काँग्रेसचे नेते फोडून तृणमूल काँग्रेस बळकट करून ममता बॅनर्जी कोणत्या प्रकारचे विरोधी ऐक्य साधू इच्छीत आहेत?? काँग्रेसला दुखावून त्या त्यांचे हवे असलेले राजकीय इप्सित साध्य करु शकतील काय?? काँग्रेस फोडून त्या भाजपचे कोणते नुकसान करीत आहेत?, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्नच पूर्ण करायला हातभार लावत आहेत…?? विचार करण्याजोगे प्रश्न आहेत…!!What Mamata Banerjee is expecting by splitting Congress? Opposition unity or fulfilling Modi’s dream of “Congress free India”??
महाराष्ट्रातले एक जुने जाणते पत्रकार होते, भाऊ पाध्ये. आज भाऊ तोरसेकर आहेत. तेव्हा भाऊ पाध्ये होते. भाऊ पाध्ये यांची “वासूनाका” ही कादंबरी प्रचंड गाजली होती. परंतु त्यांचे पत्रकारितेतले कर्तृत्वही मोठे होते.त्यांनी काँग्रेस पक्षाचे वर्णन प्रचंड मोठ्या वटवृक्षाची उपमा देऊन केले होते. काँग्रेस हा अतिविस्तार झालेला वटवृक्ष आहे.
त्याच्या फांद्या – खांद्यांवर आणि पारंब्यांवर लाखो जीव लटकलेले आहेत. या वृक्षाची फळे खाऊन, त्याचा रस शोषून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. इतकेच नाही तर मोठ मोठे साप, नाग, पक्षी या वटवृक्षाच्या ढोल्यांमध्ये वर्षानुवर्षे आपले ऐदी जीवन सुखनैव व्यतीत करीत आहेत, असे वर्णन त्यांनी इंदिराजींच्या काळातल्या काँग्रेसचे केले होते. आज हे बोलणं आठवायचे कारण या वटवृक्षावर कुर्हाड चालवली जात आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे या वटवृक्षाच्या ढोलीत, सावलीत आपले बस्तान बसवले नंतर कंटाळा आला म्हणून बाहेर पडले तेच नेते आज काँग्रेसच्या वटवृक्षावर फोडाफोडीची कुर्हाड चालवत आहेत.
काँग्रेस चा तो वटवृक्ष आज तेवढा डेरेदार राहिलेला नाही. त्याचा विस्तारही आकुंचित पावला आहे. पण वटवृक्ष तो वटवृक्ष…!! तो काही छोट्या झाडपाल्या येवढा किंवा वेली, बांडगूळासारखा छोटा थोडाच होणार आहे. हा वटवृक्ष आता झडला आहे. पण तो पूर्ण वठलेला नाही. पुन्हा नवी पालवी फुटून तग धरून राहण्याची इतका नक्की बहरलेला आहे. पण त्याच्या ढोलीत सुखनैव राहणाऱ्या प्राण्यांना मात्र आता अस्वस्थ वाटू लागले आहे. काँग्रेस नेत्यांची ही अवस्था आहे.
त्यापेक्षाही काँग्रेसच्या बळावर मोठ्या झालेल्या आणि नंतर काँग्रेस बाहेर पडून आपले राजकीय कर्तृत्व गाजविणाऱ्या नेत्यांची ही अवस्था आहे. काँग्रेस बाहेर पडलेले नेते आता काँग्रेसच्याच वटवृक्षाच्या फांद्या – खांद्या तोडून, रस शोषून आपापले छोटे वृक्ष म्हणजे पक्ष बळकट करण्याच्या मागे लागले आहेत.
महाराष्ट्रात हा प्रयोग शरद पवारांनी यशस्वी करून दाखविला आहे. आता नंबर बंगालचा आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस तर पूर्ण संपवून दाखविली. आता त्यांनी आपला होरा आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांकडे वळवला आहे. त्यांचा आवेश तर भाजपला संपवण्याचा आहे. पण प्रत्यक्षात मात्र त्या काँग्रेसला संपवत निघाल्या आहेत. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांना काँग्रेसमधून फोडून त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घेतले आहे. यात भाजपचे काय नुकसान आहे? काडीचेही नुकसान नाही. नुकसान झालेय ते काँग्रेसचे…!!
शिवाय काँग्रेस असो की ममतांची तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष आता विरोधकांच्या मोदी विरोधातील ऐक्यासाठी पुढे सरसावले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी विरोधी ऐक्य घडविण्याचे गांभीर्यपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. या दोघी एकमेकींना भेटल्या देखील आहेत.
जणू काही आपले “सामायिक ध्येय” एकच आहे हे त्यांनी एकमेकांना सांगितले आहे. या सगळ्यात ममता बॅनर्जी यांची कृती मात्र या सामायिक ध्येयाला छेद देणारी ठरते आहे. ममतांनी काँग्रेस पक्ष फोडण्याचा सपाटा लावलेला दिसतो आहे. अन्यथा विरोधी ऐक्य घडविण्याच्या नावाखाली त्यांनी सुष्मिता देव यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्याला आपल्याकडे ओढले नसते.
सुष्मिता देव या वर्षानुवर्ष काँग्रेसनिष्ठ राहिल्या आहेत. आसाममध्ये त्यांचे काही नाव आहे. सुष्मिता देव या राजीव गांधी यांचे निकटवर्ती संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. आसामच्या सिल्चर मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व आहे. आधी संतोष मोहन देव आणि नंतर सुष्मिता देव सिल्चर मधून लोकसभेत पोहोचले आहेत. संतोष मोहन देव यांच्या निधनानंतर सुष्मिता देव यांच्याकडे राजकीय वारसा काँग्रेसने सोपविला. त्यांना आमदार खासदार केले. अखिल भारतीय महिला काँग्रेसचे अध्यक्षपद दिले. त्या आता आपले राजकीय भवितव्य शोधण्यासाठी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करत्या झाल्या आहेत.
याला नेमके काय म्हणायचे?? ममता बॅनर्जी काँग्रेस फोडून नेमके कोणत्या प्रकारचे विरोधकांचे ऐक्य साधत आहेत?? काँग्रेस फोडून त्या भाजपला कोणत्या प्रकारचे राजकीय नुकसान पोहोचवत आहेत?? काही राजकीय तर्कशास्त्र आहे का?? की विरोधी ऐक्याचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात आपलाच पक्ष बळकट करून शेवटी काँग्रेसलाच नामशेष करायच्या मागे लागायचे…?? यातून ममता बॅनर्जी कोणते ध्येय साध्य करू इच्छितात?? विरोधकांचे ऐक्य?, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न??
शरद पवारांचा हे तू महाराष्ट्रात स्पष्ट आहे. मित्र पक्ष फोडून आपला पक्ष निदान केंद्रस्थानी ठेवावा हे त्यांचे “लिमिटेड” ध्येय आहे. ममता बॅनर्जी यांचे ध्येय तेवढेच लिमिटेड आहे का?? काँग्रेस फोडून त्या विरोधकांचे खऱ्या अर्थाने ऐक्य साधू शकतील का?? विरोधकांचे ऐक्य साधले गेले तरी काँग्रेसला वगळून किंवा काँग्रेसला राजकीय दृष्ट्या दुखावून ममता बॅनर्जींच्या सारख्या प्रादेशिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहेत का…?? या प्रश्नांची उत्तरे विरोधकांच्या ऐक्य प्रयत्नात मोठा अडथळा ठरणारी आहेत.
विरोधकांचा आवेश मोठा आहे, पण एकमेकांवर तितकाच मोठा अविश्वास आहे आणि त्यामुळेच हे विरोधी ऐक्य काँग्रेसच्या वटवृक्षावर कुऱ्हाड चालविणारे ठरत आहे…!! यातून विरोधी ऐक्य साधेल की नाही माहिती नाही पण मोदींचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न मात्र स्वतः विरोधकच पुढे येऊन पूर्ण करण्याची चिन्हे दिसत आहेत…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App