राज यांच्या धास्तीने उध्दव ठाकरेंनाही भूमिपुत्रांसाठी पाझर!

सत्तेसाठी अनेक तात्विक कोलांटी उड्या मारणारे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कोड्यात सापडले आहेत. परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने निघून चालल्याचा फायदा स्थानिक तरुणांनी घ्यावा, असे सांगत राज यांनी त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न चालवले आहेत. यामुळे ठाणे-मुंबईतल्या मराठी तरुणांमध्ये ‘मनसे’ चांगलेच मूळ धरु शकते, हे लक्षात आल्याने उद्धव यांनाही आता भूमिपुत्रांसाठी पाझर फुटला आहे.


निलेश वाबळे

चीनी व्हायरसच्या भीतीने परप्रांतिय मजूर त्यांच्या राज्यांत परत चालले आहेत. त्यांच्यामुळे रिक्त झालेल्या नोकर्या स्थानिक भूमिपुत्रांना देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोहीम सुरू केली आहे. या धास्तीने आता उध्दव ठाकरे यांनाही आता भूमिपुत्रांसाठी पाझर फुटला आहे. स्थानिकांना काम उपलब्ध करून द्या, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याच्या उद्योग विभागाला आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सुरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पाहा व स्थानिकांना काम उपलब्ध करून द्या, असे म्हटले आहे.

मराठी अस्मिता, मराठी माणूस आणि अखंड महाराष्ट्राची भूमिका यावर आजपर्यंत शिवसेनेचे राजकारण होते. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून वादात शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी केली आहे. मात्र, त्यामुळे शिवसेनेला मराठी अस्मितेचा मुद्दा घेणे अवघड झाले आहे. तसे केल्यास कॉंग्रेस डोळे वटारणार, शरद पवार यांच्या पुरोगामीत्वाची झुल उडू लागणार. त्यामुळे शिवसेनेची द्विधा मनस्थिती आहे. चीनी व्हायरसच्या संकटात परप्रांतिय मजूर आपल्या गावी परतू लागले आहेत. यावेळी नेमका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भूमिपुत्रांचा मुद्दा उचलला आहे.

परप्रांतीय गेल्यामुळे महाराष्ट्रातील कारखाने उद्योगधंदे बंद होऊ नये, यासाठी राज्यातील तरुण तरुणींना या संधीचा फायदा घेऊ द्या. त्यांच्यापर्यंत याबाबत माहिती पोहोचवा,असे आवाहन त्यांनी केले आहे. यापुढे जाऊ परप्रांतीयांची परत आल्यावर राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. ‘हीच ते वेळ आहे,’ नंतर ते करता येणार नाही, असेही राज ठाकरे म्हणत आहेत.

आपल्याकडे अनेकदा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी त्यांना रोजगाराबाबत माहिती नसते. त्यामुळे जर रोजगार उपलब्ध असले तर ते या मुला-मुलींना कळवावे. भाजी विकण्यापासून इतर अनेक ठिकाणचे लोक बाहेर गेलेले आहे. ती संधी महाराष्ट्र शासनाकडे आहे, ती संधी घालवू नये, असेही राज यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला आता त्यावर काहीतरी करावे लागणार आहे. अन्यथा शिवसेनेच्या मराठी अस्मितेचा मुद्दा मनसेकडून हायजॅक होऊ शकतो.

शिवसेनेची महाराष्ट्रात स्थापनाच मराठी माणसाच्या हक्कांसाठी झाली होती. मराठी माणसांच्या हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक साप्ताहिक सुरू केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून १९ जून १९६६ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर जवळपास ३० वर्षे शिवसेना याच मुद्यावर लढत होती. मधल्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला हिंदूत्वाच्या वाटेवर नेले. भारतीय जनता पक्षाशी युती झाल्यावर हिंदूत्ववादी मते युतीकडे आली. मात्र, आज भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विरोधात असताना या मतांवर शिवसेनेला हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी मतांकडे वळावे लागणार आहे.

शिवसेना स्थापन झाली त्यावेळी मुंबईत मराठी मतांचा टक्का ३७ होता. अलिकडच्या काळात तो १७ टक्के इतका खाली घसरला. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी आपली मुंबई ही मोहीम सुरू केली होती. मात्र, राज्यातील १०० मतदारसंघात अन्य राज्यातील मतदारांचा प्रभाव वाढत आहे. ही मते पारंपरिकरित्या भाजपाची मानली जातात. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी मतांकडे शिवसेनेला वळावे लागेल. त्यासाठी परप्रांतियांचे स्थलांतर ही संधी शोधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. परंतु, कॉँग्रेसला हे मान्य होणार का हा प्रश्न आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*