विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray “पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरतात आणि चक्क हिंदीतून बोलतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, समोर बसलेले आमदार मराठी आहेत, मग तुम्ही विधानसभेत हिंदीतून कुणाला दम देत आहात? दिल्लीत बसलेल्या तुमच्या पक्षातील वरिष्ठांना संदेश द्यायचा आहे का?” अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.Raj Thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि कार्यालयाच्या तसेच लोगोच्या अनावरण सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी रेल्वेतील परप्रांतीयांची भरती, राम मंदिरातील कथित चोरी आणि ‘मिसिंग लिंक’वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत राज्य व केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला.Raj Thackeray
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे…
विधानसभेत हिंदीतून कोणाला दम देताय? मुख्यमंत्र्यांवर निशाणा
विधानसभेत मिसिंग लिंकवरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, “विधानसभेत मुख्यमंत्री म्हणतात की जर कोणी राजकारण करत असेल तर आम्ही बघून घेऊ. अरे, तू मुख्यमंत्री आहेस ना? बघून घेईन काय म्हणतोस? बरं, हे बोलून झाल्यावर ते लगेच हिंदीत बोलू लागले की ‘मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीती करे…’ तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदीतून का बोलताय? तुम्हाला कुणाला दाखवून द्यायचे आहे?” राज्यात आणि शहरांत सुरू असलेल्या विकासकामांच्या विचक्यावर त्यांनी संताप व्यक्त केला.
‘मिसिंग लिंक’वरून फडणवीसांची मिमिक्री आणि सरकारच्या दुटप्पीपणावर प्रहार
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाची मिमिक्री करत त्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली. “मिसिंग लिंकच्या ठिकाणी खांब कोसळला, पाणी गळत आहे आणि यावर लोक बोलले की फडणवीस म्हणतात ‘माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही.’ वा रे वा! लोकांनी प्रश्न विचारले तर तो महाराष्ट्राचा अपमान कसा? काहीही झाले की देशविरोधी आणि आता महाराष्ट्र विरोधी ठरवायचे? तुम्ही दुसऱ्यांची सरकारे असताना जी आंदोलने केली, ती काय होती?” असा सवाल त्यांनी केला.
सगळंच ‘नैसर्गिक’ कसं?
“विरोधकांनी प्रश्न विचारले की एका मंत्र्याने सांगितले की ते पाणी ‘नैसर्गिक’ आहे. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल, तेव्हाही अशा घटना घडल्यावर ‘नैसर्गिक’ आहे असेच सांगणार का? तुमचे सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक आणि दुसऱ्यांचे असले की राजकारण?” असा टोला त्यांनी लगावला.
राम मंदिरातील चोरीवर बोलले तर आम्ही धर्मविरोधी कसे?
अयोध्येतील राम मंदिरात दानपेटीतून चोरी झाल्याच्या प्रकरणावरही राज ठाकरेंनी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खडेबोल सुनावले. “राम मंदिरात 400 कोटी रुपयांच्या चोरीचा आकडा समोर येतोय. लोकांनी श्रद्धेने दिलेल्या पैशांची तिथे चोरी होतेय आणि यावर आम्ही बोललो की काल कोणीतरी होसबळे म्हणाले, ‘धर्मविरोधी लोक अफवा पसरवत आहेत.’ चोरीवर बोललो तर आम्ही धर्मविरोधी कसे? तिथे चोरी झाली यात धर्म कुठे आला?”
“जर तिथे दुसऱ्या कुणाचे सरकार असते आणि अशी चोरी झाली असती, तर भाजपने, आरएसएसने आणि विश्व हिंदू परिषदेने मोर्चे काढले असते. राम मंदिराच्या 15 ट्रस्टींपैकी 12 जण केंद्र सरकारने नेमलेले आहेत आणि ते आरएसएस-भाजपशी संबंधित आहेत. मग तिथे चोरी होतेच कशी?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
रेल्वेतील 2008 चे आंदोलन विसरू नका, बेसावध राहू नका
यावेळी मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी 2008च्या रेल्वे आंदोलनाची आठवण करून दिली. “2008 मध्ये आपण रेल्वे भरतीवरून जे आंदोलन केले, ते कधीही विसरू नका. त्यावेळी महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये छापल्या जायच्या. त्या आंदोलनामुळे माझ्यावर 110 केसेस पडल्या, अनेकांना जेलमध्ये जावे लागले. पण त्यानंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपला प्रश्न समजून घेतला आणि रेल्वेच्या परीक्षा स्थानिक भाषांमध्ये देण्याचा निर्णय झाला.”
“त्यामुळे आज तुम्हाला मोबाईलवर पहिल्यांदा मराठी ऐकू येते. तुम्ही रेल्वेत काम करताना बेसावध राहू नका. रेल्वे स्टॉल कुणाला दिले जातायत, भरती कुणाची होतेय यावर बारीक लक्ष ठेवा. एकदा पायाखालची जमीन सरकली की ती परत मिळत नाही,” असा इशारा राज ठाकरेंनी मराठी कामगारांना दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App