शेती भूषण दादा लाड, भारतभूषणदासजी महाराज यांना जनकल्याण समितीचा श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर

विशेष प्रतिनिधी

पुणे : शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना यंदाचा पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा ३१ वे वर्ष आहे. जनकल्याण समितीचे कार्यवाह राजन गोर्‍हे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुसंधान क्षेत्रासाठीचा पुरस्कार लाड यांना आणि समाजप्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार भारतभूषणदासजी महाराज यांना प्रदान केला जाईल, असे गोर्‍हे यांनी सांगितले.

प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सिम्बायोसिस विमाननगर येथील एसव्हीसी सभागृहामध्ये होईल.

दादा लाड यांनी कापूस उत्पादनाच्या वाढीसाठी केलेले संशोधन लक्षणीय असून त्यांच्या दादा लाड तंत्रज्ञान संशोधनाला भारतीय कृषी संशोधन परिषेदेनेही (आयसीएआर) मान्यता दिली आहे. ज्वारी, गहू, सोयाबीन आणि तूर लागवड तसेच उत्पादन वाढीसाठीही लाड यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. लाल कंधारी प्रजातींच्या देशी गायींचा प्रसार हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे.

आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांचे समाजप्रबोधनाचे कार्य गेली अनेक वर्षे सुरू असून प्रामुख्याने उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांमध्ये संत गुरु रविदास यांनी दिलेला संदेश जनमानसापर्यंत पोहोचवून समाज जोडण्याचे त्यांचे कार्य लक्षणीय आहे. समाजातील भेदभाव, कुरीती संपाव्यात यासाठी भारतभूषणदासजी महाराज प्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहेत.

पुणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दादा लाड आणि आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांच्या कार्याला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जनकल्याण समितीतर्फे करण्यात आले आहे. संस्थेचे सहकार्यवाह मुकुल पाटगावकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विनायक डंबीर, रा. स्व.संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

– जनकल्याण समितीची सेवाकार्ये

‘जनकल्याण समिती’तर्फे महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पूर्वांचल विकास, दिव्यांग कल्याण या पाच प्रमुख क्षेत्रात सतरा मोठे सेवा प्रकल्प चालवले जात आहेत. त्यात प्रामुख्याने आठ शहरांमध्ये पूर्वांचल वसतिगृह प्रकल्प, रुग्णालय, आरोग्य सल्ला, समुपदेशन, रुग्ण सेवा, तीन रक्तकेंद्र, पुण्यातील सेवा भवन, सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रकल्प, दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच तीन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदी सेवाकार्यांचा समावेश आहे.

Dada Lad and Bharatbhushandasji Maharaj have been announced as recipients of the Shri Guruji Award from the Janakalyan Samiti.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात