प्रतिनिधी
मुंबई – ठाकरे – पवार सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परस्पर घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फिरवून टाकला. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी याला कारणीभूत ठरले. मुख्यमंत्र्यांचा अधिकार मान्य करून आव्हाडांनी दुसरा निर्णय जाहीर केला. आता त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदविला आहे. जितेंद्र आव्हाडांना शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजकीय थपडा दिल्या आहेत. shiv sena and congress leaders slaps jitendra awahad over flat allocation to tata cancer hospital
टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या 100 सदनिका देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला होता. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या शरद पवारांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम जितेंद्र आव्हाडांनी सिल्वर ओकवर जाऊन घेतला होता. पण शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय नेऊन जितेंद्र आव्हाडांचा निर्णय फिरवला. तो आव्हाडांना मान्य करावा लागला.
यातून राष्ट्रवादीला केलेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बॉम्बे डाईंग परिसरात सदनिका टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. तो आव्हाड यांनी जाहीर केला. पण आव्हाडांनी हा निर्णय जाहीर करताच ‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करून आव्हाडांच्या या निर्णयावर देखील आक्षेप घेतला. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, की राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अशा परिस्थितीत टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल पटोलेंनी करून जितेंद्र आव्हाडांना पुन्हा अडचणीत आणले.
टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्णयावर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्याने आव्हाडांची राजकीय नाचक्की झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App