भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?


“तुमच्या बागेतला आंबा खाऊन मुलगा होतो? अहो गुरूजी, असं काही असतं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक निपुत्रिक दिग्गजांनी तुमची आमराई कधीच मुळासकट पळवली असती. तुम्ही अंधश्रद्धांना अशा पद्धतीनं खतपाणी घालत असाल तर तुम्ही ज्या हेतूनं संघटना चालवताय ती पुढं कशी जायची? तुमचा बचाव करणार्‍या तुमच्या कार्यकर्त्यांचीही आता गैरसोय होतेय. तुमच्या वादग्रस्त विधानामुळं ते तोंडघशी पडत आहेत…”  ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्या वादग्रस्त भूमिकांचे वाभाडे काढणारा हा जळजळीत लेख…Article on controversial stands and statements of Sambhaji Bhide guruji


‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा कोणताही आजार नसून जो या रोगानं मरतो तो गांडू अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी सातत्यानं केली. हे सगळं पाहता वाटतं की, गुरूजींनी आता तोंडावर आवर घालायला हवा.

‘मनोहर’ नावाच्या या माणसानं जर ‘संभाजी’ हे नाव धारण केलं असेल तर छत्रपती संभाजीराजांचे काही गुण तरी त्यांच्या अंगात असायला हवेत. निर्धार म्हणजे काय, पराक्रम म्हणजे काय यासह संभाजीराजांचे सद्गुण त्यांना कळायला हवेत. संभाजीराजांचं नाव वापरायचं तर तसं वागलं पाहिजे. नाही तर मग मनोहर हे नाव ठीकच होतं. नाही मनोहर तरी, आहे मनोहर तरी, गेला मनोहर तरी, चुकला मनोहर तरी हे असं चालू शकतं. छत्रपती संभाजीराजांचं नाव घ्यायचं तर त्यांच्या किमान एखाद्या गुणाच्या पदचिन्हावर चालण्याची मनोवृत्ती असायला हवी. जर तुम्ही केमिस्ट्रीचे गोल्ड मेडिलिस्ट असाल तर विज्ञानाचा आणि तुमचा काय संबंध? असा प्रश्न आम्हाला पडण्याइतपत तुमची घसरण का झाली?

पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सर्वपक्षिय नेत्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला जी ताकद दिली गेली, जे बळ दिलं गेलं ते केवळ संभाजी ब्रिगेडची दहशत कमी करण्यासाठी दिलं गेलं हे अनेकदा सांगितलं जातं. यामध्ये निश्चितच तथ्य आहे आणि हे कुणीही विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तरूणांना असणार्‍या आकर्षणातून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना उभी केली गेली. ही संघटना काही वेगळं निर्माण करेल असं वाटत होतं. संभाजी ब्रिगेडनं छत्रपती संभाजीराजांचं नाव घेत विध्वंसाचं, द्वेषमूलक राजकारण केलं. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात त्याप्रमाणे ‘‘कोणतीही क्रांती ही मत्सरप्रेरित, स्पर्धात्मक वा द्वेषमूलक नको.’’ ब्रिगेडचा तर पायाच हा होता. एकीकडं संभाजीराजांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं ब्राह्मणांना ठोकायचं, त्यांच्या स्त्रियांविषयी वाटेल तसं विष पेरायचं यामुळं ब्रिगेडला बाकी सोडा पण मराठा समाजातूनही पाठिंबा मिळू शकला नाही. संभाजी ब्रिगेडची अशी दहशत अनुभवत असतानाच संभाजी भिडे नावाचा एक माणूस पुढं येतो आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून तरूणांना बळ देतो हे सकारात्मक चित्र होतं. मात्र ब्रिगेडप्रमाणेच तुमच्याही अनेक भूमिका द्वेषमूलक आणि कट्टरतावादी दिसल्या. कोणताही कट्टरतावाद हा समाजासाठी घातकच असतो. त्यामुळं जी वाताहत ब्रिगेडची झाली तशीच केविलवाणी अवस्था तुमचीही झाली. दुर्दैवानं ब्रिगेडच्या मागं असणारे असतील किंवा तुमच्या सोबत असणारे कार्यकर्ते असतील त्यांची मात्र पुरती ससेहोलपट आणि यथेच्छ फरफट झाली. ‘कट्टर’ कार्यकर्ते तयार करण्याऐजवी ‘निष्ठावान’ अनुयायी मिळवले असते तर आजच्या महाराष्ट्राचं चित्र वेगळंच असतं.

तुम्ही वेगवेगळ्या गडावरच्या दुर्गयात्रा काढल्या. व्यसनमुक्त नवीन पिढी घडविण्यासाठी तुमच्याकडून काही चांगले प्रयत्न केले गेले पण त्याचा वापर जर तुम्ही अशाप्रकारे राजकारणासाठी करत असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कळाले नाहीत असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल.

आजवरच्या तुमच्या अनेक भूमिका हास्यास्पद आणि विकृत वाटाव्यात अशाच आहेत. तुमच्या बागेतला आंबा खाऊन मुलगा होतो? अहो गुरूजी, असं काही असतं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक निपुत्रिक दिग्गजांनी तुमची आमराई कधीच मुळासकट पळवली असती. तुम्ही अंधश्रद्धांना अशा पद्धतीनं खतपाणी घालत असाल तर तुम्ही ज्या हेतूनं संघटना चालवताय ती पुढं कशी जायची? तुमचा बचाव करणार्‍या तुमच्या कार्यकर्त्यांचीही आता गैरसोय होतेय. तुमच्या वादग्रस्त विधानामुळं ते तोंडघशी पडत आहेत. परवाच कुपवाडच्या एका धारकर्‍याचा एक फोन व्हायरल झाला. त्यात गेल्या वीस वर्षांपासून तुमचा धारकरी असलेला तो कार्यकर्ता तुमच्या एका अध्यक्षाला विचारतोय की ‘‘माझे काका कोरोनानं गेले तर ते गांडू होते का? त्यांची जगण्याची लायकी नव्हती का? इतकी वर्षे तुमच्या विचारावर ठाम राहत काम करतोय पण आज मला घरातून बाहेर पडणं अवघड झालंय.’’ त्यावर तुमचे अध्यक्ष सांगताहेत की, ‘‘वयानुसार असं होतं, ते चुकीचं बरळले, त्यांचं चुकलं, घ्या सांभाळून!’’

अमेरिकेनं एकादशीला सोडलेलं चांद्रयान वरती गेलं? कारण त्यादिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते? अरे तुम्ही बोलताय काय? छत्रपती शिवाजी महाराजांनीही अशा भंकस गोष्टीवर कधी विश्वास ठेवला नाही. किंबहुना त्यांनी सर्व लढाया अमावस्येला लढल्या. ते एकादशीची वाट बघत बसले नाहीत. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला भेटले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. स्वतःच्याच लाल महालावर शिवाजी महाराजांनी जो छापा मारला तो 5 एप्रिल 1664 ला मारला. ज्या दिवशी छापा मारला तो तर रमजानचा महिना होता आणि तेव्हा मुस्लिम समाजाचे रोजे सुरू होते. महाराज एकादशीची वाट बघत बसले असते तर भिडे गुरूजी आज दिसले नसते आणि त्यांना ‘संभाजी’ हे नावही धारण करता आलं नसतं. ज्या महापुरूषांची नावं घेऊन पुढं चालण्याचा प्रयत्न करताय त्यांची थोडी तरी बूज राखा.

तुम्हाला शिवसेनेच्या दारातून म्हणजे ‘मातोश्री’वरून भेट न देताच हाकलून लावलं. तुमचा तो अवमान बघून आम्हालाही वाईट वाटलं होतं; मात्र तुमच्या सततच्या भूमिका बघता तेच बरोबर होते असं वाटायला लागलंय. तुम्हाला गुरूजी म्हणत गावागावात तुमच्या मागं लोक आले. तुमच्या साधेपणावर ते भाळले. छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासह तुम्ही तयार करणार आहात म्हणून तुमच्या सोबत आले. अरबी समुद्रातल्या महाराजांच्या सगळ्यात मोठ्या स्मारकाला मात्र तुमचा विरोध आहे. तरीही शिवप्रेमींनी तुम्हाला सिंहासनासाठी पैसे दिले. तुमचा विरोध वैचारिक पातळीवर आहे का? महाराजांचं स्मारक करण्यापेक्षा घराघरात महाराज पोहोचायला हवेत असं तुम्हाला वाटतं का? तसं तुम्हाला काही वाटत नाही! तुमचं म्हणणं इतकंच की महाराजांचं सोन्याचं सिंहासन करायचं आणि त्यासाठी मीच पैसे गोळा करणार! ज्या राजानं हिंदुंचं आरमार तयार केलं त्याच्या समुद्रातील स्मारकाला तुमचा विरोध का? कुणी काही चांगली गोष्ट केली की तुम्ही त्याला विरोध केलाच म्हणून समजा.

गुरूजी, नवीन पिढी विज्ञाननिष्ठ बनू द्या. तुमच्या भल्या मोठ्या मिशा तुमचं संरक्षण करत असतील पण इतरांना मास्क घालण्यापासून रोखू नका. सामान्य माणसाला ही अशी आजारपणं परवडणारी नाहीत. कोरोना जर फक्त गांडू लोकांनाच होत असेल तर मोहनजी भागवत, भैय्याजी जोशी, अमित शहा, राज्यपाल कोश्यारी या सर्वांना काय म्हणाल? अमित शहा यांना तर दोन वेळा कोरोना झाला होता. मग तुमच्या भाषेत ते ‘डबल गांडू’ ठरतात का? सुधाकरपंत परिचारिक यांच्यापासून ते रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न लेखकांपर्यंत अनेकजण कोरोनाचे बळी ठरले. त्या दुःखातून मराठी माणूस सावरलेला नसताना तुमचं हे विधान तुम्हाला स्वतःला तरी पटतं का?

तुम्ही गुरूजी असूनही तुमची भाषा नेहमी अशी शिवराळ का बरं असते? किमान सभ्यता आणि सुसंस्कृतपणाही अंगी नसावा? अशी भाषा वापरायचा अधिकार महाराष्ट्रात राज ठाकरे, अजित पवार अशा मोजक्याच लोकांना आहे. तुम्हाला ती शोभत नाही. शिवभक्ताची भाषा कशी असावी? महाराजांच्या आयुष्यातून तुम्ही नेमकं काय शिकलात? तुमचे कार्यकर्ते काय कौतुक करतात? तर ‘‘व्याख्यानाच्या वेळी गुरूजी दीड तास एकाच ‘पोझिशन’मध्ये होते… ते हलले सुद्धा नाहीत… बोलायला बसल्यावर ते जसे बसले होते तसेच एक हात गुडघ्यावर आणि एक हात माईकवर ठेऊन होते…’’

अरे हा काही कौतुकाचा विषय नाही! तुम्ही गदागदा हललात तरी चालेल. त्यानं काही फरक पडत नाही! पण असं काहीही बोलून लोकांना त्रास देऊ नका. तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः धुता याचंही कौतुक तुमचे शिष्य करत असतात. त्यासाठी तुम्ही एखादी बाई कामाला ठेवली तरी चालेल पण समाजात जातिद्वेष, धर्मद्वेष निर्माण करू नका. दंगली निर्माण होतील असं वागू नका. तुमच्या वागण्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना छोटं करू नका. तुमचं कौतुक करताना त्यांना कमीपणा येईल असं कोणीही वागू, बोलू नये याचं तरी भान ठेवा.

गावातली दारू-मटका विकणारी, छोटी-मोठी कामं करणारी, कामाच्या शोधात असणारी, वडाप वाहतूक करणारी पोरं तुमच्या पाठिशी उभी राहिली. त्यांचं आयुष्य काय बदललं? थोडक्यात काय तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षात ज्यांना फारसा थारा मिळत नव्हता त्यांना तुम्ही मोठं व्यासपीठ दिलं. साळी, कोळी किंवा इतर बारा बलुतेदारांच्या पोरांना कुठंच स्थान मिळत नाही. त्या तरूणांना तुम्ही प्राधान्य दिलं. त्यांचं अस्तित्व निर्माण करून दिलं. तुमचं बघून पोरं सायकल वापरू लागली, साधे कपडे घालू लागली, काहींनी मिशा वाढवल्या. आता हीच तरूण मंडळी तुमचं बघून, तसंच अनुकरण करायचं म्हणून अशीच भाषा बोलतील. त्यांच्या तोंडात ओव्याऐवजी शिव्या असतील! तुम्ही जर म्हणता ‘जो जितका जास्त शिकला तो तितका मोठा गांडू…’ तर गुरूजी यातल्या किती तरूणांनी तुमची शिकवण ऐकत त्यांचं शिक्षण सोडलं? तुम्ही विज्ञान शाखेचे पदवीधर आहात हे ते सगळीकडं अभिमानानं का सांगतात? त्यांना तुम्हाला ‘सुपर गांडू’ म्हणायचं असतं का? तुमच्यामुळं जर त्यांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडलं असेल तर त्याला नेमकं जबाबदार कोण? मग काय कळले तुम्हाला महाराज? महाराजांचे गडकिल्ले अशासाठी पहायचे की त्यातून महाराजांचा पराक्रम शोधावा आणि नव्या पिढीनं प्रेरणा घेऊन नवा इतिहास निर्माण करावा. एका पिढीनं तुम्हाला त्यांचा गुरू मानलं असताना असा विश्वास तुम्ही त्यांच्या मनात निर्माण केला का?

पंढरीच्या वारीत वारकरी म्हणून सहभागी व्हायचं असेल तर वारकरी म्हणून या ना! तुम्हाला कोणी अडवलंय? गळ्यात तुळशीची माळ घालून भक्तिमार्गानं तुम्ही जरूर या!! हजारो पिढ्या पंढरीच्या वारीत भाविक सहभागी होतात. तुम्ही तिथं तलवार घेऊन येताय? इथं कसला शक्ती-भक्तीचा संगम आलाय? तलवार घेऊन जायचं तर सीमेवर जा ना! जो एकाचवेळी अनेक शस्त्र चालवू शकतो तो धारकरी! मग वारकरी आणि धारकरी हे कसलं समीकरण मांडताय? धारकर्‍यांनी सीमेवर जाऊन त्यांचा पराक्रम सिद्ध करावा. सियाचीन भागातल्या चिनी घुसखोरांना बाहेर काढणं तुमचे पट्टशिष्य असलेल्या मोदींना जमत नाहीये. तिकडं जाऊन त्यांना काही मदत करा. संभाजीराजांच्या काळात वारकर्‍यांना संरक्षण देण्यात आलं हे खरंय पण आता त्याची गरज आहे का? आणि तुम्ही स्वतःची तुलना संभाजीराजांसोबत करता का? भक्तीचा संगम पांडुरंगाच्या दारात असताना तिथं तलवार कशाला?

जागतिक महामारीच्या काळात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम कोणीही करू नये. संभाजीराजांच्या मृत्युच्या आधी तुम्ही बलिदान सप्ताह साजरा करता आणि महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढता? मृत्युच्या छाताडावर थयथया नाचून जगाच्या इतिहासात अजरामर झालेले छत्रपती संभाजीमहाराज येशू ख्रिस्तापेक्षा महान आहेत. या धर्मयोध्याची कसली अंत्ययात्रा काढता? मृत्युशी झुंज देत मृत्युलाही पराभूत करणारा जगाच्या इतिहासातील हा अद्वितीय योद्धा आहे. त्यांचं चरित्र समजून घ्यायचं असेल तर त्यांची अंत्ययात्रा काढण्याऐवजी महिनाभर त्यांच्या चरित्राचं पारायण करा. एकाचवेळी हा योद्धा अनेकांशी लढत होता. हे त्यांचं अलौकिक वेगळेपण होतं. ते पुढं यायला हवं.

महाराष्ट्रात कोरोनाच्या लसी कमी पडत असूनही महाविकास आघाडीची नेतेमंडळी तितक्या आक्रमतेनं लढताना दिसत नाहीत. लसींचा तुडवडा असताना त्यावरून वातावरण तापण्यापूर्वी लक्ष वेधून घ्यायचं म्हणून संभाजी भिडे गुरूजींना हे विधान करायला लावलं की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य माणसाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तुमच्या बोलण्यामागं असू शकतो. या वयात तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून ‘एजंटगिरी’ करताय की वयानुसार तुम्ही ‘भ्रमिष्ट’ झालाय हे कळायला मार्ग नाही. स्वतःच थोडंफार केलेलं काम स्वतःच्याच हातानं पुसून टाकण्याचा विक्रम मात्र तुम्ही करत आहात. एक शिवप्रेमी म्हणून आमच्यासाठीही हे सगळं तटस्थपणे पाहणं वेदनादायी आहे.

Article on controversial stands and statements of Sambhaji Bhide guruji

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात