विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Kalyan Banerjee तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सुरू असलेल्या कथित अंतर्गत वादाच्या चर्चांदरम्यान पक्षाचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मोठा यू-टर्न घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवणारे कल्याण बॅनर्जी आता नरमल्याचे दिसून आले. शनिवारी त्यांनी अभिषेक यांना “माझ्या मुलासारखे” संबोधत त्यांच्या सर्व चुका माफ करणे हे वडिलांचे कर्तव्य असल्याचे म्हटले.Kalyan Banerjee
विशेष म्हणजे, याच कल्याण बॅनर्जी यांनी 11 जून रोजी “ममता बॅनर्जी यांनी मला किंवा अभिषेकला यापैकी एकाची निवड करावी लागेल” असे विधान करत पक्षात खळबळ उडवली होती. त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.Kalyan Banerjee
वकिलाच्या मुद्द्यावरून निर्माण झाला होता वाद
गुरुवारी बनावट स्वाक्षरी प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांनी आपला वकील बदलल्याने हा वाद उफाळून आला होता. याआधी त्या प्रकरणात कल्याण बॅनर्जी त्यांचे वकील होते.
यानंतर संतप्त झालेल्या कल्याण बॅनर्जी यांनी अभिषेक यांच्यावर टीका करत, “त्यांना ज्येष्ठ नेत्यांचा आदर करायला येत नाही. ते खूप अहंकारी आहेत. अशाच प्रवृत्तीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे,” असे वक्तव्य केले होते.
मात्र आता त्यांनी सूर बदलत अभिषेक यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
अभिषेक यांचाही संयमी प्रतिसाद
या वादावर प्रतिक्रिया देताना अभिषेक बॅनर्जी यांनीही संयमित भूमिका घेतली होती. “कल्याण बॅनर्जी माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी मला लहानपणापासून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्या विरोधात काहीही बोलणार नाही,” असे ते म्हणाले होते.
‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली’
दरम्यान, पक्षातील घडामोडींवर भाष्य करताना कल्याण बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. “राज्यात लोकशाही संपल्यासारखी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होऊनही अपेक्षित विकास होताना दिसत नाही. भाजप आणि पोलीस यंत्रणांकडून आम्हाला त्रास दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, टीएमसीतील बंडखोरी हा एक नियोजित कट असल्याचा दावा करत, विकासाच्या नावाखाली काही नेते वेगळा मार्ग स्वीकारत असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम
अलीकडे टीएमसी आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र कल्याण बॅनर्जी यांनी या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, “टीएमसीचा काँग्रेसमध्ये विलय होण्याचा कोणताही प्रश्नच नाही,” असे सांगितले.
महाराष्ट्रातील शिवसेना फूट आणि बंगालची तुलना
पश्चिम बंगालमधील परिस्थितीची तुलना आता महाराष्ट्रातील 2022 मधील शिवसेना फुटीशी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडले होते. त्यानंतर राज्यातील सत्तासमीकरण बदलले आणि अखेर शिंदे गटाला पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्हही मिळाले.
त्याच धर्तीवर बंगालमध्येही पक्षांतर्गत संघर्ष वाढत असल्याच्या चर्चा सुरू असल्या, तरी टीएमसी नेतृत्वाकडून अद्याप अधिकृतपणे कोणतीही फूट किंवा संकट मान्य करण्यात आलेले नाही.
सध्या संदेश एकच – पक्षात मतभेद असले तरी विभाजन नाही
कल्याण बॅनर्जी यांच्या नव्या विधानामुळे टीएमसी नेतृत्वाकडून “मतभेद असू शकतात, पण पक्ष एकसंध आहे” असा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. विशेषतः काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना नकार आणि अभिषेक यांच्याबाबत घेतलेली मवाळ भूमिका यामुळे टीएमसीमधील अंतर्गत संघर्ष शमवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App