वरळीत २४ हजार बोगस मतदार, लाखो नावे गायब; आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Aaditya Thackeray

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; मतदार यादीतील कथित त्रुटींच्या निष्पक्ष चौकशीचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत सुमारे पाच लाख, तर राज्यात दहा लाख मतदारांच्या नावांबाबत विसंगती असल्याचा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदार यादीतील कथित अनियमिततेची जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील कथित घोळ, मतदारांच्या नावांमधील विसंगती आणि नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमधील आकडेवारीत तफावत असल्याचे सांगत त्यांनी काही उदाहरणे सादर केली. मतदारांची नावे यादीतून कशी गायब झाली, नोंदणी प्रक्रियेत एवढ्या मोठ्या त्रुटी कशा राहिल्या आणि यासाठी जबाबदार कोण, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

मतदार यादीतील सर्व विसंगतींची निष्पक्ष चौकशी करावी, त्रुटी दूर कराव्यात आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी मतदार यादीतील त्रुटींचे पुरावे असल्याचाही दावा केला.



वरळीत २४ हजार बोगस मतदार असल्याचा दावा

वरळी विधानसभा मतदारसंघात २४ हजार बोगस मतदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. एका दहा बाय दहाच्या खोलीत हजारो मतदारांची नावे नोंदविल्याचे चित्र समोर आल्याचा दावाही त्यांनी केला. महापालिका निवडणुकीपूर्वी १७ लाख लोकांची यादी अधिकाऱ्यांना दिली होती, असे सांगत त्यांनी मतदार यादीतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

माहीम मतदारसंघात सुमारे ९०० मतदारांचे मॅपिंग झाले नसल्यामुळे त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. काही जिवंत व्यक्तींना मतदार यादीत मृत दाखवण्यात आल्याचेही ठाकरे यांनी म्हटले. प्रशासनाला याबाबत माहिती देऊनही मतदार यादीत एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रुटी कशा राहिल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भिवंडीतील मतदारांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह

भिवंडी मतदारसंघातील मतदारांच्या आकडेवारीतील कथित तफावतीकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये या मतदारसंघात ३ लाख ७३ हजार ६५९ मतदार होते. त्यापैकी १ लाख ९१ हजार ६९१ मतदारांनी मतदान केले होते. मात्र, एसआयआर प्रक्रियेनंतरच्या आकडेवारीत १ लाख ९१ हजार ६४३ मतदारांचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला.

या आकडेवारीतील तफावत नेमकी कशामुळे निर्माण झाली, याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. मतदार यादीतील कथित अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाची अधिकृत भूमिका या वृत्तासाठी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मतदार यादीतील कथित अनियमिततेबाबत स्वतंत्र पडताळणी आणि अधिकृत स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.

24,000 bogus voters in Worli, lakhs of names missing; Aaditya Thackeray lashes out at the Election Commission.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात