विशेष प्रतिनिधी
नागपूर : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदामाची व्यवस्था करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या बैठकीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांसह नागरिकांकडून टीका करण्यात आली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना प्रशासनाला संवेदनशीलतेने वागण्याचा सल्ला दिला.
‘बैठकांमध्ये ड्रायफ्रूट आणण्याची पद्धत टाळली पाहिजे’
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रशासनाकडून बैठकीमध्ये ड्रायफ्रूट आणून ठेवण्याची पद्धत सामान्यपणे पाहायला मिळते. मात्र, दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत असताना अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.
“जाणीवपूर्वक दुष्काळ आहे म्हणून कोणी असे करत आहे, असे म्हणणे योग्य नाही. मात्र, प्रशासनाने काही गोष्टी लक्षात घेऊन संवेदनशीलपणे वागले पाहिजे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नांदेडमधील बैठकीत काजू-बदाम ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधींच्या पाहुणचारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सरकारचे लक्ष
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस कमी झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक तयारी करण्याचे निर्देश मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुढील आठवडाभरात प्राथमिक आढावा घेऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कर्जमाफी, पाणी आणि चाऱ्याबाबत उपाययोजना
शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कर्जमाफीच्या प्रक्रियेत आतापर्यंत तीन याद्या तयार झाल्या असून, उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याशिवाय पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यावरही भर दिला जात आहे. अल निनोच्या संभाव्य संकटाचा विचार करून सरकारने यापूर्वीच वैरण विकास कार्यक्रम हाती घेतला होता. ज्या भागात चाऱ्याची टंचाई निर्माण होईल, त्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतीसाठी अतिरिक्त वीजपुरवठ्याची तयारी
ज्या भागात विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, तेथील पिके वाचविण्यासाठी संध्याकाळच्या वेळी शेतीसाठी अतिरिक्त वीज देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सर्व भागांत अतिरिक्त वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुष्काळी उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान काही प्रमाणात दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत आहेत’
दुष्काळी परिस्थितीवरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुष्काळाच्या संदर्भातील शासन निर्णय आणि नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) मधून मदत मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
“राज्य सरकारकडून मदत थांबवली जाणार नाही. आधी राज्य सरकार मदत करेल आणि त्यानंतर NDRF कडून मदतीचा दावा केला जाईल,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पाणीसाठा राखून ठेवण्यावर भर
मराठवाड्यातील काही लहान धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी पाणी राखून ठेवावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोठ्या धरणांमध्ये तुलनेने चांगला पाणीसाठा असला तरी पुढील पावसाचा अंदाज स्पष्ट होईपर्यंत पाणी जपून वापरण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
ज्या भागात विहिरींना पाणी उपलब्ध आहे, तेथे रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करता येऊ शकते. मात्र, अत्यंत कोरड्या भागात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App