गोदामाई… नाशिकास करी सम्पन्न सर्वदा


  • नाशिक म्हणजे मंदिराचं गाव..गंगाकाठी प्रसिद्ध अशी खुप सुंदर मंदिरे आहेत…त्यात गोदावरी, सिहस्थ गंगा,कपालेश्वर,कार्तिकेय, मागेच काळाराम,सीतागुंफा.. बालाजी मंदिर,एकमुखी दत्त,दुतोंडी मारुती,साई मंदिर अनेकोनेक देवळं आहेत…सगळेच गंगेकाठी…
  • नाशिककरांचे जीवन समृद्ध करणाऱ्या, सखी झालेल्या, आई बनलेल्या गोदामाईचा- गंगेचा नितांतसुंदर वर्णन करणारा हा ललित लेख….

    Article river Godavari in Nashi


नाशिक खरंतर नऊ टेकड्यांवर वसलेलं शहर.. म्हणून तर त्याला नवशिखा नाशिक म्हणतात..या शहराचे मंदिर आणि गंगा गोदावरी नदी ही ओळख..या गोदावरी काठी माझं लहानपण गेलं. मधल्याहोळीत आमचं घर आजही आहे..या नवं टेकडयांपैकी एक..इथुन गंगेकडे जायला एक तीव्र उतार आहे..लहानपणी आम्ही मैत्रिणी थेट धावत गंगा गाठायचो..प्रसिद्ध आणि गणेशपुराणात असलेलं मोदकेश्वर मंदिर इथेच आहे..त्या उतारावरच्या आठवणी आजही मनी साठवून आहे मी..

उतारावरून खाली जाताना खैरे यांचा म्हशींचा मोठ्ठा गोठा लागायचा..रोजची ओळख असल्याने त्या दुधाच्या धारा काढताना बघणे ही एक गममतच होती..ते पांढरे शुभ्र फेसाळलेले दूध चविष्ट असायचे..तिथे दुध घेण्यासाठी खूप गर्दी असायची..मग गणपतीचा पिंपळपार लागायचा,त्या लोभस गणपती मागे वडाचे आणि पिंपळाचे झाड आहे,घरातील सर्व स्त्रिया तिथे वटपौर्णिमेसाठी पुजेला जात असत…आणि समोरच झुळझुळ वाहणारी गोदावरी..बऱ्यापैकी विस्तीर्ण पात्र..एका मागे एक अशी कुंड हे गंगेच वैशिष्ट्य… खरंतर तीच नाव गोदावरी पण आम्ही नाशिककर तिला गंगाच म्हणतो.. गंगेवर जायचं..गंगेवर बसायचं..गंगेवर स्नानाला जायचं इतकं सहजतेनं  बोललं जातं..इथं गंगा प्रत्येक घरातली आहे..आपलीशी आहे…गौरीपटांगण कुंडात आम्ही मैत्रिणी गम्मत म्हणुन कपडे धुवायला जात असु… इथं समोर रसाची गुऱ्हाळ होती…गोड गोड रस मिळायचा तिथे…जवा नवीन पोपट हा लागला मीठु.मिथु बोलायला हे गाणं मोठ्या आवाजात वाजत असायचं…बरेचसे धोबी लोक कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी या कुंडावर येत असत..रिक्षा धुणारे, गाड्या,सायकली धुणारे असे बरेच लोक आपापली कामे गंगेवर करत  असतात..तरी ही गंगामाई सगळ्यांना आपलंसं करते…गौरी पटांगणावर गौऱ्या विकायला अजूनही येतात…काठावर आठवडे बाजार भरतो…दररोज सकाळी नऊ आणि दुपारी 3 वाजता नाशिकरोड ला जाणारी एक एसटी प्रवासी वाहतुक तेव्हा करत असे…आमचं घर खुप उंचावर असल्याने हे सगळं चित्र खिडकीतून दिसे…त्यामुळे तासनतास मी या खिडकीत बसत असे…

गाडगे महाराज पुल ओलांडला की खंडोबा कुंड लागते..खंडोबा यात्रा आणि रामरथा,गरुड रथ हा नाशिकच्या आकर्षणाचा विषय आहे..बोहाडी नृत्य आणि सोंग घेतलेले विर हे यात्रेचे विशेष वैशिष्ट्य..हे फक्त नाशिकला मी बघितलंय…खूप मज्जा असते गंगेवर या दिवशी…खंडोबा कुंडावर काही बायका, माणसे सराफ बाजारातील सोनाराच्या दुकानासमोरची माती ब्रश ने गोळा करून ती पाटीत घेऊन गंगेच्या स्वच्छ पाण्यात खालीवर करून काही सोन्याचे कण मिळताहेत का हे शोधत बसायचे दिवसभर.. कधी यश मिळे तर कधी दिवस दिवस काहीही निघत नसे..ही चिकाटी देखील बघण्यासारखी असे…इथं काही भेळची गाडे असत..चविष्ट भेळ,पाणीपुरी,आईस्क्रीम खायला नाशिककर संध्याकाळी आपोआपच येत…

पुढे रामसेतू पुलाखाली प्रसिद्ध नारोशंकर मंदिर लागते..नाशिकमधील हे मंदिर तर माझं सगळ्यात आवडत मंदिर आहे..इथं एक मोटठी घंटा आहे…या घंटेला पुराचं पाणी लागलं की तो महापूर आला अस समजायचं.…पूर्वी दोन घंटा होत्या पण इंग्रज एक घंटा घेऊन पळून गेले, एक मात्र त्यांना नेता आली नाही असं जुनी लोक सांगतात… या शिवाच्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे..असीम शांतता..धीरगंभीर आवाजात ऐकू येणारे मंत्रोच्चार मन प्रसन्न करतात..वेगळ्याच विश्वात आपल्याला घेऊन जातात…एका बाजूने भाजी बाजार आणि एका बाजूने घाट ,मधुन गंगामाई वाहाते… अस मोहक दृष्य …

गोराराम हा ही काळाराम मंदिरा इतकंच प्रसिद्ध… काही पायऱ्या चढून गेल्यावर सुहास्य वदन श्रीरामाचे दर्शन होते…या पायर्या वरून सगळा गंगाघाट नजरेच्या टप्प्यात येतो…खाली प्रसन्न निलकंठेश्वाराच छोटस सुरेख देऊळ..पुढे गंगामाई आपल्याच नादात वाहतेय… या निलकंठेश्वराची मला फार फार आठवण येते… माझ्या लहानपणी आई नित्यनियमाने गंगेवर स्नानासाठी जात असे..इतर लोक पवित्र रामकुंडावर जात असत पण ही गर्दी टाळण्यासाठी आई मात्र निलकंठेश्वराजवळ स्नान करत असे…मी पण हट्ट करून गायीमागे वासरू जाते तसे तिच्या मागे मागे गंगास्नानास पहाटे जात असे..ओलेत्या वस्त्राने हरहर गंगे, ओं नमः शिवाय असे म्हणत गंगेचे लोटाभर पाणी शिवपिंडीस वाहून बेलपत्र,पारिजातकाची नाजुक फुले वाही..आणि शिवमहिमन स्तोत्र म्हणे…ते खुप सुंदर, पवित्र अस वाटे…पहाटेची शांतता.. गंगेच्या पाण्याचा खळखळ आवाज…चमचमत पाणी..उदबत्ती आणि फुलांचा संमिश्र मोहक वास..दुरवरच्या मंदिरातून येणारे घंटेचे मंजुळ आवाज…पाठमोरी भक्तिरसात न्हायलेली माझी आई!!भुरळ पाडणारे आणि स्वप्नवत असं ते वातावरण!! हे अगदी अगदी कधीच न विसरता येणारे!!

आईचं हे सगळं आवरेपर्यंत मी गंगेच्या पाण्यात मनसोक्त डुंबून घेत असे..पाण्यात थप थप हात मारून उगाच आपल्याला पोहता येते का हे तपासत असे…कित्तीतरी वेळ या गोदामाईकडे बघत बसे मंत्रमुग्ध होऊन!! गंगामाई मैत्रीण झाली होती जणु…

गोदाकाठी असलेल्या यशवंतराव पटांगणात दर उन्हाळ्यात सायंकाळी वसंत व्याखानमाला असते…नाशिकच्या त्यावेळच्या पिढीच्या जडणघडणीत या दिगगजांच्या व्यखानांचा मोठा वाटा असेल..मला आठवतंय तेव्हा गोट्या नावाची मालिका टीव्ही वर लागायची,ती खुप प्रसिद्ध झाली होती, त्यातील कलाकार गोट्या आणि सुमी आले होते..त्याना बघायला अख्ख नाशिक लोटलं होत… मंचावर कोणी गायिकेनं बीज अंकुरे अंकुरे,ओल्या मातीच्या कुशीत…जसे रुजावे बियाणे माळरानी खडकात…ही कविता म्हंटली होती..टाळ्यांचा कडकडाट अजुन आठवतोय मला संध्याकाळी रामकुंडावर गंगेची आरती करून  द्रोणात, फुले,दिवा पाण्यात सोडताना खुष व्हायचे…तो दिवा कुठवर जातो त्यावर लक्ष ठेवायचे.. संथ वाहणाऱ्या चांदीच्या पाण्यात आकाशाचे निळसर प्रतिबिंब …त्यावर नाजुक फुलांची नक्षी…घाटावरील पिवळसर लाईट च्या दिव्यांचे प्रतिबिंब… वहात जाणारे ,छोट्या छोट्या दिव्यांचे मिणमिणते चैतन्य बघणे हा अप्रतिम सोहळा जणु!!
आकाशातील पिठूर चांदणं जणू त्या पाण्यात अवतरलय    हा भास!!

गंगाकाठी…रामकुंडावर दोन मकाजी आणि कोंडाजी चिवड्याची दुकानं आहेत…तिथे मस्त ओली भेळ बनवुन मिळते…सहकुटुंब एकत्र बसून संध्याकाळी ती खाणं हा नाशिकच्या लोकांचा आवडता उद्योग आहे…पार्टी असते ती …अश्या कित्येक पार्ट्या आम्ही केल्यात…कुटुंबासोबत…मित्र मैत्रिणींसोबत…भेळ खाता खाता गंगेच्या वाहत्या पाण्यात पाय सोडून आम्ही बसायचो…तो आनन्द कशातच नाही…खुप छोटा  आनंद ..पण निरागसपणे जगलेय ते दिवस या गंगेकाठी!! संध्याकाळी गंगेवर फिरून येताना थंड हवेची मजा घेत पांडे मिठाई कडे जाऊन गरमागरम उकळते ,भरपुर साय असलेले दुध… काचेचा ग्लासभर दुध पिणे म्हणजे  आहाहा!!मज्जाच मज्जा!! घर गंगेकाठी असल्याने कधी उगाचच कुणी कधी उशीर का झाला म्हणुन रागवायचे नाहीत… उलट कुटुंबातील कोणीं न कोणी सोबत असायचेच…नाशिक म्हणजे मंदिराचं गाव..गंगाकाठी प्रसिद्ध अशी खुप सुंदर मंदिरे आहेत…त्यात गोदावरी, सिहस्थ गंगा,कपालेश्वर,कार्तिकेय, मागेच काळाराम,सीतागुंफा.. बालाजी मंदिर,एकमुखी दत्त,दुतोंडी मारुती,साई मंदिर अनेकोनेक देवळं आहेत…सगळेच गंगेकाठी…

Article river Godavari in Nashik

या गंगामाईने जीवन समृद्ध केलंय… ती सखी झाली…आई झाली..तिच्याच अंगाखांद्यावर लहानाचे मोठे झालोय!! जीवनातील अविभाज्य भाग आहे ही गंगा!!
गंगेबद्दल कितीही लिहिले तरी हात थांबणार नाहीत …खरंच! काही ओळी सुचताहेत त्या लिहिते…

अवखळ अल्लड ही गोदा

धिरा! वृद्धा !! उपनाम गंगा

मस्तकावरी शिवाच्या ही अभंगा

अवतरली गौतमाच्या संकटा

म्हणती तिजला गौतमी गंगा

पापहरिणी मोक्षदायिनी माता अंबा

शिरी शिवाच्या जटेत असे हरिप्रिया

पवित्र ब्रम्हगीरीहूनी कोसळे रौद्ररूपा 

कुशवर्ती शांत होई स्थिर मंगला

हे सुखदा!वरदायिनी निसर्ग सौंदर्या 

हे चंचला!मनविभोर संपदा

नाशिकास करी सम्पन्न सर्वदा

जीवितास नेई मोक्ष ठिकाणा

अखंडित वाहे झुळझुळ मधुरा

ठेवी हृदयाशी लेकरांस सर्वथा

शांतवत चाले तृष्णा जनिता

वंदिता तुजला माय म्हणुनी

हे मोक्षदा!तपस्येस येई अर्थ खरा

ही भुमी पावन गंगोदकाने

हे सिंहस्था!! गोदावरी!! हे गंगे!!

त्रिवार वंदन तुज सुहीता सरिता

नमन तुज,स्मरण तुझे वरदा

घडु दे नेत्र माझे मिटता….

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती