चटणी – कोशिंबीरीचे मिंधे


फुकट विमान प्रवासाच्या बातमीत अमर्त्य सेन यांचे नाव झळकल्याने त्यावर टीका – टिपण्या सुरू आहेत. पण यात नवीन काही नाही. विद्वत्तेच्या नावाखाली असले लाभ उठविणे ही आम बात आहे. पण यालाच साहित्यदुर्गा दुर्गा भागवतांनी चटणी – कोशिंबीरीचे मिंधेपण म्हटले आहे… ते का… वाचा…  Amartya Sen Only Bharat Ratna Awardee To Avail Free Air Travel, Took 21 Flights In 4 Years: Reveals RTI


आजच्या लेखाचे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण ते खरे आहे आणि हे देशातल्या फार मोठ्या विदूषीने ते लिहिले आहे… आपल्याच देशातल्या बुद्धिमान साहित्यिक, विद्वजनांचे हे वर्णन केले आहे, साहित्यदुर्गा दुर्गा भागवत यांनी.

त्यांनी मराठी साहित्यिकांच्या लाचारीबद्दल टीका करताना लिहिले होते, या साहित्यिकांना भाजी – भाकरीची चिंता नसते. पण चटणी कोशिंबीरीसाठी ते लाचार आणि मिंधे होतात. म्हणजे त्यांना रोजच्या जीवनयापनाची चिंता नसते. ते आपल्या बौद्धिक कुवतीनुसार तेवढे कमवू शकतात. पण ते अन्य अनुषंगिक लाभ मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांची लाचारी करतात किंवा ऐन मोक्याच्या क्षणी गप्प बसतात.

आज दुर्गा भागवतांच्या या लिखाणाची आठवण येण्याचे कारण म्हणजे अमर्त्य सेन यांची माहिती अधिकारात मिळालेली बातमी. अमर्त्य सेन हे असे पहिले भारतरत्न आहेत, की जे त्या किताबाचा सर्वाधिक आर्थिक लाभ घेऊन ४ वर्षांत २१ वेळा मोफत विमानप्रवास करून परदेशवाऱ्यांवर गेलेत. त्या बातमीचे तपशील इंडिया टुडेपासून सगळीकडे मिळतील. पण यातले इंगित हे की ज्या अमर्त्य सेन यांना भाजी – भाकरीची चिंता तर सोडाच पण त्यांनी ठरविले तर ते स्वतःच्या कमाईतून रोज पंचपक्वान्ने खाऊ शकतात, त्यांनी भारतरत्न किताबाचा लाभ उठवून परदेशवाऱ्या केल्या आहेत.



आणि अमर्त्य सेनच कशाला… ल्यूटन्स दिल्लीच्या गल्ल्यांमधून आणि मोठमोठ्या नेत्यांच्या नावाने असलेल्या मार्गावरील बंगल्यांमध्ये जरा डोकवा… असले शेकडो अमर्त्य सेन सापडतील की जे अशा चटणी – कोशिंबीरीचे वर्षानुवर्षे मिंधे होऊन बसले आहेत. कोणी चिल्ड्रेन बुक ट्रस्टवर, कोणा – कोणा महान नेत्यांच्या मेमोरिअल ट्रस्टवर कायमचे संचालक आहेत, कोणी दिल्लीतल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्लबचे बुद्धिमंत सदस्य आहेत… ज्यांचे संशोधन वर्षानुवर्षे लोकांसमोर आलेले नाही, असे सामाजिक, राजकीय संशोधक आहेत. राजधानीतल्या वेगवेगळ्या राज्यांच्या भवनांमधले दूत आहेत की ज्यांनी वर्षानुवर्षे काहीही केलेले नाही, तरी त्यांना चटणी – कोशिंबीर सुखनैव मिळत राहिली आहे. किंबहुना त्यांचे बौद्धिक भरण पोषणच या चटणी – कोशिंबीरीतून चालले आहे. व्हिटॅमिन ए पासून व्हिटॅमिन झेडपर्यंत सगळी व्हिटॅमिनची पोषणमूल्ये त्यांना याच चटणी – कोशिंबीरीतून मिळत आहेत. व्हिटॅमिन एम ची तर त्यांना कधीच कमतरता भासत नाही.

या चटणी – कोशिंबीरीच्या मिंध्यांची बौद्धिक चमकही कधी – मधी दिसते, एखाद्या गौरवग्रंथाचे संपादन करताना, त्यामध्ये कंटेट कॉन्ट्रीब्यूट करताना आणि तो समर्पित भावनेने संबंधित महान नेत्याला अर्पण करताना… राजधानीतील महान नेत्यांच्या गौरवग्रंथांच्या अर्पण पत्रिका, प्रस्तावना आणि अनुक्रमणिका वाचा… चटणी – कोशिंबीरीचे बरेच नामवंत मिंधे सापडतील तुम्हाला त्यात.

आज अमर्त्य सेन यांचे नाव बातम्यांमध्ये झळकलेय म्हणून त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका – टिपण्णी सुरू आहे… पण या चटणी – कोशिंबीरींच्या मिंध्यांची यादी एवढी मोठी आहे, की ती सगळीच्या सगळी छापण्यासाठी एखादा ग्रंथच लिहावा लागेल किंवा आत्ताच्या सोशल मीडियाच्या दुनियेत विडिओंची मालिका बनवावी लागेल त्यासाठी…!! एवढे करूनही चटणी – कोशिंबीरींच्या मिंध्यांमध्ये काही फरक पडेल, असे वाटत नाही… कारण त्यांच्या डीएनएमध्ये या चटणी – कोशिंबीरीच्या प्रभावाने मोठा बदल झालाय…!! त्यातला स्वाभिमानाचा घटक आता नष्ट झाला आहे.

Amartya Sen Only Bharat Ratna Awardee To Avail Free Air Travel, Took 21 Flights In 4 Years: Reveals RTI

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात