5 states election analysis : काँग्रेस – डाव्यांशी नव्हे, तर नव्या प्रादेशिक अस्मितेशी लढण्याचे मोदी – शहांपुढे आव्हान

 • चॅनेली चर्चांच्या पलिकडे जाऊन आज आलेल्या ५ राज्यांच्या निवडणूकांकडे तटस्थ नजरेने पाहिले तर काही ठोस मुद्दे हाती लागू शकतात ते असे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे इथून पुढचे आव्हान असेल, ते काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी संघटनात्मक पातळीवर लढण्याचे नसून नव्याने उदय पावलेल्या प्रादेशिक पक्षांच्या अस्मितांच्या धुमाऱ्यांशी लढण्याचे असेल. 5 states election analysis new fight emerges for modi – shah BJP, against new regional political aspirations

 • हे आव्हान दुहेरी असेल. काँग्रेस आणि डाव्यांच्या नॅरेटिव्हशी लढणे आणि संघटनात्मक पातळीवर त्या पक्षांच्या नॅरेटिव्हवर चालणाऱ्या प्रादेशिक पक्षांशी लढणे. ही लढाई अशी दोन पातळ्यांवर लढावी लागणार आहे.
 • या लढाईत एक अंर्तविरोध आहे, त्याचा सामना वाजपेयी – अडवानींच्या भाजपला करावा लागला नव्हता. पण तो मोदी – शहांच्या भाजपला करावा लागत आहे. तो म्हणजे भाजपची हिंदुत्वाच्या पातळीवर वाढत असलेली संघटनात्मक ताकद, त्यातून निर्माण झालेली संघटनात्मक विस्ताराची महत्त्वाकांक्षा. हा तो अंतर्विरोध आहे. भाजपसाठी तो दीर्घकालीन राजकीय अजेंड्याचा भाग राहणार आहे.
 • वाजयेपी – अडवानींच्या काळात भाजप सातत्याने विस्तारत असला तरी संपूर्ण बहुमतापर्यंत पोहोचला नव्हता. त्यामुळे राजकीय अपरिहार्यतेतून त़डजोडींच्या स्वरूपात त्यांच्या भाजपने प्रादेशिक पक्षांशी यशस्वी हातमिळवणी केली होती.
 • आज भाजपचा भौगोलिक विस्तार आणि संख्यात्मक विस्तार मोठ्या प्रमाणावर झाल्याने तो त्याच्याच जुन्या प्रादेशिक मित्र पक्षांना अडचणीचा ठरू लागल्याचे दिसले आहे. बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेस, महाराष्ट्रात शिवसेना आणि ओरिसात बिजू जनता दल ही त्याची उदाहरणे आहेत.
 • एके काळी ममता बॅनर्जी यांची तृणमूळ काँग्रेस देखील वाजपेयी – अडवानींच्या भाजपचा मित्र पक्ष होती. पण मोदी – शहांचे भाजपच्या राजकीय विस्ताराचे compulsion आणि ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील राजकीय अस्तित्वाचे compulsion यातून बंगालमध्ये दोन्ही पक्षांमध्ये विरोध तयार झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या राजकीय संघर्षात झाले. महाराष्ट्रात ते शिवसेनेशी होऊ पाहात आहे.
 • बंगालमधल्या संघर्षात २०२१ मध्ये ममता बॅनर्जी निर्णायकरित्या जिंकल्या आहेत. पण भाजपने देखील मोठी झेप घेतल्याचे नाकारता येणार नाही. काँग्रेस – डाव्यांच्या हिंसक विरोधी पक्षाकडून बंगालची वाटचाल उजव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षाकडे झाली आहे, हे देखील बंगालच्या आजच्या निकालाचे मोठे राजकीय फलित आहे. त्याकडे मेन स्ट्रीम मीडिया दुर्लक्ष करतो आहे.
 • येथेही दोन्ही पक्षांना मोठ्या अंर्तविरोधाचा सामना करावा लागणार आहे. आणि कदाचित तो २०२४ पर्यंत चालू शकेल. पण यामध्ये ममतांच्या विजयने नवा आयाम जोडला आहे. हाच तो प्रादेशिक अस्मितेचा नवा अविष्कार आहे आणि तोच नेमका भाजपच्या राजकीय विस्तारासाठी मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
 • मोदी – शहांच्या भाजपला या अडथळ्यावर मात करण्याची उपाययोजना शोधावी लागेल. ही उपाययोजना संघर्षातूनच शोधावी लागेल असे मात्र नाही. काही तडजोडी करूनही त्यांना यातून मार्ग सापडू शकेल.
 • महाराष्ट्र, ओरिसा यातून नवा मार्ग दाखवू शकतील. शिवसेनेसमवेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा जुळवून घेतले आणि ओरिसात नवीन पटनाईक यांच्याशी संघर्ष तीव्र होण्यापूर्वीच जुळवून घेतले तर भाजपला आपण सगळ्या प्रादेशिक पक्षांचे राजकीय शत्रू नाही, हे दाखवून देता येईल. तामिळनाडूत द्रमूकची देखील यासाठी मदत होऊ शकेल. कारण केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेण्याची तामिळनाडूतील कोणत्याही सत्ताधारी पक्षाची सहज प्रवृत्ती राहिली आहे.
 • करूणानिधींच्या काळात द्रमूकने वाजपेयी – अडवानींच्या भाजपशी जुळवून घेतले होते. हा इतिहास फार जुना नाही. १० – १५ वर्षांपूर्वीचाच आहे.
 • बंगालमध्ये प्रचंड फौज उतरवून मोदी – शहांच्या भाजपला जे साध्य करायचे ते साध्य झाले आहे. काँग्रेस आणि डावे हे मूळ वैचारिक राजकीय शत्रू संघटनात्मक पातळीवर संपुष्टात आले आहेत.
 • उरलेल्या प्रादेशिक पक्षांसमवेत वैचारिक वैर साधत राहण्याचे भाजपला कारण नाही. भाजपच्या विस्तारासाठी हे वैर केलेच पाहिजे, याची गरज नाही. उलट थोडी व्यापक भूमिका घेऊन या प्रादेशिक पक्षांना हिंदुत्वाच्या छत्राखाली आणणे शक्य आहे. त्यासाठी मोदी – शहांनी स्वतःला तसे मोल्ड करवून घेतले पाहिजे. आणि राजकारणात ते शक्य आहे.

5 states election analysis new fight emerges for modi – shah BJP, against new regional political aspirations