विशेष प्रतिनिधी
मुंबई : MNS Balasaheb Thorat आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.MNS Balasaheb Thorat
नाशिक येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी, संगमनेर येथील त्यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत थोरात यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत अनेक गैरसमज दूर केले. मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. नाशिक येथे झालेल्या बैठकीत सीपीआयच्या प्रतिनिधींनी मला आमंत्रण दिलं होतं. तिथे कोण कोण उपस्थित राहणार आहे, हे मला माहीत नव्हतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. माध्यमांमध्ये झालेल्या चर्चेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, मीडियाने वेगळा अर्थ लावू नये. हर्षवर्धन सपकाळ हे आमचे प्रांत अध्यक्ष आहेत, आम्ही नेहमीच एकत्र काम केलं आहे आणि पुढेही करत राहू.MNS Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं की, काँग्रेसचा निर्णय ठाम आहे, मनसेबरोबर कोणतीही आघाडी होणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसची निवडणूक रणनीती अधिक स्पष्ट झाली आहे. गेल्या काही दिवसांत मनसे आणि काँग्रेसच्या संभाव्य सहकार्याबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र, थोरात यांच्या भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं संकेत आता अधिक ठळकपणे मिळत आहेत.
चंदगड येथे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आल्याबद्दल विचारले असता, बाळासाहेब थोरात यांनी संयमी प्रतिक्रिया दिली. जो राष्ट्रहिताचा विचार करतो, तो भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जर ते असं करत असतील, तर आमचं काही म्हणणं नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानातून त्यांनी थेट टीका न करता सूचक संदेश दिला आहे. राज्यात भाजपविरोधी आघाडीसाठी काही प्रमाणात विचार सुरू असल्याचं त्यांनी कबूल केलं, पण काँग्रेसचा सहभाग मर्यादित राहील, हेही स्पष्ट केलं.
मनसेची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष
राज्यातील राजकीय वातावरण सध्या अत्यंत चुरशीचं बनलं आहे. काँग्रेसकडून मनसेसोबतच्या आघाडीला नकार दिल्यानंतर, मनसेची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, काँग्रेस स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र तयारी करत असून, कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यावर वरिष्ठ नेते भर देत आहेत. बाळासाहेब थोरात यांचे हे वक्तव्य काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या धोरणाला बळकटी देणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुका अधिक रंगतदार आणि रोचक होणार यात शंका नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App