प्रतिनिधी
ठाणे : तुम्ही लवकर बऱ्या व्हा, आम्ही बाकीचे बघतो अशा शब्दांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील अतिक्रमणविरोधी पथकातील महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांना दिलासा दिला आहे.MNS Chief Raj Thackeray Meeting Kalpita Pimple in thane hospital
राज ठाकरे यांनी अधिकारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आहे. फेरीवाल्यांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या होत्या. काहीच वेळापूर्वी राज ठाकरे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले होते.
मंगळवारी पत्रकार परिषदेत या घटनेवर भाष्य केल्यानंतर आज स्वतः राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, मी आश्वासन वगैरे काही दिलेले नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा. एवढेच सांगितले आहे.” यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले की, आमच आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात असते. जे काही घडलं त्याचं निश्चितच दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणे गरजेचे आहे. पोलीस त्यांची कारवाई करतच आहेत. न्यायालय देखील त्यांचे काम करेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे.
कल्पिता पिंपळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तुम्ही लवकर बऱ्या व्हावी. बाकी काय करायचं ते आम्ही बघतो”, असा आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे यात पाहायला मिळत आहे.
“ह्यांची मस्ती उतरवली पाहिजे”
राज ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा बोट छाटली जातील आणि जेव्हा फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा ह्यांना कळेल. हिंमत कशी होते ह्यांची? इतक्या वर्षांत मी कधी असं पाहिलेलं नाही. बोट छाटली एका अधिकाऱ्याची? हा काय प्रकार आहे. आता पोलिसांकडून सुटून आल्यानंतर त्यांना नेमकी खरी भीती काय असते ते कळेल”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
नक्की काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली.
त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले.
अटक आणि गुन्हा
घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App