झाली. यातील “धुंद मधुमती रात रे” या गीताने तर कहरच केला आणि कालातीत गीतांच्या पंक्तीत या गीतास अढळ स्थान मिळाले. या चित्रपटातील सर्व गीतांचे पुणे येथे ध्वनिमुद्रण करण्यात आले मात्र धुंद मधुमती या एकाच गीताचे ध्वनिमुद्रण मुंबई येथे झाले.

मास्तर कृष्णराव हे कल्पक प्रयोगशील संगीतकार असल्यामुळे त्यांची ही सर्व गुणवैशिष्ट्ये “कीचकवध” या चित्रपटाच्या संगीतात देखील दिसून येतात. उदाहरणार्थ, मास्तरांनी “धुंद मधुमती” आणि त्याची हिंदी आवृत्ती असलेल्या “आज मिलन की रात” या गाण्यांकरता चित्रपटसृष्टीत सर्वप्रथम “हवाईयन गिटार” या सुरेल कर्णमधुर अशा पाश्चात्य वाद्याचा प्रयोग केला. मास्तरांच्या संगीतातील इतर सर्वच प्रयोगांप्रमाणे हा प्रयोग देखील अतिशय प्रभावी व यशस्वी झाला. मास्तरांना गुरू मानणाऱ्या सी. रामचंद्र यांनी हवाईयन गिटार याच वाद्याचा लगेचच ‘आधा हैं चंद्रमा रात आधी’ या ‘नवरंग’ चित्रपटातील गाण्याच्या संगीतात सुंदर वापर केला आणि मग पुढे इतर संगीतकार देखील या गोड वाद्याचा त्यांच्या संगीतात वापर करू लागले.

लतादीदींनी “धुंद मधुमती” या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर “आज आपण प्रभातची आठवण करून देणारे संगीत मला दिले आणि मी ते गायले,” असे तृप्त मनाने भावपूर्ण उद्गार काढून मास्तरांच्या संगीताला दाद दिली.

लतादिदींचे निर्वाण झाले आणि या गतस्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. मनास एकच रुखरुख वाटत आहे ती म्हणजे “कीचकवध” या चित्रपटाच्या वेळी मास्तर कृष्णराव, लतादिदी आणि ग. दि. मा. या प्रतिभाशाली त्रयींचे एकत्र छायाचित्र काढले गेले होते त्याचा मात्र अजूनही तपास सुरू आहे.

Latadidi Ajramar from the heavenly voice “Dhund Madhumati” !!; Precious memories of Master Krishnarao

(लेखिका मास्टर कृष्णराव यांची नात आहेत.)

सौजन्य : फेसबुक

http://www.masterkrishnarao.com

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात