खुर्ची सोडतानाही उद्धव ठाकरेंची मग्रुरी!


 

‘मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे.’ या वाक्यातील ‘त्याग करीत आहे’ हा शब्दप्रयोग उद्धव ठाकरे यांची मग्रुरी दर्शविणारा आहे. कारण माणसाने जे त्याच्या हक्काचे असते ते स्वत:हून सोडून देण्यास ‘त्याग करणे’ असे म्हणतात. यात ‘हक्काचे असणे’ आणि ‘स्वत:हून सोडून देणे’ हे दोन पैलू आहेत. ५५ पैकी तब्बल ३९ आमदारांनी साथ सोडल्यावर ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदावर कोणताही हक्क राहिलेला नव्हता. शिवाय त्यांनी ते पद स्वत:हून नव्हे तर नाईलाजाने भाग पडले म्हणून सोडले… Arrogance of Uddhav Thackeray


उरल्या-सुरल्या तथाकथित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत सोडावे लागले. मात्र ही खुर्ची सोडतानाही उद्धव ठाकरे यांची भाषा मग्रुरीचीच होती. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी जाण्यापूर्वी राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून थेट संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे.’ त्यांच्या या वाक्यातील ‘त्याग करीत आहे’ हा शब्दप्रयोग त्यांची मग्रुरी दर्शविणारा होता. कारण माणसाने जे त्याच्या हक्काचे असते ते स्वत:हून सोडून देण्यास मराठीत ‘त्याग करणे’ असे म्हणतात. यात ‘हक्काचे असणे’ आणि ‘स्वत:हून सोडून देणे’ हे दोन पैलू आहेत. पक्षाच्या ५५ पैकी तब्बल ३९ आमदारांनी साथ सोडल्यावर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदावर कोणताही हक्क राहिलेला नव्हता. शिवाय त्यांनी ते पद स्वत:हून नव्हे तर नाईलाजाने भाग पडले म्हणून सोडले. असे असूनही आणि या दोन्ही गोष्टींची स्वत:ला पूर्ण जाणीव असूनही उद्धव ठाकरे यांनी ‘त्याग करणे’ हा केलेला शब्दप्रयोग त्यांची मग्रुरी दाखवितो, असेच म्हणावे लागेल.

‘शिवसेना ठाकरे कुटुंबापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’, हे उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्यही त्यांची एकाधिकारशाही वृत्ती व आपल्या लायकीबद्दल त्यांनी करून घेतलेला वृथा गैरसमज दाखविते. दिवंगत बाळ ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली व त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शिवसैनिकांनी राबून शिवसेना मोठी केली, ही न नाकारता येणारी ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. तरीही शिवसेना पक्ष ही ठाकरे कुटुंबाची वडिलोपार्जित मिळकत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. स्वत: बाळ ठाकरे यांनीही शिवसेनेकडे याच खासगी व कौटुंबिक मिळकतीच्या दृष्टीने पाहिले. परंतु त्यांच्याकडे नेतृत्वगुण आणि धमक होती. त्यामुळे बाळ ठाकरे यांची ही आत्मकेंद्रित व स्वार्थी मनोवृत्ती पक्षाला मारक ठरली नाही. किंबहुना ठाकरे यांचा हा दुर्गुणही पक्षाच्या दृष्टीने इष्टापत्ती ठरला, असेही म्हणता येईल. परंतु दिवंगत पित्याच्या स्मृतीची जपमाळ कितीही ओढली तरी आपली त्यांच्याशी बरोबरी होऊ शकत नाही, या वास्तवाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांनी स्वत:चे हंसे मात्र करून घेतले.

उद्धव ठाकरे यांच्या नाटकी निवेदनातील आणखी काही वाक्ये पाहा.‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणेन’, असे वचन आपण आपल्या वडिलांना त्यांच्या मृत्यूसमयी दिले होते.‘ ‘माझी इच्छा नव्हती, परंतु शरद पवार साहेबांनी भरीला पाडले म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारले’ आणि ‘ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला व तुम्हाला (म्हणजे बंडखोरांना) मोठे केले त्यांच्या मुलाला खुर्चीवरून खाली खेचणे हे जर कोणला पुण्य वाटत असेल तर त्यांना ते अवश्य पदरी पाडून घेऊ द्या.’ यातही लटक्या अनिच्छेतही मुख्यमंत्रीपद स्वीकारताना ‘बाळासाहेबांचा चिरंजीव’ हिच आपली एकमेव पात्रता होती, हेच उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले, असे म्हणावे लागेल.

शिवसेना आज ५६ वर्षांची आहे. बाळ ठाकरे यांचे निधन १० वर्षांपूर्वी झाले. म्हणजे ५६ पैकी ४६ वर्षे शिवसेनेची धुरा बाळ ठाकरे यांनी स्वत: सांभाळली. उद्धव ठाकरे आज ६० वर्षांचे आहेत. म्हणजे शिवसेना स्थापनेच्या वेळी ते चार वर्षांचे होते. त्यांना तरुण व ‘सज्ञान’ व्हायला आणखी १४ ते १६ वर्षे लागली असे गृहित धरले तरी आपले वडील हयात असतानाच्या आपल्या तरुणपणातील किमान ३० वर्षांत आपण शिवसेनेसाठी काय केले? उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला विचारल्यास त्याचे प्रामाणिक उत्तर ‘फारसे काही नाही’, असेच येईल. असे असूनही बाळ ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उद्धव यांना नेमले. त्यामुळे वडिलांनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुखपद आपल्याकडे येण्यात आपल्या स्वत:च्या कतृत्वाचा भाग अगदीच नगण्य आहे व रक्ताचे नाते एवढ्या एकट्याच निकषावर वडिलांनी आनायासपणे दिलेल्या वारशाचा भागच त्यात सर्वाधिक आहे, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना नक्कीच असणार. बंडखोर ‘बाळासाहेबांच्या मुलाला खुर्चीवरून खाली खेचण्याचे पुण्य करीत आहेत’, या उपरोधिक विधानातून उद्धव यांच्या मनातील ही अव्यक्त जाणीवच स्पष्ट होते.
‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणेन’, असे वडिलांना मरणापूर्वी वचन दिले होते, या उद्धव ठाकरे यांच्या दाव्याचा खरेपणा तपासण्याचा काही मार्ग नाही. राज्यातील ज्या जनतेला व खास करून शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी हे विधान केले त्यांच्यापैकी कोणीही बाळ ठाकरे मृत्यूशैयेवर असताना तेथे जवळपास नव्हते. तरही उद्धव यांचे हे म्हणणे खरे मानले तरी ‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणीन’ याचा अर्थ ‘संधी मिळताच मीच मुख्यमंत्री होईन’ असा दुरान्वयानेही होऊ शकत नाही. याच्या जोडीला ‘मला मोह अथवा इच्छा नव्हती पण शरद पवार साहोबांनी भरीला पाडले म्हणून मी मुख्यमंत्रीपद स्वीकारले’ हे उद्धव यांचे दुसरे विधान पाहिले तर ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याच्या’ बाळ ठाकरे यांना दिलेल्या कथित वचनाची पूर्ती त्यांच्या मुलाने नव्हे तर शरद पवार यांनी केली असेच म्हणवे लागेल.
‘आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी, आदित्य व सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे फक्त चार मंत्री हजर होते. (शिवसेनेचे) बाकीचे मंत्री कुठे गेले हे तुम्हा जाणताच’, असेही उद्धव म्हणाले. हे त्यांचे भाषण दृकश्राव्य माध्यमावर झाले हे एका अर्थी बरे झाले. त्यामुळे स्वत:च्या आणि पक्षाच्या या दयनीय स्थितीची कबुली देताना त्यांच्या चेहरयावर जराही खंत नव्हती, हेही सर्वांना दिसू शकले. एवढे होऊनही खंत न वाटणे व ‘चांगल्या कामाला दृष्ट लागतेच’ असे म्हणून झालेल्या गोष्टींची जबाबदारी स्वत: न स्वीकारता दुसºयावर खापर फोडणे हेही मग्रुरीचे व सुजाण नेतृत्वहीनतेच प्रतिक म्हणावे लागेल.

बंडखोरीने सरकार पाडण्याला ’पाप’ म्हणण्याचे नैतिक धारिष्ट्य नसल्यानेच उद्धव यांनी उपाहास आणि वक्रोक्ती यांचा आधार घेत त्याला ‘बाळासाहेबांच्या मुलाला खुर्चीवरून खाली खेचण्याचे ‘पुण्य’ असे म्हणाले लागले, हेही लक्षात घ्यायला हवे. कमालीच्या अडचणीत सापडल्यावर माणसाची मती भ्रष्ट होणे हे नैसर्गिक आहे. परंतु उद्धव यांचे हे विधान अशा मतीभ्रष्टतेतून आलेले नाही. तर बाळासाहेबांचे नाव घेत स्वत: केलेल्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी ‘पापा’ला ‘पुण्य’ म्हणण्याची त्यांची ही बौद्धिक चलाखी होती. बाळासाहेबांनीच केलेली भाजपासोबतची युती तोडणे, ज्या काँग्रेसच्या व त्यातूनच जन्मलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेबांनी राजकारण केले त्यांच्याच मदतीने सत्तेवर येऊन त्यांच्या हातचे बाहुले होणे आणि आपले हे सर्व वागणे शिवसेनेच्या अस्तित्वावरच घाला घालणारे ठरू शकते हे दिसत असूनही स्वत:चा हेका न सोडणे अशी त्रिविध ‘पापे’ उद्धव ठाकरे यांनी केली आहेत. डोळ््यांवर कातडे ओढून आपल्या या ‘पापां’ची कबुली न देणे हे उद्धव यांच्या कुश्ल नेतृत्वाचे नव्हे तर मूढतेचे लक्षण आहे.

दिवंगत आनंद दिघे स्वत:ला ‘ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख’ म्हणवून घेत. या बद्दल बाळ ठाकरे यांनी दिघे यांना जाहीर समज दिल्याचा उल्लेख वारंवार केला जातो. याचाच पुढचा भाग म्हणून बाळ ठाकरे यांच्या निधनानंतर ‘शिवसेनाप्रमुख’ हे त्यांच्यासाठी मरणोत्तर राखून ठेवून ‘शिवसेना पक्षप्रमुख’ अशी बिरुदावली तयार केली गेली. ‘ठा़णे जिल्हा शिवसेनाप्रमुख’ असे स्वत:ला म्हणवून घेताना खरंच दिघे यांच्या मनात ठाकरे यांच्या मनात आली तशी महत्वाकांक्षी भावना होती की नाही, हे कळायला मार्ग नाही. पण स्वत:ला दिघे यांचे सच्चे वारस मानणाºया एकनाथ शिंदे यांच्या रूपाने दिघे यांची ही अव्यक्त व अतृप्त इच्छाही कदाचित पूर्ण होण्याची चिन्हे गेल्या १० दिवसांच्या घटनाक्रमावरून दिसते. खरंच तसे झाल तर आधीच काठोकाठ भरलेला उद्धव ठाकरे यांचा ‘पापा’चा घडा ऊतू जाईल!

या सर्व घटनाक्रमात उद्धव ठाकरे यांना सल्ला देणाºयांच्या अकलेचीही कींव करावीशी वाटते. नैतिकतेचाच टेंभा मिरवायचा होता तर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितल्यावर एक तर तोच उसना आव कायम ठेवून विधानसभेला सामोरे जाणे किंवा लगेच राजीनामा देणे हे अधिक प्रतिष्ठेचे मार्ग होते. परंतु तसे न करता सर्वोच्च न्यायालयात जाऊन हात दाखवून अवलक्षण करून घेण्याचा सल्ला उद्धव यांना दिला गेला व तो त्यांनी मानला. न्यायालयाने बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिला. पण त्याची निष्पन्नता याचिकेवरील अंतिम निकालाच्या अधीन असेल, असे नमूद केले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला निर्देश घटनाबाह्य व बेकायदा आहे, असे अंतिमत: आम्हाला पटले तर आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवून विश्वासदर्शक ठराव व त्या अनुषंगने पुढे होणाºया अन्य बाबीही रद्द करू शकतो, असे न्यायमूर्तींनी सुनावणीत स्पष्टपणे बोलून दाखविले होते. उद्धव यांनी विधानसभेत पराभव झाल्यावर राजीनामा दिला असता तर आता येऊ घातलेल्या नव्या सरकारच्या डोक्यावर वरीलप्रमाणे संभाव्य न्यायालयीन निकालाची टांगती तलवार तरी राहिली असती. परंतु उद्धव यांनी मैदानात न उतरताच पळ काढून व सपशेल लोटांगण घालत त्यांच्या ‘चांगल्या कामांना दृष्ट लावणाºयांना’ ‘पुण्य’ करण्यासाठी रान मोकळे करून दिले आहे.

‘लोकशाहीमध्ये माणसांचा उपयोग फक्त डोकी मोजण्यासाठी होणार असेल तर मला अशी लोकशाही नको… मला त्या आकड्यांच्या खेळात पडण्याची इच्छा नाही….’ ही उद्धव यांची वाक्ये त्यांच्या राजकीय दिवाळखोरीची द्योतके आहेत. आता म्हणे ते रोज शिवसेना भवनात जाऊन बसणार आहेत. तेथे त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या डोक्यांची मोजणी बहुमतासाठी न करताही शिवसेना कशी वाचविता येईल, याचे चिंतन जरूर करावे.

(सौजन्य : फेसबुक पोस्ट)

Arrogance of Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती