Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित

Haribhau Rathod

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Haribhau Rathod  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला आता नवा कलाटणी मिळाली आहे. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी थेट राज्य सरकारवर तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हैदराबाद गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र, तसेच बंजारा समाजाच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची ताकद अधिक असल्याचा दावा करत त्यांनी मराठवाड्यात बंजारा समाजाविना कोणी निवडणूक जिंकून दाखवावी, असा थेट इशाराच दिला. राठोडांच्या या विधानामुळे ओबीसी व मराठा समाजातील मतभेद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.Haribhau Rathod

हरिभाऊ राठोड म्हणाले की, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. मात्र, हा मुद्दा नोंदीचा नाही तर पुराव्याचा आहे. त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, मराठवाड्यातील मराठा हे कुणबी आहेत. त्यामुळे हा पुरावा दाखवत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याचे राठोडांचे म्हणणे आहे. पण आमची मूळ मागणी होती की आम्हाला अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये स्थान द्यावे. अनेक वर्षांपासून मी हेच सांगत आलो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बंजारा समाज आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये एसटीमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्रात मात्र आमच्या समाजाला योग्य तो दर्जा दिला गेला नाही. 1956 मध्ये द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली, तेव्हा महाराष्ट्रात सामील होण्यास बंजारा समाजाने विरोध दर्शवला होता, कारण त्या वेळी आम्हाला इतर राज्यांत सवलती मिळत होत्या. तरीही सरकारने निर्णय घेतला आणि आम्हाला महाराष्ट्रात आणले, असे त्यांनी सांगितले.Haribhau Rathod



संविधानातील अनुसूचित जमातींच्या यादीत आमच्या समाजाचा स्पष्ट उल्लेख

राठोड पुढे म्हणाले की, आमच्या मागणीचे अनेक ठोस पुरावे आहेत. संविधानातील अनुसूचित जमातींच्या यादीत आमच्या समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ही यादी तयार केली होती. उत्तर भारतात आम्हाला कोणीही बंजारा नाकारत नाही. वसंतराव नाईक हे देखील बंजारा होते. मंडल आयोगाने देखील आमचा समाज ओबीसीमध्ये टाकला असला तरी अनेक राज्यांत आम्हाला एसटीचा दर्जा आहे. बिहारमध्ये आम्हाला शेड्युल ट्राईब म्हणून मान्यता आहे, कर्नाटकातदेखील तसेच आहे. मग महाराष्ट्रात आमच्या समाजाला योग्य दर्जा का दिला जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शासनाने तत्काळ आमचा समाज शेड्युल ट्राईबमध्ये असल्याचा शासन निर्णय काढावा, अशी मागणी त्यांनी केली. मराठवाड्यातील निवडणुकीत बंजारा समाजाविना कोणीही विजयी होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा जोरदार शब्दांत मांडला.

“आम्ही ओबीसी येडे आहोत का?”

सरकारला वाटते की त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न सोडवला आहे, पण प्रत्यक्षात हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे, असे राठोड यांनी म्हटले. 2004 मध्ये सरकारने एक शासन निर्णय काढला होता, त्यानुसार कुणबी किंवा मराठा असणे आवश्यक होते. विदर्भात मात्र एकही मराठा शिल्लक नाही, अशा परिस्थितीत कुणबी दाखला देणे अन्यायकारक आहे. “आम्ही ओबीसी येडे आहोत का?” असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्ला चढवला. मुख्यमंत्री चांगले आहेत, पण त्यांच्या भोवती चुकीचे सल्ले देणारे लोक आहेत, असे ते म्हणाले. तसेच करपुरी ठाकूर फॉर्म्युला, रोहिणी आयोग व वसंतराव नाईक यांचे निर्णय यांचा अभ्यास करूनच आरक्षण प्रश्न सोडवता येईल, असे त्यांनी सुचवले. माझ्या फॉर्म्युल्यामुळे अनेकांना आरक्षण मिळाले होते आणि आजही तोच मार्ग अवलंबल्यास प्रश्न मिटू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छगन भुजबळांवर थेट टीकास्त्र

राठोड यांनी छगन भुजबळांवर थेट टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाच्या जीआरवर भुजबळ नाराजी व्यक्त करत होते, त्यावर राठोड म्हणाले की, भुजबळ साहेब लोकशाहीबद्दल बोलतात, पण वास्तवात “जरांगेशाही” राज्य करते आहे. “भुजबळ साहेब तुम्ही पंचवीस वर्ष ओबीसीचे नेतृत्व करत असल्याचे म्हणता, पण प्रत्यक्षात तुम्ही एका समाजापुरतेच मर्यादित आहात. भटके-विमुक्त समाजाची तुम्हाला माहिती नाही. इतर समाजांचा विचार न करता फक्त एका समाजाचे नेतृत्व करणं म्हणजे उघडपणे पक्षपात आहे,” असा आरोप त्यांनी भुजबळांवर केला. त्यांच्या या विधानांमुळे आगामी काळात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणात नवे वळण येण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

Haribhau Rathod Questions Maratha Reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात