एक तेची नाना; मेहबूबांचे “स्वबळाचे” तनाना…!! आणि “नानांच्या राजकीय वळणावर मेहबूबांचे पाऊल” ही शीर्षके वाचून वाचकांना आश्चर्य वाटेल. कोणाला लेखकाच्या शुध्दीवर असण्याविषयी शंका देखील येईल. पण तसे काही घडलेले नाही. खरेच नाही. आता जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्तींचे पाऊल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या “राजकीय वळणावर” पडले आहे, त्याला प्रस्तूत लेखक तरी काय करणार…??!!
मेहबूबांनी धमकीच तशी दिली आहे, अगदी नाना पटोले देतात तशी…!! नाना नाही का गेल्या ४ – ५ महिन्यांपासून महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याच्या धमक्या देऊन दिल्लीच्या वाऱ्या करताहेत. नानांच्या नेमक्या त्याच “राजकीय वळणावर” मेहबूबा मुफ्ती जाऊन पोहोचल्या आहेत. त्यांनी देखील महाराष्ट्रातल्या नानांसारखीच जम्मू – काश्मीरमध्ये स्वबळाची धमकी दिली आहे.
फक्त नानांच्या आणि मेहबूबांच्या धमक्यांमध्ये फरक हा आहे, की नाना महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याची धमकी देताहेत, तर मेहबूबा मुफ्ती या स्वबळावर “केंद्रशासित प्रदेश जम्मू – काश्मीरची” निवडणूक न लढविण्याची धमकी देत आहेत…!! त्यांना ३७० सकट जम्मू – काश्मीरचे राज्य हवे आहे…!! ते मिळाल्याशिवाय निवडणूक न लढविण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
… आणि या दोघांचे शिंचे विरोधक या धमक्यांना हसत सुटले आहेत. काय कारण आहे, विरोधकांनी हसत सुटण्याचे…??!! नानांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस काय स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही??, की मेहबूबा या स्वबळावर निवडणूक लढणे टाळू शकत नाहीत…??… नाना – मेहबूबा हे दोघेही नक्की “तसे” करू शकतात… पण प्रश्न फक्त हा आहे, हे दोघेही ज्या पक्षांचे नेते आहेत, त्यांना या दोघांचा स्वबळाचा निर्णय पटू शकेल का आणि ते दोघेही तो निर्णय अमलात आणू शकतील का…??
विरोधकांच्या हसण्याची “राजकीय मेख: इथेच दडली आहे. स्वबळाची भाषा करणाऱ्या बिचाऱ्या नानांचे दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी तोंडच बंद करून टाकले. एवढे मोठे नाना स्वबळावर लढायला निघून काँग्रेसला नंबर १ चा पक्ष बनविण्याचे चॅलेंज घेत होते, पण दिल्लीपतींनी त्यांच्याच मार्गात खोडा घातलान…!!
अगदी तसेच मेहबूबांच्या स्वबळाच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे म्हणून जम्मू – काश्मीरमधले त्यांचे विरोधक हसत आहेत. एकतर त्यांचा पीडीपी हा काश्मीरच्या अडीच जिल्ह्यांमधल्या पक्ष आहे. आणि एकदा का मेहबूबांनी स्वबळावर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला की त्या अडीच जिल्ह्यांच्या पक्षामध्ये राहायला कोणते नेते आणि कार्यकर्ते तयार होतील, हा सवाल खडा होईल. मग मेहबूबांच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षाकडे ओढण्याची चढाओढ काश्मीरी पक्षांमध्ये लागेल. अशा स्थितीत मेहबूबांचे “स्वबळ” तर शिल्लक राहील पण त्या बळावर पुढची लढाई करण्यासाठी पक्ष शिल्लक राहील का, हा खरा प्रश्न आहे… आणि म्हणूनच काश्मीरमधले मेहबूबांचे विरोधक त्यांना हसत आहेत…!! त्यांनी स्वबळावर निवडणूक न लढविण्याची दिलेली धमकी सिरियसली घ्यायला कोणी तयार नाही.
या अर्थाने नानांच्या “राजकीय वळणावर” मेहबूबा गेल्या आहेत, त्याला प्रस्तूत लेखक तरी काय करणार…?? त्याला जे दिसले, ते त्याने फक्त मांडलेय…!! यापेक्षा काही नाही…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App