‘जंतरमंतरवर बसून मतं मिळत नसतात’; जयकुमार गोरेंचा विरोधकांवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यावर निशाणा साधला आहे. “सानप कोण आहे, मी त्याला ओळखत नाही. मला एकाही व्यक्तीने किंवा संघटनेनेही सानप कोण आहे, हे सांगितलेले नाही,” असे विधान त्यांनी केले. तसेच, सचिन सानप यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही गोरेंनी केला. विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना, “जंतरमंतरवर बसून मतं मिळत नसतात,” असा टोलाही त्यांनी लगावला.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मंत्री चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे उपस्थित होते. विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोरेंनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.

‘महायुतीचे पाचही उमेदवार निवडून येतील’

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची महायुती निवडणुकीत एकत्रितपणे काम करत असल्याचे गोरेंनी सांगितले. महायुतीचे कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव यांच्यासह पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाचही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.

सोलापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचा दावाही गोरेंनी केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नारायण आबा पाटील, शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातून मिळालेल्या पाठिंब्यापेक्षा या निवडणुकीत अधिक चांगला निकाल मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



‘जंतरमंतरवर बसून मतं मिळत नाहीत’

विरोधकांच्या आंदोलनांवर टीका करताना जयकुमार गोरे म्हणाले की, निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाला दोष देत कारणे शोधतात. मात्र, पराभवातून धडा घेतला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

“जंतरमंतरवर बसून मतं मिळत नाहीत, आंदोलन करून मतं मिळत नाहीत. लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवले, तरच मतं मिळतात,” असे गोरे म्हणाले. विरोधकांचा मतदारांशी संपर्क तुटल्याचा दावाही त्यांनी केला.

रोहित पवारांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत विचारले असता, गोरे यांनी रोहित पवार यांचा उल्लेख मोठे नेते असा केला. अजित पवार हयात असताना त्यांच्याबद्दल एवढे प्रेम व्यक्त झाले असते, तर आनंद झाला असता, अशी टिप्पणी त्यांनी केली.

रोहित पवार यांना लोकशाहीने आपली भूमिका मांडण्याचा अधिकार दिला असून, ते पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट करू शकतात, असेही गोरे म्हणाले.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत जयकुमार गोरे यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि विरोधकांच्या आंदोलनांवर केलेल्या विधानांमुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

‘You don’t get votes by sitting at Jantar Mantar’; Jaykumar Gore takes a dig at his opponents

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात