शक्ती विसरलेले हनुमान…!


रामायणात एक गोष्ट आहे. महाप्रतापी असणाऱ्या हनुमानाला लहानपणी एक शाप मिळालेला असतो. त्यामुळे तो त्याची सगळी ताकद विसरून जातो. त्याला स्वतःलाच त्याच्या शक्तीची, क्षमतांची जाणीव नसते. मग जेव्हा लंकेत जायची वेळ येते तेव्हा जांबूवंत हनुमानाला आठवण करून देतो. त्यानंतर हनुमान नुसता लंकेत उड्डाण करून जात नाही, तर लंका जाळूनही टाकतो. माझ्यामते महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे समर्थक, कार्यकर्ते, हितचिंतक हे क्षमता विसरलेल्या हनुमानासारखे आहेत. ज्यांना त्यांच्या क्षमतांची आणि वस्तुस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

स्वानंद गांगल( पत्रकार)

अरे कोण म्हणतं आपला पक्ष हरतोय? कोण म्हणतं आपण बंगाल हरलोय? कोणीही येतं, काहीही बोलतं आणि आपण विश्वास ठेऊन शांत होतो? आसाम, पुदुचेरीमधे आपण सत्ता स्थापन करतोय. तमिळनाडूमध्ये कमल हसनसारख्या सुपरस्टारला आपल्या उमेदवार वनाथी श्रीनिवासन धुळ चारतायंत, पंढरपूर, बेळगावीसारख्या पोटनिवडणूका आपण जिंकल्या आहेत आणि तरिही आपण पराभूत असल्यासारखे वावरतोय. का तर बंगाल जिंकू शकलो नाही म्हणून?

अर्थात बंगाल जिंकू शकलो नाही हे वाईट वाटणारे आहेच. पण बंगालमध्ये आपल्याकडे गमावण्यासारखं होतंच काय? जेमतेम ३ आमदार होते आज त्याचे ७७ झाले आहेत. आपली मतांची टक्केवारी ३८% आहे. हे कमी वाटतायं का? मग जरा ममता बॅनर्जींना डाव्यांना हरवायला लागलेला कालखंड बघा. २००१ मध्ये बॅनर्जी ६० जागांवर जिंकल्या होत्या पण २००६ ला त्या जागा ५०% नी कमी होऊन ३० वर आल्या होत्या. आपल्या तर ३ च्या ७७ झाल्या आहेत. प्रचंड संघर्षातून मिळवलेलं यश आहे हे, सहजासहजी नाही. कार्यकर्त्यांनी घामासोबत स्वतःच रक्त सांडलंय.

कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांवर हल्ले झाल्येत आणि तरिही ते डगमगले नाहीत, मागे हटले नाहीत. आज मिथून चक्रवर्तीसारख्या सुपरस्टारपासून ते नवनियुक्त आमदार चंदना बाऊरी ज्या एका मजूराच्या पत्नी आहेत इथपर्यंत समाजातील प्रत्येक घटक पक्षाशी जोडले गेले आहेत. हा विजय नाहीये? जय श्रीरामच्या घोषणेने भडकणारी दीदी चंडीपाठ म्हणत आणि गोत्र सांगत फिरत होती. भाजपामुळे हे करणे तिला भाग पडले. हा विजय नाहीये? ममता बॅनर्जी या आपल्या विरोधक आहेतच पण कम्युनिस्ट,काँग्रेस पक्षही आहेत. आज पश्चिम बंगालची विधानसभा कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त झाली आहे. हा विजय नाहीये? बाकी सगळं सोडा, आपण ममता बॅनर्जींना निवडणूकीत पराभूत केले आहे. ही मोठी गोष्ट नाहीये का?

आज काँग्रेस-कम्युनिस्टांना ते हरले याचे काहीच वाटत नाहीये. पण आपण सत्तेत येऊ शकलो नाही, याचा आनंद आहे. यावरून आपला दरारा काय आहे हे आपण ओळखले पाहिजे. महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढ्यात तीन पक्ष आपल्या विरोधात लढले आणि तरिही आपण त्यांना धोबीपछाड दिली. महाविकास आघाडीचे नेते पंढरपूरवर न बोलता बंगालवर खूश आहेत. पण आज हे तीन पक्ष वास्तवात कुठे आहेत याचा विचार केलाय का?

आज आपण जेवढ्या जागा बंगालमध्ये जिंकलो आहोत तेवढ्या जागा महाराष्ट्रात ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कधी जिंकल्या आहेत, ना शिवसेनेने कधी जिंकल्या आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरे असतानाही नाही. शरद पवार कधीही स्वतःचे दोन आकडी खासदार महाराष्ट्रातून निवडून नाही आणू शकले आणि यांचे कार्यकर्ते, समर्थक बंगालवरून आपल्याला बोलणार? आणि ते ऐकून आपण लगेच पराभूत मानसिकतेत जाणार? का? कशासाठी?

बरं हे काही आजचं नाहीये. हे असे नरेटीव्ह कायमच चालवले जातात. २०१७ ची गुजरात विधानसभा निवडणूक आठवत्ये का? भाजपाला एक हाती सत्ता मिळाली होती फक्त जागा कमी झाल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. यावरून राहुल गांधींच्या नैतिक विजयाचे नरेटीव्ह मांडले होतेच ना? मग त्यावेळी १९९५ पासून असलेली भाजपाची एकहाती सत्तेत, अँटी इनकम्बंसी यासारखे मुद्दे कोणी विचारात घेतले होते?

पत्रकार, विचारवंत वगरे मंडळींपासून ते इतर राजकीय नेत्यांनी तशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या, राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले होते, लेख-अग्रलेख खरडण्यात आले. २०१९ कसे भाजपाला जड जाणार वगरे गोष्टी सांगितल्या गेल्या. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकूर अशांना युवा नेते वगरे प्रोजेक्ट केले गेले. आज ते तिघे कुठे आहेत? राहुल गांधी कुठे आहेत? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागले? थोडक्यात भाजपा जिंकला काय किंवा हरला काय आपल्यला अपयशी म्हणूनच प्रोजेक्ट केले जाणार आहे.

बंगाल जिंकण्याआधी आपण २००+ जागा मिळवू हा दावा आपण केला होता. त्यासाठी प्रयत्न पण केले. एग्झिट पोल्समध्येही काहींनी आपल्याला सत्ता मिळेल हे भाकीत वर्तवले होते. पण ही सगळीच भाकीते चुकली. त्या मागची कारणे काय असतील याचा विचार नक्की करू. पण म्हणून भाजपाने निवडणूकीच्या आधी केलेले दावे चुकीचे ठरत नाहीत. आपण निवडणूक लढलो आणि निवडणूका या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात. कोणत्या राजकीय पक्षाला निवडणूकीच्या आधीच आम्ही हरणार आहोत असं म्हणताना पाहिलाय? बरं निवडणूक लढवताना भाजपा कायमच मोठं उद्दिष्ट ठेवतो आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही करतो. तसेच या निवडणुकीत केले. २००+ जागांचे उद्दिष्ट ठेवून लढलो. त्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. त्यात अपेक्षित यश आले नाही. पण प्रयत्नच न करता अपयश येण्यापेक्षा, प्रयत्न करणे केव्हाही चांगले नाही का?

बदल ही एक प्रक्रिया असते. २ चे २८२ होण्यासाठी किती वर्ष लागली? किती टप्पे होते त्या प्रवासात? बंगालमध्येही तसेच होईल. आज ३ चे ७७ झाले आहेत. पुढच्या निवडणुकीत याहून जास्त होतील. बंगालने आपल्याला डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे आपले आदर्श दिले आहेत. त्यामुळे बंगाल हा आपल्यासाठी भावनिकरित्याही जवळचा आहे. बंगालमध्ये आज हिंदूत्वाला स्थान मिळू लागले आहे. ते वाढतही आहे. एक दिवस बंगाल पूर्णपणे भगवा होईल. पण त्यासाठी रडण्याची नाही तर लढण्याची गरज आहे. आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरू झाले आहेत. कार्यालये जाळली जात आहेत.

ममतांना चितपट करणाऱ्या सुवेंदू अधिकारींवर हल्ला झालाय. ही परिस्थिती अजून चिघळू शकते. अशा परिस्थितीत आपण बंगालच्या रस्त्यावर उतरून आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत उभे राहू शकत नाही. पण किमान इथून त्यांना पाठिंबा तर देऊ शकतो ना? ते तिथे लढत असताना इथे आपण रडत बसणे कितपत योग्य आहे? तो त्यांच्या संघर्षाचा अपमान नाहीये का? तेव्हा कालच्या निकालांमध्ये आपण नेमके काय कमावले आहे हे ओळखूया. स्वतःच्या क्षमता ओळखूया. त्या कळल्या की रावणाच्या बुडाखाली आग लावून लंका बेचिराख करणे कठीण नाही.

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात