विशेष प्रतिनिधी
मुंबई : उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद चिघळला असून, भाजपने पत्रकार परिषद घेऊन उल्हासनगरमध्ये युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यापुढील कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता स्वतंत्रपणे काम करण्याची भूमिका भाजपने जाहीर केली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. Shrikant Shinde
उल्हासनगरमधील स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असले, तरी स्थानिक पातळीवरील मतभेद सातत्याने वाढत आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून सुरू झालेल्या वादाने आता थेट युतीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपने पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत यापुढे स्थानिक पातळीवर युती न करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, भाजपच्या घोषणेनंतर शिवसेनेकडूनही तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. उल्हासनगरमध्ये शिवसेना युतीमध्येच असल्याचे स्पष्टीकरण पक्षाकडून देण्यात आले. त्यामुळे भाजपने युतीतून बाहेर पडल्याची घोषणा केली असली, तरी शिवसेनेची भूमिका वेगळी असल्याने स्थानिक राजकारणात संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांमधील हा वाद आगामी निवडणुकांमध्ये कोणते राजकीय वळण घेतो, याकडे लक्ष लागले आहे.
रवींद्र चव्हाण यांच्यावर शिवसेनेचे गंभीर आरोप
दुसरीकडे, शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी पप्पू कलानी यांच्या राजकीय प्रभावाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. ‘पप्पू कलानी गँगस्टार असतील, तर रवींद्र चव्हाण हे मंचेकर गँगचे ऑपरेटर आहेत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.
या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संघर्षाला आणखी धार आली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सुरू झालेला वाद आता युती, आगामी निवडणुका आणि दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवरील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App