बारामतीत उद्योजकावर हल्ला, सुनेत्रा पवारांचे पोलिसांना स्पष्ट निर्देश; नेमकं काय घडलं?

Sunetra Pawar

बारामती विमानतळ परिसरात उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही आणि या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली आहे.

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती तालुक्यात उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सूर्यवंशी जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी संपर्क साधून त्यांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याचे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

‘नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणालाही खेळू देणार नाही’

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.



दरम्यान, राणा सूर्यवंशी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशा सदिच्छाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

बुके देण्याच्या बहाण्याने हल्ला केल्याची माहिती

समोर आलेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी हे दौंडच्या दिशेने जात असताना गोजुबावी परिसरात जमिनीचा प्लॉट पाहण्यासाठी थांबले होते. याच वेळी बुके देण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

सूर्यवंशी यांना वाय-प्लस दर्जाची सुरक्षा असल्याची माहिती आहे. मात्र, हल्ल्याच्या वेळी त्यांची सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासोबत नव्हती, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत खासगी अंगरक्षक होते. या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

कोण आहेत राणा सूर्यवंशी?

राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे मालक असून, ते मूळचे बारामती तालुक्यातील माळेगाव येथील रहिवासी आहेत. सध्या ते पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. शिपिंग व्यवसायासोबतच त्यांचे शिक्षण क्षेत्रातही कार्य असल्याचे सांगितले जाते.

यापूर्वीही सूर्यवंशी यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. आता बारामती परिसरात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले असून, हल्लेखोरांना अटक करून घटनेमागील कारणांचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तपासातून हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

Entrepreneur attacked in Baramati; Sunetra Pawar issues clear directives to the police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात